दहावी निकालाची वेबसाईट हँग ; पालक व विद्यार्थी हैराण
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे पण निकालाची वेबसाईट हँग झाल्याने पालक व विद्यार्थी हैराण होऊन निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांना तीन वाजून गेल्या तरी अद्याप आपला निकाल पाहता आलेला नाही. दहावीच्या निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट तब्बल दोन तास उलटूनही अद्याप देखील डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट हँग का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in , https://result.mh-ssc.ac.in , https://www.mahahsscboard.in या वेबसाईट्सवर पाहता येईल. मात्र या वेबसाईट तीन वाजेपर्यंत डाऊनच आहेत.
आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. परंतु आता ३ वाजून गेले आहेत, तरी विद्यार्थ्यांना निकाल पहावयास मिळालेला नाही. निकालाची वेबसाईट हँग झाल्याने पालक व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत वाट पहात पुरते हैराण झाले आहे. नक्की निकाल कधी पहावयास मिळेल याकडे पालक व विद्यार्थी एकटक लावून वाट पहात बसले आहेत.













Be First to Comment