जिल्हास्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन : रायगड व रत्नागिरीचे कलाकार होणार सामील
सिटी बेल ∆ महाड ∆ रघुनाथ भागवत ∆
कलगी तुरा समाज उन्नती मुंबई मंडळ आयोजित रायगड व रत्नागिरी जिल्हास्तरीय गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा 2022-23 चे आयोजन संत तुकाराम महाराज सभागृह, बेबलघर येथे 29 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता करण्यांत आले आहे. या स्पर्धेत दोन जिल्हयातील मोठया प्रमाणात कला पथक सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 11 हजार 111 तर व्दितीय 5 हजार 555, तृतीय 3 हजार 333 स्पर्धा विजेत्यास सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ढोलकी बक्षिस तसेच उत्कृष्ट गायकसाठी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व माईक, तर उत्कृष्ट ढोलकीपटू साठी सन्मानचिन्ह, सन्मापत्र व ढोलकी तसेच स्पर्धेत सहभागी सर्व कला पथकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ढोलकी देवून सन्मानित करण्यांत येणार असून त्याचबरोबर जेष्ठ आणि युवा शाहिरांचा शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देवून सत्कार करणार असल्याचे मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी कळविले आहे.
कोकण विभागात कलाकारांना अर्थात शक्ती-तुरा या लोककलेला अधिक सुदृढ बनविण्यासाठी आणि कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाने कलाकाराप्रति दृष्टीकोण उदार सकारात्मक प्रोत्साहनाचे ठेवले आहे. लोककलेच्या सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी. एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे यासाठी या मंडळाच्या वतीने अनेक वर्षापासून शक्ती-तुराच्या स्पर्धा अर्थात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंडळाची कार्यकारणी, जुने, जाणते कलातज्ञ गुरुवर्य, चिठ्ठि मालक, कवी, वस्ताद, शाहीर आणि संपूर्ण शाहिरी समाज खूप मेहनत घेत आहे.
गौरवशाली इतिहास असणाऱ्या व हिरक महोत्सव पूर्ती केलेल्या या मंडळाची ही सांस्कृतिक परंपरा येणाऱ्या काळात अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न होत असून याचा प्रत्येक शाहिराला अभिमान वाटण्यासारखे आहे. या मंडळाच्या वतीने काही वर्षांपासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक कलाकाराला पुरस्कृत करण्यात आले. अशा आयोजनामुळे शाहिरी समाजात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा देणारे, दिशा देणारे हे पाऊल ठरत आहे. मंडळाची होणारी सांस्कृतिक शक्ती-तुरा स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात तसेच सुरळीत आणि दणक्यात पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे, सचिव संतोष धारशे, सहसचिव सुधाकर मास्कर, खजिनदार सत्यवान यादव, चंद्रकांत धोपट तसेच समन्वय समिती पदाधिकारी, संलग्न सर्व मंडळाचे पदाधिकारी, प्रमुख अतिथी, मान्यवर आणि कलाप्रेमी रसिकांच्या उपस्थित भव्यदिव्य होणाऱ्या या महोत्सवाची जय्यत तयारी आयोजकांकडून सुरु आहे.
Be First to Comment