🐂 बैल पोळा 🐂
( अष्टाक्षरी )
आला बैल पोळा सण
करू बैलांचे पुजन
अन्नदाता तो बळीचा
नंदी शिवाचे वाहन…१
घाम गाळून शेतात
कष्ट करी रात्रंदिन
करू कृतज्ञता व्यक्त
सण पोळ्याचा हर्षानं…२
पाठीवर नक्षीदार
झुल टाकून सजवू
पायी घुंगरू बांधून
सर्जा राजास मिरवू…३
गळा माळ घुंगराची
शोभे फुलांचे तोरण
वाढे रूबाब बैलांचा
रंग शिंगांना लावून…४
घालू बैलांच्या मुखात
घास पुरण पोळीचा
करू दिपाने औक्षण
देवदूत तो बळीचा…५
कवी : अशोक वरूडे,
संगमनेर
Be First to Comment