मेख
लावला एक मी दारी चांदण वेल
एकेक गुंफते नाजुक मोहक झेल
खुडताना खुपले काटेही लपलेले
दिसताना दिसले घरात सुख सजलेले
माळता चांदणे भरारतो मन पक्षी
पण भ्रमंतीस या रात्र एकली साक्षी
परतीची त्याला कळेचना का वाट
सारखेच दिसती सारे चांदण पाट
का असुया चंद्राच्याही मनात सुप्त
लपतो ढगात होऊन जणू तम लिप्त
चमचमतो जेव्हा रात्रीचा परिवेष
हलकीशी उमटे क्षितिजावर स्मित रेष
आनंद गवसला देण्यामधला तेव्हा
ओंजळीतल्या चांदण्या वाटल्या जेव्हा
ठेऊन घेतली शुक्राची पण एक
कळली का आता नख-याची ही मेख ?
निलिमा देशपांडे,नवीन पनवेल






Be First to Comment