Press "Enter" to skip to content

सावधान : रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे आढळले दोन रुग्ण

नागोठण्यातील एक व्यक्तीचा मृत्यू डेल्टा पल्स विषाणूमुळे : नातेवाईकांना कळविण्यास दिरंगाई करुन जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचे प्रमाण काहीसे कमी झालेले आहे. असे असतांनाच रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मृत रुग्णांची करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील दोन रुग्णांचे मृत्यू कोरोनाचे नवे रुप असलेल्या अतिशय घातक अशा डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन झाल्याचे आढळून आले आहे. यातील एक मृत्यू उरण येथील तर दुसरा मृत्यू नागोठण्यातील व्यक्तीचा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत नागोठण्यातील अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. नागोठण्यातील याच मृतांपैकी नुकत्याच झालेल्या एका मृताचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून हा मृत्यू डेल्टा प्लस विषाणूमुळेच झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे नागोठण्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या मृत व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्या संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी याची माहिती जिल्हा रूग्णालयाकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना निधनानंतर खुप उशीराने गुरूवारी(दि.१२) देण्यात आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणा बद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रूपाने, डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिपकून राहण्यास सक्षम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. हा व्हेरियंट आपल्या प्रतिकारशक्तीस चकवा देण्यासही अधिक सक्षम असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता नागोठण्यातील एक व्यक्तीचा मृत्यू डेल्टा प्लस विषाणूमुळे झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीचा मृत्यू डेल्टा प्लस या विषाणूमुळे झाला आहे त्यांच्या जवळच्या संपर्कातील २५ व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करुन स्वॅब मुंबईतील खास डेल्टा साठी असलेल्या लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे नागोठणे प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमृता म्हस्के यांनी सांगितले. अतिघातक अशा डेल्टा प्लस विषाणूचा नागोठण्यात शिरकाव झाल्याने नागरिकांनी कोविड १९ संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.