Press "Enter" to skip to content

शताब्दी युगप्रवर्तक लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणाची…….!!!!

शताब्दी युगप्रवर्तक लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणाची…….!!!!

भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

१८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.

टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपणनावच रूढ झाले. त्यांच्या शालेय जीवनातली शेंगांच्या टरफलांची घटना, गणित फळ्यावर लिहून हात खराब करून घेण्यापेक्षा गणिते तोंडी सोडवण्याचा उपाय, संत हा शब्द सन्त, संत किंव सन्‌त अशा तीन पद्धतीनं लिहिला तर बिघडते कुठे असा शिक्षकांना केलेला खडा सवाल-या सगळ्या घटनांमुळे टिळक हुशार, बुद्धिमान पण काहीसे हट्टी विद्यार्थी अशा सदरात मोडले जात.

’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी प्रतिज्ञा प्रचंड आत्मविश्र्वासानं करणारी टिळकांसारखी व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच घडत गेली. कॉलेजमध्ये विद्येबरोबरच शरीरसंपत्ती मिळवण्यात त्यांना जास्त रस होता. यामुळेच कदाचित पुढचे शारीरिक, मानसिक कष्ट ते सोसू शकले. १८७६ ला बी.ए., पुढे गणितात एम. ए., व नंतर एल. एल. बी. अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले टिळक.

लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.

’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.

केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.

हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत. या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.

लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक, परखड आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.

भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद जागृत व्हावा लोक एकत्र यावेत यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव म्हणजेच शिवजयंती हे उत्सव सुरू करून त्यातून समाजप्रबोधन व राष्ट्र उभारणीचे कार्य लोकमान्यांनी केले. तसेच टिळकांनी या दोन्ही उत्सवांमधून स्वराज्यासंबंधी जनजागृती आणि लोकशिक्षणाचा पुरस्कार केला.

१९०६ साली सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली.स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६ वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक विस्तारातही त्यांचा शब्दश: ‘सिंहाचा’ वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे केवळ ‘टिळक यांची कारकीर्द’ नसून, ते भारताला स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ नेणारे ‘लोकमान्य टिळक युग’ होते.

टिळकांच्या खऱ्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला १८९९ नंतरच अधिक तेज चढले. त्या वेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक परत आले होते व त्यांची लोकप्रियता वाढली होती. शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

अशा या लोकप्रिय व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा ऐतिहासिक सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात एकेक गुणविशेष आहे. ’ओरायन’ मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. ’आर्यांचे वसतिस्थान’ मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या ‘गीतारहस्यात’ सखोल तात्त्विक विचार वाचायला मिळतो. टिळकांनी भारतीयांना स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री भारतीयांना दिली.

लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना ’लोकमान्य’ केले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणजेच आपले स्वतःचे स्वराज्य स्थापन व्हावे यासाठी झटणारे टिळक हे पाहिले नेते होते. खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवेहे लोकमान्य टिळकांनी केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून होतो. अशा या व्यक्तीमत्वाचे १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत निधन झाले.

आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावे लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.