शारदीय नवरात्र
तिसरी माळ
आज तिसरी माळ! आज आदिमायेने मैत्रीण होऊन गळ्यात हात घातले आहेत.
आपण जसजसे मोठे होऊ लागतो, तसतसे आपले घराबाहेरचे वर्तुळ विस्तारत जाते. घरच्या मंडळींसोबत कितीही संवाद असला तरी, बाहेरचे कुणीतरी संवाद साधायला लागत असते आणि मग आपल्याला भेटते – मैत्रीण.
मैत्रीण अगदी बालपणीची खेळगडी असते. बहुतेकदा ती शेजारी किंवा आपल्याच परीसरात रहाणारी असते आणि मग खेळासोबतच हळूहळू शाळेत जाणे-येणे, जोडीने अभ्यास करणे असं करत करत ही मैत्री अगदी घट्ट होऊन जाते. कित्येक गुपितं जी आपण घरी सांगत नाही, ती मैत्रीणीला सहज सांगितलेली असतात. चिंचा-बोरांचे वाटे करताना लहानपणीची “मोठी” सुख – दुःख पण तिच्या सोबत वाटलेली असतात. घरी बसलेला ओरडा किंवा मार तिलाही माहित असतो. ती पण आपल्याला सगळं सांगत असते. आपलं या जगात कुण्णी कुण्णी नाही असं वाटण्याचा जो काळ असतो तेव्हाही मैत्रीण मात्र आपली वाटत असते हीच या नात्याची गंमत. पुढे शाळा-कॉलेज बदलले तरी ही मैत्री कायम रहाते. पण जेव्हा मैत्रीण लग्न करून बाहेरगावी जाते तेंव्हा मात्र या मैत्रीचा परीघ बदलतो.
आता बालपणीची मैत्रीण कधीतरीच भेटू लागते. मग शेजारीण किंवा अहोंच्या मित्राची बायको अशा नवीन मैत्रीणी मिळतात. अॉफीसला जाणाऱ्यांना ट्रेनमध्ये आणि अॉफीसमध्ये मैत्रीणी मिळत जातात. काही वर्षांनी मुलांच्या मित्र/मैत्रीणींच्या आई पण आपल्या मैत्रीणी होतात. मैत्रीचे वर्तुळ विस्तारत जातं. मैत्रीण जणू घरचाच सदस्य होऊन जाते. सुख – दुःखाच्या प्रसंगी ती आपल्या सोबत असते. मुलांना काही वेळ सांभाळणं, शाळेत नेणं-आणणं, घरातील ज्येष्ठांना मदत करणं, प्रसंगी दवाखान्यात नेणं….. असंख्य गोष्टीत तिचा मदतीचा हात पुढे असतो. खरेदीसाठी तर मैत्रीणीच हवी. तिच्या सारखा चॉईस, तिची घासाघीस करण्याची पध्दत…… वावावा…. ती या बाबतीत incredible – अतुलनीय असते.
आयुष्यातील चढ-उतार जिच्या सोबतीने सुकर होतात, जिच्या नुसत्या असण्याने आपल्याला नवीन चैतन्य मिळतं अशा मैत्रीणीला गाढ आलिंगन. तिच्या रूपातील सखी-पार्वतीला मनःपूर्वक नमस्कार 🙏🏻
-सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए, नवीन पनवेल







Be First to Comment