पर्यावरण रक्षणार्थ तरूणांचा पुढाकार महत्त्वाचा
सिटी बेल लाइव्ह /वाचन कट्टा
दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून यासाठी तरुणांनी स्वतःहूध पुढाकार घ्यायला हवा.
हा नाश थांबवा, भूमातेचे तनमन जळते आहे,ही वसुंधरा प्रदूषणाच्या माराने झुरते आहे.खरं आहे हे.कारण आज जल,वायू,ध्वनी आदी बाबतचे विनाशकारी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणामही समोर येत असताना त्याचे कोणालाही काहीही वाटत नाही. उलट जो तो आपल्याच मस्तीत आहे.वाढणारे प्रदूषण वाढत चालले असताना आपण मात्र केवल बघ्याचीच भूमिका घेत राहिलो आहोत.तसं न करता वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून कार्य करण्याची खरी गरज आहे. विशेषतः तरुणाईने आपली शक्ती अन्यत्र खर्च करण्यापेक्षा पर्यावरण रक्षणार्थ उडी घेऊन कार्य करण्याची गरज आहे.
आजचा तरूण हा मनात आणले तर काहीही करू शकतो. त्यासाठीच त्याने आपली शक्ती असल्या विधायक कार्यासाठी खर्च केली तर नक्कीच प्रदूषण वाढीला आळा बसेल.भविष्यात आपले जिणे सुखकर व्हावे असे वाटत असेल तर पर्यावरण रक्षणासाठी स्वतः हून पुढे येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे.वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. शासनाच्या या कार्यक्रमात आपण उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमधूनही आपण आपण बरच काही करू शकतो. त्यासाठी हवी आहे ती मनाची तयारी.
बेसुमार होणारी व्रुक्षतोड,जंगल भागात लावले जाणारे वणवे,औद्योगिकीकरणाचे नावाखाली विनाशकारी धूर ओकणारे कारखाने, वाढत चाललेले प्लास्टीकचे साम्राज्य, नदीपात्रात प्रचंड होणारा वाळू उपसा,रस्त्यावर वाढत चाललेल्या वाहनांची संख्या आदी घटकांमुळे प्रुथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मानवासह इतर सजीव स्रुष्प्टीला भोगावा लागत आहे. ऋतूमानही बदलत चालले आहे. पावसाचे प्रमाण हळूहळू कमी कमी होऊ लागले आहे. पर्यायाने पाणी टंचाई सारख्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हे सारे असेच राहिले तर भविष्यात परिस्थिती फारच गंभीर होणार असल्याने आतापासूनच काळाची पावले ओळखून वाढत जाणाऱ्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी तरूणांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे.
लेखन- श्री.नंदकुमार मरवडे, श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी, ता.रोहा,जि.रायगड. मोबा. नं.८३०८६८८२२९
Be First to Comment