आई एकविरेच्या ओव्या
सांजवेळी देवापुढती लाविते मी सांजवात
सोनियाच्या पावलांनी लक्ष्मी आली घरात
सुगंधाने वेडावतो अंगणात माझ्या मरवा
एकविरेने ल्याला शालू ग हिरवा
पारिजातकाचा गंध माझ्या मना ग मोहवी
एकविरेच्या पायी सोनियाची ग जोडवी
कोरांटी ने ल्याला बघ नववधूचा तजेला
कटेवरी एकविरेच्या घागऱ्याची ग मेखला
परसदारात पडला बकुळीचा ग सडा
एकविरेने ल्याला हातात ग हिरवा चुडा
कोरांटी ग दारातली अंग अंग फुलली दाट
एकविरेला शोभला ग गोठ पाटल्यांचा थाट
अष्टमीच्या स्वागताला गुलाब ग हसला
बाहू मध्ये एकविरेच्या बाजूबंद शोभला
आसमंत करितो धुंद बहरून हा चाफा
एकविरेला शोभवितो सखे तण मनी अन् लाफा
अबोली ही धरुनी फेर हसे आपुल्या मनात
वेल भोकरांचा साज एकविरे तुझी या कानात
रंगीबेरंगी फुलांचा फुलूनिया झाला रथ
एकविरेला ग शोभे हिऱ्या मानकांची नथ
वसंताचे आगमन आम्र मंजिरी सांगते
जडावाचे मंगळसूत्र शोभा एकविरेची वाढविते
एकविरेच्या स्वागताला मी रेखियली रांगोळी
लाविते मी हळदी कुंकू एकविरेच्या ग भाळी
सांजवेळी देवापुढती लाविते मी सांजवात
सोनियाच्या पावलांनी लक्ष्मी आली माझ्या घरात
प्रभावती मोराणकर, ठाणे
Be First to Comment