सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत गणेशोत्सव काळात नागोठणे शहर व विभागात कोणताही अनुचित प्रकार घडु न देण्याची आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.
नागोठण्यातील अंबा नदी किनारील विसर्जन घाटावर सोमवारी (दि. २०) सायंकाळी मोठ्या उत्साहाने व कोरोनाविषयक शासनाच्या नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्यातील बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यास नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, नागरिक व पत्रकार सहभागी झाले होते.
गणेशोत्सव काळात बंदोबस्तामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना रजा मिळत नसल्याने त्यांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सव काळातील आपले कर्तव्य बजावुन गणपती बाप्पांची सेवा ड्युटीवर असतानाच करण्याची संधी त्यानिमित्ताने पोलिस ठाण्यातच
पोलिस कर्मचाऱ्यांना मिळत असते. त्यानुसारच नागोठणे पोलिस ठाण्यालगतच असलेल्या श्री दत् मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अनंतचतुर्दशीच्या बाप्पांचे रविवारी (दि.१९) विसर्जन करण्यात आल्यामुळे मोकळे झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढली.
नागोठणे पोलिस ठाण्यापासून निघालेली पोलिस ठाण्यातील बाप्पांची ही मिरवणूक बाजारपेठ, शिवाजी चौक मार्गे अंबा नदीच्या विसर्जन घाटावर नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यातील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
Be First to Comment