पहिली मंगळागौर
मंगळागौरीची स्मृतिचित्रे
डिसेंबर २०१० मधे श्री. अभिषेक यांच्याशी विवाहबद्ध होवून मी चित्रे घराण्याशी एकरूप झाले. आमच्या सासरी सर्व सण मोठ्या भक्तिभावाने व परंपरेबरोबरच सोहळा या स्वरुपात साजरे होतात. यात माझ्या पहिल्या मंगळागौरीची आठवण अजूनही ताजी आहे.
माझी पहिली मंगळागौर! अगदी आमच्या सी.के.पी. परंपरेने मोठ्या थाटामाटात साजरी झालेली. खरं तर हा सण माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होता. थोडी बावरलेलीही होते. पण माझ्या सासुबाई सौ. स्मिता चित्रे मात्र माझ्या पाठिशी खंबीरपणे उभ्या होत्या. अगदी सर्व खरेदी, पूजेच्या तयारीपासून पंचपक्वान्नांचा नैवेद्याचा स्वयंपाक इत्यादीपर्यंत सर्व काम मोठ्या उत्साहाने आणि मायेने करत होत्या.
सकाळी आमच्या घराण्याच्या कुलाचाराप्रमाणे घरातील अन्नपूर्णेला मंगळागौरीच्या रूपात स्थापन करून तिला १६ पत्री, खारीक, बदाम, हळकुंड यांच्यासह १६ विडे वगैरे अर्पण करून पूजा संपन्न झाली. दुपारी पंचपक्वान्नांचा नैवेद्य नंतर कणकेच्या १६ दिव्यांची आरती हे सर्व यथासांग केले गेले.
रात्रीचा मंगळागौरीचा जागर हे तर खासच आकर्षण होते. माझ्या सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी घर भरलेले होते. आनंद आणि उत्साह ओसांडून वाहात होता. रात्री झिम्माफुगड्या आणि विविध खेळ, नाचगाणी ही सर्व धमाल होतीच..! पण खास आकर्षण म्हणजे माझ्या आत्यासासुबाई सौ. शीला मोकाशी यांनी घेतलेली उखाणा स्पर्धा! दोन मिनिटात जास्तीत जास्त उखाणे घ्यायचे! त्यानी तर विज्येत्यासाठी चक्क बक्षिसच जाहिर केले. आणि मीच त्या स्पर्धेची विजेती ठरले. गंमत म्हणून खेळल्या गेलेेल्या स्पर्धेतील विजेतेपद मनाला खूप आनंद देवून गेले. या गोष्टीला आज नऊ वर्षे झाली. पण चित्रे घराण्यात पदार्पण केल्यानंतर साजऱ्या केलेल्या या पहिल्याच सणाची स्मृतिचित्रे मात्र आजही मनःचक्षूंसमोर तरळत आहेत.
सौ. अनुष्का चित्रे, पनवेल
Be First to Comment