Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा



श्रींचे स्वागत

श्रावणाच्या दारावरी येऊन ,
भाद्रपदाने दिली ललकारी !
आगमन होइल श्री गणेशाचे ,
तुमची झाली का तयारी !!

मंडळं घरं गल्ली बोळे ,
सज्ज करण्या पाहुणचार !
यंदा आरास कुठली करावी ,
घरीदारी याचाच विचार !!

बाजारात होईल भाव वाढ ,
जो तो करेल मग धंदा !
महागाई वाढली या मुद्द्यावर ,
गोळा करण्यात येईल चंदा !!

गृहिणीच्या मनात द्वंद्व ,
बनवावे काय जिन्नस प्रसाद !
चाकरमान्यांचा वेगळा गोंधळ ,
कुठला खर्च करू मी बाद !!

चिल्लरपिल्लर होतील व्यस्त ,
शोधण्यात आरतीपूजेचे पुस्तक !
गुरुजींची चंगळ , मिरवतील ,
ढोल ताशे नगारा पथक !!

त्या तिकडे सभा मंडपात ,
मूर्ती घडवितो मूर्तिकार !
गोळा घेतो आकार श्रींचे ,
त्यावर रंग उधळीतो रंगार !!

पोटावरती फिरता कुंचला ,
गणेशाला गुदगुल्या होतात !
कोणाच्या घरी बरं जाईन मी ,
प्रश्न सतावतो भोळ्या मनात !!

उत्साहाचे तोरण सजतील !
दारी मांगल्याची रांगोळी !
आसमंतात गुलाल उधळण्या ,
सज्ज कार्यकर्त्यांची टोळी !!

रूणझुणत्या पावली येतील ,
मूषक समवेत गणराया !
दुमदुमेल चहुकडे गजर एकच ,
गणपती बाप्पा मोरया !!

सौ मानसी म्हसकर, सुरत – गुजरात

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.