२८० कोटी रुपये खर्चून होणार पनवेल महानगरपालिकेची भव्य इमारत
सिटी बेल | पनवेल |
पनवेल महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या ऑनलाइन महासभेमध्ये तब्बल ३०५ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली तसेच २८० कोटी रुपये खर्चून पनवेल महानगरपालिकेची एक भव्य इमारत येत्या तीन वर्षात उभी राहणार असल्याची माहिती पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला उपमहापौर जगदीश गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, जेष्ठ नगरसेवक अनिल भगत, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे,अनिता पाटील, सुशिला घरत, महीला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर डॉ.कविता चौतमोल म्हणाल्या की, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आमच्याकडून सातत्याने केले जात आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा विकासकामांचा झंझावात आजच्या ऑनलाईन महासभेत ३०५ कोटी रुपयांच्या विकासकामांना दिलेल्या मंजुरीवरून दिसून येत आहे.
आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व नवीन पनवेल या ठिकाणी ०६ प्ले ग्राऊंड, १५ उद्याने विकसित करण्यासाठी २७ कोटी २५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. हे सर्व विकसित करीत असताना या ठिकाणी सोयीसुविधांयुक्त प्ले ग्राऊंड व उद्याने मिळणार आहेत. त्यामध्ये युवकांना खेळण्यासाठी बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, स्केटिंग, लहान मुलांसाठी किड्स प्ले (खेळांचे साहित्य), तसेच ज्येष्ठ नागरिकांनासाठी विरंगळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक, तसेच ओपन जिमचा समावेश असणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अशा अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता आहे त्याकरिता नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ४ सेक्टर १६, क्षेत्रफळ २००८६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडको कडून प्राप्त झाला आहे या भूखंडाकरिता महापालिकेने २५ कोटी ५४ लाख ७२ हजार ७०१ रुपये सिडकोला अदा केले असून सदर भूखंड पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या करिता वास्तू विशारद सल्लागार म्हणून मी हितेन सेठी यांची जाहीर स्पर्धात्मक निविदा मागवून सर्वात उत्कृष्ट व न्यूनतम दरास ०९ सप्टेंबर २०२० रोजी स्थायी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.














Be First to Comment