सिटी बेल लाइव्ह / वाचनकट्टा
*साप शत्रू नव्हे, मित्र* !
आज नागपंचमीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. शेतीभातीचे रक्षण करणाऱ्या सापांबद्दल क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त करण्यासाठी सापांची आज पूजा केली जाते.परंतू सापांची केवल एकच दिवस पूजा न करता आपण कायमच त्यांच्याबद्दल मनामध्ये क्रुतज्ञता बाळगली पाहिजे.
पर्यावरणाचे साखळीत सापांचेही मोठे महत्त्व आहे. हि साखळी टिकविण्यासाठी सापांबद्दल आपल्या मनात असलेले गैरसमज पहिले आपण दूर केले पाहिजेत.
समाजात सापांबद्दल विविध प्रकारचे गैरसमज आहेत.परंतू त्यांच्या अभ्यास केल्यास किंवा खरे जाणून घेतल्यास आपले गैरसमज नक्कीच दूर होतील.परंतू ते जाणून घ्यायला कुणाला वेळ आहे.कारण साप चावल्यावर माणूस मरतो.या एका गोष्टीमुळेच फार पुर्वीपासून साप हा मानवाचा शत्रू ठरला आहे.
आपल्या आजूबाजूला विविध जातींचे साप वावरत असतात. त्यामध्ये नाग,घोणस,मणेर,फुरसे आदी सापच हे विषारी आहेत.बाकीचे न्हानेटी,धामण,दिवड,सापटोळ,मांडूळ,डुरक्या घोणस,अजगर आदी साप हे बिनविषारी आहेत.सापांच्या अनेक जाती आहेत.जगामध्ये सुमारे २७०० जातीचे साप आढळतात.यापैकी आपल्या भारतामध्ये २७८ जातीचे साप सापडतात त्यामध्ये फक्त ३% सापच हे विषारी आहेत.बाकीचे साप हे बिनविषारी आहेत.साप डुख धरतो,पाठीमागून येतो,धनसंपत्तीचे रक्षण करतो,मंत्राने सापाचे विष उतरते,जुनाट सापाच्या अंगावर केस असतात, नागाच्या डोक्यावर नागमणी असतो,सापाला सुगंध आवडतो,साप बदला घेतो,पुंगीच्या तालावर डोलतो अशाप्रकारचे एक ना अनेक गैरसमज व अंधश्रद्धा सापाबद्दल समाजात पसरल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर साप चावण्याचे अनेक प्रकार घडत असतात.त्यावेळी वातावरणात उष्णतेचे प्रमाण जास्त असते अशावेळी दिवसा उष्णतेचा अधिक त्रास होत असल्याने साप सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी आपले भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात अशावेळी सर्पदंशाच्या घटना या मोठ्या प्रमाणावर घडत असतात. तसेच पावसाळ्याच्या सुरूवातीला घोणस जातीची मादी पिल्लांना जन्म देते.जवळ जवळ एकावेळी ५० ते ६० पिल्ले जन्माला येतात.ही नवीन पिलावल आपले भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतात. नेमके याचवेळी शेतीमध्ये लागवड तसेच मशागतीची कामे चाललेली असतात.अशावेळीही साप चावण्याचे प्रकार घडतात. साप चावल्यावर माणूस मरतो या एका समजूतीपोटी चावलेला साप हा विषारी आहे की बिनविषारी याची तसदी न घेता ज्याला साप चावला तो माणूस अधिकच घाबरून जातो.अशावेळी घाबरून श जाता त्याला त्वरीत दवाखान्यात नेले तर ताबडतोब उपचार होऊ शकतात. परंतू आपण तसे न करता साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन जातो.मांत्रिक काहीतरी मंत्र म्हणतो किंवा पाणी मारतो.यामध्ये बराचसा वेळ गेलेला असतो.अशावेळी साप चावलेला माणूस शंभर टक्के दगावण्याची शक्यता असते.
साप दिसला रे दिसला की तो मारायचा हे पिढ्यानपिढ्या माणसांच्या अंगवळणी पडले असल्याने नाहक सापांचे बळी जात आहेत.साप म्हणजे शत्रू,साप म्हणजे हीच शिकवण मनावर बिंबवली गेली असल्याने नाहक सापांचे बळी जात आहेत.सापांबद्दल आपल्या मनात असलेले गैसमज यातूनच साप हे बदनाम ठरले आहेत.सापांबद्दल असलेल्या विविध गैरसमजुतीमुळेच आज हजारो साप मारले जात आहेत,सापांना शत्रू ठरविले जात आहे. परंतू या आपल्या अशा क्रुत्यांमुळे आपणच आपले नकळतपणे नुकसान करीत आहोत.आपण सापाला शेतकऱ्यांचा मित्र समजतो परंतू साप हा केवल शेतक-यांचाच मित्र नव्हे तर प्रुथ्वीतलावरील अखंड मानव जातीचा मित्र आहे. कारण
जवळ जवळ ३०% हून अधिक औषधांमध्ये सापांचे विष
हे औषध म्हणून वापरले जाते.उदाहनार्थ कँन्सर,भूल देण्याची औषधे,वेदनाशामक औषधे आदी औषधांमध्ये सापाचे विष वापरले जाते.
एखादेवेळी आपल्याला कुठे साप दिसला किंवा आपली सावली त्याच्या अंगावर पडली की हा साप माझा डुख धरेल किंवा माझ्या मागाहून येईल या समजूतीमुळे लगेचच आपण त्याला मारून टाकतो.परंतू साप कधीही स्वतःहून आपल्याला इजा करीत नाही. ज्यावेळी सापाला आपला धक्का लागतो किंवा आपल्यापासून त्याला एखादा धोका जाणवतो अशावेळी साप आपल्याला दंश करतो.जगात मानवच असा प्राणी आहे की तो स्वतःहून इतर प्राण्यांना जाणीवपूर्वक त्रास देतो.त्याला सापही अपवाद नाहीत. सापांच्या भयापासून वाचायचे असेल तर आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, घराशेजारी कोणतीही अडगळ साठवू देऊ नये.घरात किंवा आजूबाजूला उंदराची पेदास होत असेल तर ती कमी कशी करता येईल हे पाहिले पाहिजे.
शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर असतात.उंदीर हे पिकांची मोठ्या प्रमाणावर नाशाडी करीत असतात.तसेच मोठ्या प्रमाणावर पिकलेले अन्नधान्य हे आपल्या बिळात नेऊन साठवून ठेवत असतात.या उंदरांना मारण्याचे व पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे काम हे साप करीत असतात.तर सापांबद्दल आपल्या मनात असलेले गेरसमज दूर करून साप आपला शत्रू नसून मित्र आहे. हे मनावर बिंबवले पाहिजे. साप दिसताक्षणी त्यांना न मारता सर्पमित्र यांना बोलवून त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांचे रक्षण केले पाहिजे.
*श्री.नंदकुमार मरवडे*, *श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी*, *ता. रोहा,जि.रायगड*.






Be First to Comment