Press "Enter" to skip to content

विधानसभेत पुन्हा दिबांच्या नावाचा गजर

संघर्षमुर्ती लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा : आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी

सिटी बेल • पनवेल • हरेश साठे •

आयुष्याच्या शेवटापर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमुर्ती लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबासाहेबांचे नाव पाहिजे अशी जोरदार मागणी आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली.

यावेळी त्यांनी दिबासाहेबांच्या कारकिर्दीचा आलेख सभागृहात मांडतानाच नाव फक्त दिबासाहेबांचेच का हवे यासंदर्भात भूमिपुत्रांची विस्तृत भूमिका मांडत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत पुन्हा दिबांच्या नावाचा गजर केला.

सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोच्या माध्यमातून निर्माण केला जात आहे. हे विमानतळ बनवणारी सिडको मुळामध्ये १९७० साली नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी या ठिकाणी आली. १९७० सालच्या संपादनामध्ये ठाणे, रायगड जिल्यातील संपूर्ण ९५ गावाचा गावठाण संपादित केले जाणार होते. त्या ९५ गावांचे गावठाणांसह स्थलांतर करण्याची योजना होती. त्यावेळेला लोकनेते दिबा पाटील साहेब स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले. पाचवेळा विधानसभेचे आमदार, दोनवेळा खासदार, एक वेळा विधानपरिषदेचे आमदार, १९७२ ते १९७७ पर्यंत या सदनाचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र शेतकरी सभेचे अध्यक्ष, सीमा प्रश्नी एक वर्षाचा कारावास, १९८४ साली जासई येथे आंदोलन पेटले त्या पनवेल आणि उरण जमीन बचाव समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे, दैदिप्यमान कारकीर्द असलेले दिबासाहेबांचे कार्य या सदनाला माहित आहे त्यामुळे वेगळे सांगण्याची गरज नाही. १९८४ साली शेतकऱ्यांचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी गोळीबार झाला. दोन दिवसात पाच शेतकरी हुतात्मे झाले.

दिबासाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला, त्या शेतकऱयांनी वीट- वीट जोडून त्यांना घर बांधून दिले आणि त्या घराचे नाव संग्राम आहे. या घरामध्ये देवाचे फोटो नाहीत तर पाच हुतात्म्यांचे फोटो लावलेले आहेत. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर ते लढले. ज्या भूमीवर हा लढा लढला ती जमीन सिडकोने जेएनपीटीला देऊ केली त्या जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांना आजही साडेबारा टक्के भूखंड मिळाले नाहीत. दिबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत रुग्णवाहिकेतून जाऊन आंदोलन करून संघर्ष केला.

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. ते आगरी समाजाचे नेते होते. आगरी समाजातील खर्चिक चालीरीती, रूढी परंपरा असतील त्या बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या ते हृदयात आहेत. म्हणून भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांनी त्यांना दैवत मानले असून आज त्यांचा भूमिपुत्र एकवटला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती पण त्यांनी ऐकले नाही. असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात नमूद करतानाच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न बारा वर्षे चालला आहे. विमानतळाच्या नावाचा विषय आला तेव्हा ठाणे, रायगड, मुंबईतील सर्व भूमिपुत्र एकवटला आहे. अनेक प्रकल्प होत आहेत आणि होतील त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता येईल पण नवी मुंबई हि दिबासाहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे या नवी मुंबई विमानतळाला फक्त दि. बा. पाटील साहेबांचेच नाव दिले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करीत राहणार आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात राज्य सरकारला ठणकावून सांगितले.

यावेळी आमदार महेश बालदी यांनी म्हंटले कि, कोरोनाच्या काळात पूर्ण देश कोरोनाने होरपळत होता आणि सर्वात जास्त मृत्यू मुंबईत होत असताना सिडको महामंडळाने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केला. सर्व भूमिपुत्र आणि स्थानिक जनतेची ईच्छा आहे कि, विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हा प्रस्ताव स्थानिक आणि भूमिपुत्रांच्या भावनेच्या विरुद्ध होता. साडेबारा टक्के भूखंड न्याय महाराष्ट्राला दाखविले त्या दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागले पाहिजे हि भूमिपुत्रांची भावना लक्षात न घेता ऑनलाईन पद्धतीने सिडकोने ठराव केला आहे आणि तो ठराव विखंडित करावा, याकरिता गेल्या जून महिन्यापासून किमान दहा वेळा आंदोलने झाली आणि स्थानिक जनतेच्या रेट्याला घाबरून राज्य सरकारने अजून तो कॅबिनेटमध्ये आणला नाही. माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे कि, बाळासाहेब ठाकरे मोठे होते त्यांचे या प्रकल्पव्यतिरिक्त शंभर ठिकाणच्या प्रकल्पांना नाव द्या पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या आणि स्थानिक जनता, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि लोकप्रतिनिधींची हि मागणी आहे, आणि हि बाब शासनाने लक्षात घ्यावी, असेही आमदार महेश बालदी यांनी यावेळी नमूद केले.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.