Press "Enter" to skip to content

अलिबागमध्ये जुगाड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

सांस्कृतिक, कलाक्षेत्राची आवड असणारे अलिबाग तालुक्यातील संदेश गजानन पालकर त्यांच्या चाहत्यांसाठी चित्रपटाच्या माध्यमातून नवीन अफलातून भेट घेऊन येत आहेत. जुगाड्या असे या चित्रपटाचे नाव असून संमेघ प्रोडक्शन प्रस्तूत, संदेश गजानन पालकर निर्मित या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण तसेच गाण्याचे प्रकाशन शनिवारी अलिबागमध्ये झाले.

सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुनील मालुसरे रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, अॅड. श्रध्दा ठाकूर, संतोष निगडे, राजा केणी, सुरेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघा चित्रमंदिरात हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी अभिनेते जयराज नायर, सुदेश म्हशीलकर, प्रणव रावराणे,चैतन्य सरदेशपांडे,जुईली टेमकर, डॉ. राजेंद्र चांदोरकर आदी उपस्थित होते.

संमेघ प्रोडक्शन प्रस्तूत, संदेश गजानन पालकर निर्मित जुगाड्या चित्रपटाचे
दिग्दर्शन नरेंद्र ठाकूर यांनी केले. या चित्रपटात मुख्य नायकाची भुमिका चैतन्य सरदेशपांडे व मुख्य नायिकाची भुमिका डॉ. जुईली टेमकर यांची आहे. तसेच संदेश पालकर व हिंदी चित्रपटाचे अभिनेते राजू खैर खलनायकाच्या मुख्य भुमिकेत आहेत. खेडेगावातील एका मुलाचे त्याच गावातील एका सरपंच मुलीसोबत प्रेम जुळते. प्रेमाबरोबरच पैशासाठी जगण्याची धडपड या चित्रपटामध्ये तरुणाची असून त्यासाठी काय जुगाड करतो. हे दाखवून दिले आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण रामराज, नांगरवाडी, कनकेश्वर, मुशेत, रेवदंडा, चोंढी आम्रवन व मुंबई येथील त्रिशा स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्यांसह नवे अभिनेते असून अलिबागमधील कलाकारांना संधी देण्यात आली आहे. 80 टक्केहून अधिक कलाकार या चित्रपटामध्ये अलिबाग तालुक्यातील आहेत. शनिवारी जुगाड्या चित्रपटाचे अनावरण करण्यात आले असून एक महिन्यांपर्यंत ओटीटी चॅनेलवर हा चित्रपट प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निर्माते संदेश पालकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.