जेएनपीटी ने जुलै महिन्यात केले उत्कृष्ट प्रदर्शन
सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील यांजकडून )
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) कोविड – 19 महामारीच्या काळातही राष्ट्रनिर्मितीत महत्वाच्या योगदानकर्त्याची आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जुलै, 2020 महिन्यात 344,316 टीईयू कंटेनरची हाताळणी केली आहे जी जून 2020 च्या तुलनेत 19% जास्त आहे. जेएनपीटीने जुलै, 2020 महिन्यात एकूण 196 जहाजांची हाताळणी केली असून एकूण 4.85 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली जी जून, 2020 मधील 4.07 दशलक्ष टनांच्या तुलनेत 19% जास्त आहे.
जेएनपीटीने आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, जेएनपीटी हे बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र “जेएनपीटी सेझ” विकसित करणारे भारतातील पहिले बंदर बनले आहे. या बहु-उत्पादन बंदर आधारित सेझचे उद्दीष्ट नौवहन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्योगीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देणे आहे. यामध्ये 5 कंपन्यांनी त्यांचे बांधकाम कार्यसुद्धा सुरू केले असून त्यापैकी 2 कंपन्यांनी सेझमध्ये अलीकडेच यशस्वीरित्या आपले कार्य सुरू केले आहे. सर्व तीन कंपन्यांना विकास आयुक्त, सिप्झ (एसईपीझेड), सेझ यांनी कार्य सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. या सेझमधील कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी जेएनपीटी वचनबद्ध आहे.
जेएनपीटी सेझचे कार्य सुरू होण्याबरोबरच अजून एक महत्वाची घटना म्हणजे डीपी वर्ल्ड आणि एनआयआयएफ यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या हिंदुस्तान इन्फ्रालॉग प्रायव्हेट लिमिटेड (एचआयपीएल) ने जेएनपीटी मध्ये न्हावा शेवा बिझनेस पार्क (एनएसबीपी), फ्री ट्रेड वेयरहाउसिंग झोन विकसित करण्यासाठी रु.1000 करोड च्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. हा प्रकल्प 2021 च्या अखेरीस पूर्ण होईल व जेएनपीटी मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारास विनाअडथळा व्यापार करता येईल. जेएनपीटी मधील फ्री ट्रेड वेयरहाउसिंग झोन कार्यरत झाल्यानंतर भारत एक प्रमुख व्यापार आणि उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल व सरकारच्या ‘आत्मनिभार भारत’ कार्यक्रमास मदत होईल.
जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीटी देशाच्या आर्थिक विकासामध्ये यापुढे ही योगदान देतच राहील आणि बंदर क्षेत्राच्या निरंतर विकासाठी आपले कर्तव्ये पार पाडेल. जुलै महिन्यात निर्यातीत वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरी पर्यंत आयातदेखील सामान्य होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यात थोडेफार चढ-उतार झाले होते परंतु आम्ही आमचे कार्य निरंतर सुरू ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. तसेच, जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर आहे जेथे बंदर आधारित आर्थिक क्षेत्र यशस्वीरित्या विकसित होत आहे तसेच आम्हाला विश्वास आहे की जेएनपीटी सेझ मध्ये गुंतवणूकीसाठी अग्रगण्य जागतिक कंपन्यां आकर्षित होतील. “
जेएनपीटीने आपले कर्मचारी, जेएनपीटी प्रकल्प ग्रस्त व स्थानिक समुदायासाठी जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये एक समर्पित कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू केले आहे. यापूर्वी जून, 2020 मध्ये, जेएनपीटीने आपले बहु कौशल प्रशिक्षण केंद्र स्थानिक समुदायासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले होते. या अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देत असतानाही जेएनपीटी आपले कर्मचारी, भागधारक आणि स्थानिक समुदायांसाठी जे आवश्यक आहे ते सर्व करण्यास प्रतिबद्ध आहे.
जेएनपीटी यापुढेही नावीन्य, समर्पण, ग्राहक सेवा देण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी, लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचे पोर्ट ऑफ चॉईस म्हणून कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. भारतातील मुख्य बंदरांमध्ये होणाऱ्या एकंदर कंटेनर कार्गो वाहतुकीच्या सुमारे 52% कामकाज जेएनपीटी येथे चालते. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले. जगातील 100 कंटेनर पोर्टमध्ये जेएनपीटी 28 व्या स्थानावर असून ते जगातील 200 हून अधिक बंदरांना जोडलेले आहे.
सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.
Be First to Comment