कोरोनामुळे मुंबई ड्युटीस नकार दिल्याने कारवाई : निलंबन रद्द करा कर्मचाऱ्यांची जोरदार मागणी
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. राज्यात कोरोना आकडेवारी त मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. हा धोका लक्षात घेऊन अलिबाग एसटी आगारातील कर्मचारी मुंबईस जाण्यास धजावत नाहीत, मात्र असे करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अलिबाग पनवेल, अलिबाग दादर येथे ने आण करण्यासाठी ड्युटी लावण्यात आली होती. मात्र
कर्मचारी मुंबई ड्युटीस जाण्यास नकार देत असल्याने 31 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून पुढील आदेश काढण्यात येतील असे आगार विभागीय अधिकारी अजय वनारसे यांनी सांगितले.
आम्हाला पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी निलंबित एस टी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जोरदार मागणी केली. या कर्मचाऱ्यांना तीन महिने पगार न मिळाल्याने कोरोनासारख्या महामारीत या कर्मचाऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. सरकार व जिल्हाधिकारी यांची जिल्ह्याबाहेर प्रवासी बस सेवा बंदी असताना फक्त जिल्ह्याअंतर्गत बस सेवा असताना एसटी महामंडळ रायगड जबरदस्तीने दादर मुंबई येथे पाठवत आहेत.
आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाअंर्तगत ड्युटी करु असे प्रशासनाला विनंती केली तरीही प्रशासनाने मनमानी करुन आम्हा ३१ चालक वाहकांना निलंबित केले असल्याचा संताप निलंबित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
Be First to Comment