Press "Enter" to skip to content

कोरोनाचा चित्रपट सुष्टीला मोठा फटका

कोठारे अँड कोठारे व्हिजनची
‘प्रेम पॉयझन पंगा’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

शेखर फडके आणि रसिका धामणकर यांची दमदार एन्ट्री

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे, अर्थचक्र संपूर्णतःकोलमडून पडले, याबरोबरच अनेक धंदे, रोजगार बंद पडले आहेत. प्रत्येक माणसाच्या आवडीचा असा चित्रपट, मालिका आणि नाटक व्यवसाय सुद्धा याला अपवाद नाही. आज हा व्यवसाय बंद पडून, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जुन्या मालिका पुन्हा पुन्हा पाहून, घरी अडकून पडलेले लोक देखील कंटाळले आहेत. अनेक महिने जनजीवन पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा होती, पण सर्व आशा आकांशा फोल ठरल्या.
म्हणुनच ‘शो मस्ट गो ऑन’ या धर्तीवर काही निर्माते आणि वाहिन्यांचे अधिकारी यांनी धीराची पावले उचलून, हा विस्कटलेला डाव, पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न केला आहे. कोठारे अँड कोठारे व्हिजन या सुप्रसिद्ध मालिका निर्मिती कंपनीने सुद्धा कलाकार, तंत्रज्ञ आणि वाहिन्यांचे अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून, पुन्हा मालिकांचे चित्रीकरण सुरू केले आहे.
शेखर फडके आणि रसिका धामणकर यांची दमदार एन्ट्री पहावयास मिळाली आहे. मालिका पुन्हा सुरू करण्यास संपूर्ण टीमला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
लोकेशन, कलाकार, तंत्रज्ञ या साऱ्यांची सांगड घालण्याचा काम कठीण होते. परंतु महेश कोठारे यांनी धीराची पावले उचलून, त्यांनी त्यांची ‘प्रेम पॉयझन पंगा’ ही मालिका पुन्हा सुरू केली.
परंतु यात काम करणारी हिरोची आई ईरावती लागू आणि वडील साकारणारे कलाकार स्वप्निल राजशेखर, हे
कोरोनाच्या अडचणीमुळे घरीच अडकून पडले.
संबंधित लोकांनी, शेखर फडके आणि रसिका धामणकर या गुणी कलाकारांना, बदली कलाकार म्हणून घेऊन मालिकेचे चित्रीकरण सुरू ठेवले आणि ही मालिका झी युवा या वाहिनीवर रात्री साडेआठ वाजता रीतसर सुरू देखील झाली.
खरे तर, बदली कलाकारांची प्रेक्षकांकडून स्वीकृती कठीण असते. परंतु या दोन्ही कलाकारांनी, आपल्या अभिनय गुणाच्या जोरावर, जुन्या कलाकारांची उणीव जराही भासू दिली नाही. या दोन्ही कलाकारांना प्रेक्षकांनी उत्तम पसंती देऊन, त्यांना या नवीन रोलमध्ये स्वीकारले आहे.
अशा तऱ्हेने, मालिका व्यवसायातील सर्वानी, अनेक मालिकांमध्ये तडजोड करून, शो मस्ट गो ऑन हे तत्व बाळगून, मालिका निर्मितीचा व्यवसाय सुरू ठेवला आहे.
या मुळे, अनेक लोकांच्या रोजगाराचा आणि लोकांच्या मनोरंजनाचा मार्ग मोकळा केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.