पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्क्यांची कपात
सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
‘कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांनी कोणतंही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
असा आहे निर्णय
👉 पाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.
👉 भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.
👉 इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.
शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.
👉 प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
👉 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.
👉 इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
👉 शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
Be First to Comment