Press "Enter" to skip to content

“दिवाळीची यादी”

सकाळच्या गडबडीत छोटूने दिलेली फटाक्यांची यादी, आईने दिलेली फराळाची यादी आणि बाबांनी दिलेली कंदील बनवण्याच्या साहित्याची यादी घाईघाईत खिशात कोंबून सुमितने नेहमीची लोकल ट्रेन पकडली. दिवसभर तो ऑफिसच्या कामाच्या “यादी”त आकंठ बुडून गेला. संध्याकाळी घरी येताना त्याला दिल्या गेलेल्या कामाची चोख अंमलबजावणी त्यानं केली आणि भरगच्च हाताने तो घरी आला.

त्याला पाहून घरात आनंदाची कारंजी फुलली. मात्र बायकोचा चेहरा पाहून सुमितला काल रात्री तिने बळेबळे त्याच्या हातात कोंबलेली दिवाळीची यादी आठवली, जी त्याने न वाचता डायरेक्ट उशीखाली सरकवली होती. सुमितच्या डोळ्यात अपराधी भाव झळकला, बायकोने हे जाणले पण तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव कायम. सुमित बायकोच्या या नवीन गुगली वर पूर्णतः confused झाला.

त्याने बेडरूममध्ये जावून कालची उशीखाली सरकवली यादी शोधून काढली. अरेच्चा!!!! सकाळच्या छोटू, आई आणि बाबांच्या standalone यादीची consolidated यादी त्याला काल रात्रीच मिळाली होती. बायको हसतहसत म्हणाली, “ आपल्या दोघांच्या यादीत घरच्यांचं सुखं आणि आनंद नेहमीच आघाडीवर असतो, बरोबर ना ” बायकोच्या या senti बॉलवर सुमितची emotional विकेट पडली.

इतक्यात त्यांच्या बाळराजेनी बेडरूम मध्ये दमदार एन्ट्री घेतली आणि सुमितच्या हातातील यादीच्या कागदाचे रॉकेट बनवून हवेत भिरकावले. सुमित आणि त्याच्या बायकोच्या हास्याच्या खळखळाटात आणि छोटूच्या टाळ्यांच्या गजरात रॉकेट हलकेच हवेंत विसावले.

  • श्रद्धा नाईक, आबुधाबी,
    (यु. ए. ई)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.