सिटी बेल | पेण | प्रतिनिधी |
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना काळ व कोणत्याही संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या दादर सागरी पोलिसांना यावेळी बाप्पाच्या महाआरतीचा मान देण्यात आला होता.
वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात पेण तालुक्यासह जोहे गावातील जेष्ठ, महिला व युवा वर्ग व्यस्त असतो. मात्र श्रीगणेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपती सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2013 साली स्थापन झालेल्या व शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे, महिलांसाठी वेगवेगळे शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जोहेचा राजा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षी प्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोणताही सण असल्यावर जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व धार्मिक कार्यात आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या दादर सागरी पोलीस स्टेशनला जोहेचा राजाच्या महाआरतीचा मान देण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक के.आर.भऊड व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. दरम्यान प्रतिष्ठान कडून गायक सायली पाटील यांच्या संगीत भजनाचा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भाजप युवा नेते वैकुंठ पाटील, उद्योजक राजू पिचिका, नगरसेवक निवृत्ती पाटील, मनसेचे रुपेश पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, युवा नेते विवेक जोशी, शेकापचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ मोकल, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष संदेश घरत, कार्याध्यक्ष वैभव धुमाळ, महिला नेत्या निकिता पाटील, नारायण म्हात्रे, रुपेश पाटील, विनोद म्हात्रे, कमलाकर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment