Press "Enter" to skip to content

डॉ प्रभा अत्रे यांच्या नव्वदी पूर्तीच्या निमित्ताने…

डॉ. प्रभा अत्रे
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आज वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत. यानिमित्त त्यांच्या शिष्या व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सौ. वीणा कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या या भावना

गुरु चरण नित लाभो प्रभो
मांगत एकहि दान तुम्हीसो sss प्रभो
नाद समिंदर अतहि कठिण
पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो

किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डाॅ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीहि मी एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.

विज्ञान आणि कायदा ह्या दोन विषयांतील पदवीधर असलेल्या प्रभा ताईंचं संगीत क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. त्यांच प्राथमिक संगीत शिक्षण विजय करंदीकर यांच्याकडे झालं. त्यानंतर किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांची तालीम त्यांना मिळाली. सुरेशबाबूंच्या अकाली निधनानंतर त्यांच्या भगिनी पद्मभूषण हिराबाई बडोदेकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

स्वरयोगिनी डाॅ प्रभा अत्रे ह्यांच्या एकाच वेळी ११ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला होता. आजवरची ही या क्षेत्रातील जगातील मोठी नोंद आहे.

स्वरांगिनी,स्वरंजनी, सुस्वराली, अंत:स्वर, स्वरमयी, स्वराली, सुस्वरात्री, Enlighting Of The Music, Along The Path Of Music अशी बंदिशी, कविता व लेखनाची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांना विशेष करुन कर्नाटकी राग गायची खुपच आवड आहे. ज्याप्रमाणे त्याचे हिंदुस्तानी रागांवर प्रभुत्व आहे त्याचप्रमाणे कर्नाटकी रागांवरही तेवढेच प्रभुत्व आहे.
*अपूर्व कल्याण,मधुरकंस,मोहनकंस,हरीकंस,दरबारी कंस, भिन्नकंस, पटदीप मल्हार, भूप कल्याण, रविभैरव, कौशिक भैरव, तिलंग भैरव, कलाहिर, शिवकाली, शिवानी, भिमवंती हे व असे अनेक राग डाॅ प्रभा ताईंनी निर्माण केले.

गुरुशिष्य परंपरेतील या घराणेदार शिक्षणानंतर स्वतः ची प्रतिभा, चिंतन, मनन, अखंड साधनेच्या बळावर प्रभाताईंनी संगीत क्षेत्रात स्वतः चा दबदबा निर्माण केला. त्यांनी नागपूर आकाशवाणी येथे संगीत दिग्दर्शक आणि मुंबईतील, एस एन डी टी विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणून काम केले.
त्यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान बघता भारत सरकारने प्रभाताईंना पद्मश्री, पद्मभूषण, टागोर पुरस्कार, कालिदास सन्मान , स्वरभास्कर पंडित भिमसेन जोशी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ह्यांसारखे सन्मान प्रदान केले आहेत.
विद्या दानाचे पवित्र कार्य करीत असताना प्रभाताईंना वेळेचे भान कधीच नसते. हातचं काहीही राखून न ठेवता त्या संपुर्ण अखंडपणे ज्ञान शिष्यांच्या पदरी घालत असतात.
विद्यार्थ्यांना त्या भरभरून देतात, एकेक सूर, तान अगदि घोटून घेतात. सरस्वतीची आराधना करताना प्रभाताईंनी आज ९० वर्ष पूर्ण केली पण आजहि त्यांचा स्वच्छ व खडा स्वर कानी पडला, तर त्यांचे वयहि कळत नाही!
अश्या गुरूंकडून मला संगीताचे धडे मिळाले व अजूनहि मिळत आहेत.

क्षितीजावरील स्वप्नांचा जिथून उंबरठा होतो सुरु
तळहातावरील रेषांहून नक्कीच मोठा असतो गुरु!

मी साधारण १० वर्षाची होते तेव्हा माझ्या मनावर डाॅ. प्रभाताईंचा प्रभाव पडला. माझे वडील रामचंद्र गुंडोदेसाई ह्यांच्याकडे मोठमोठे गायक, वादक कलाकार घरी येत असत. डाॅ. प्रभा ताईही अश्याच आमच्या घरी यायच्या! त्यांची साधी राहणी, सोज्वळ व्यक्तिमत्त्व, संगीत क्षेत्रातील योगदान, प्रभावी गायन, शिस्तबद्ध आयुष्य ह्या सार्याचा माझ्या मनावर खुपच प्रभाव पडला,आणि मनोमन ठरवलं की गुरु असावा तर असाच!

मी १९९६ साली शांताराम संगीत विद्यालय सुरु केले त्यानंतर १० वर्षांनी माझ्या संगीत क्लासचा आढावा नजरेखाली घेऊन २०१० साली स्वरमयी गुरुकुलाची शाखा म्हणून माझ्या शांताराम संगीत विद्यालय ची घोषणा केली. शांताराम संगीत विद्यालयाला स्वरमयी गुरुकुलाची शाखा होण्याचा बहुमान आणि आयुष्यातील तो बहुमुल्य क्षण शब्दात व्यक्त करु शकत नाही असाच आहे.

अश्या माझ्या आई समान गुरु प्रभाताईंच्या ९० व्या जन्मदिनी भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान बघता डाॅ. प्रभा अत्रे फाउंडेशन द्वारा संचलित स्वरमयी गुरुकुल द्वारा विविध कार्यक्रमांच्या श्रृंखलेचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलते

ह्यासाठी १३ सप्टेंबर पासून आगामी पुर्ण एक वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी ११ वाजता यू ट्यूब चॅनल ” डाॅ प्रभा अत्रे फाउंडेशन” माध्यमातून स्वरयोगिनी डाॅ. प्रभाताई अत्रे ह्यांचेच शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, ध्वनिमुद्रित कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे.

ह्यासोबतच किराणा घराणा ग्रंथालय स्थापित केली जाणार आहे जिथे संगीत रसिकांना, विद्यार्थी आणि संगीत शिक्षक सगळ्यांनाच एकाच ठिकाणी संगीत विषयक किराणा घराण्यातील आजवर होउन गेलेल्या आणि असलेल्या गायक कलाकारांचा इतिहास, त्यांचे ध्वनिमुद्रण त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची छायाचित्रे हे सारे उपलब्ध होणार आहे.

ह्या ग्रंथालयात डाॅ. प्रभाताई अत्रे त्यांची सारी पुस्तके, ध्वनिमुद्रण, इतिहास, छायाचित्रेही उपलब्ध होणार आहेत.
ज्यांना PHD, संगीताचार्य किंवा कुठल्याही किराणा घराण्यातील संगीत क्षेत्रातील पदवी परिक्षेचे शिक्षण करायचे झाले तर किराणा घराण्याचा सखोल इतिहास उपलब्ध असल्याने अभ्यासास खुप मोठी मदत होणार आहे.

ह्या किराणा घराणा ग्रंथालयासाठी मी कर्नाटकातील धारवाड, हुबळी, गदग ह्या ठिकाणच्या ज्येष्ठ गायक पं. सोमनाथ मरडूर, कुमार मरडूर, ज्येष्ठ गायक अर्जूनसा नाकोड,प्रख्यात तबलावादक श्री. रघुनाथ नाकोड व त्यांची धर्मपत्नी सौ. रेणूका नाकोड ह्यांनी त्यांची मुलाखत व ध्वनिमुद्रण, छायाचित्र उपलब्ध करुन दिले.
ह्या कामासाठी विश्र्वनाथ नाकोड ह्यांची खुपच मदत झाली आहे.
हुबळी तील गंगूबाई हंगल गुरुकुलातील पं. कैवल्य कुमार गुरव हे तेथील अध्यापक असून त्यांच्याकडून संगीत क्षेत्राचा अभिप्राय, माहिती मिळाली. त्यांच्या वडिलाविषयी सुजाता गुरव ह्यांनी माहिती पुरवली.

पं. कैवल्य कुमार गुरव ह्यांचे शिष्य विजय कुमार पाटील ह्यांनी १९२० पासूनचे जेवढे म्हणून किराणा घराण्याचे गायक आहेत त्यांचे ध्वनिमुद्रण देण्यास मदतीचा मौल्यवान हात पुढे केला आहे.

धारवाड मधील प्रख्यात गायक पं. बसवराज राजगुरु ह्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या पाच सि डी व काही पुस्तके लायब्ररी साठी उपलब्ध करुन दिली आहेत। तसेच त्यांच्या घरातील कुटुंबियांनी शूटिंगसाठी खुप मदत केली.

अश्या तर्हेने मला मुली समान मानणार्या माझ्या आई गुरुमाउली गुरुमाँ डाॅ. प्रभा अत्रे ह्यांच्या ९० व्या जन्मदिनासाठी स्वरमयी गुरुकुल फाउंडेशन द्वारा
किराणा घराणा ग्रंथालयआणि पुर्ण वर्षभर प्रत्येक रविवारी त्यांचे ध्वनिमुद्रित कार्यक्रमांचे प्रसारण अश्या ह्या दोन अमुल्य भेटी वाढदिवसानिमित्त त्यांना देत आहोत. ह्या कार्याला आम्ही सर्व गुरु भगिनी यथायोग्य हातभार लावून फुल न फुलाची पाकळी व छोटा खारीचा वाटा अर्पण करीत आहोत.

गुरुंबद्दल मनातील भावना व्यक्त करणे महत्त्वाचे असते तिथे भाषा कुठलिही असो, तरीहि माझी मातृभाषा मराठी नसल्याने माझ्या मनातील भावना लिहिण्यासाठी माझी प्रिय शिष्या आणि प्रभाताईंची चाहती सौ. निलांबरी राजेश अनगळ हिने छोटासा खारीचा वाटा उचलून मला ह्या शुभ कार्यात हा लेख मराठीतून लिहिण्यास सहकार्य केले आहे त्याबद्दल मी तिचे आभार मानते!

आजच्या प्रभाताईंच्या ९० व्या जन्मदिनी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हा शिष्यांना अखंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

—- वीणा कुळकर्णी
—– संचालिका — शांताराम संगीत विद्यालय

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.