Press "Enter" to skip to content

जन्मदिवस एका अस्सल कार्यकर्त्याचा

जन्मदिवस एका अस्सल कार्यकर्त्याचा

संतोष पाटील! नावातच उल्लेख असल्याप्रमाणे कायम आनंदी आणि समाधानी राहणाऱ्या या कार्यकर्त्याला जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सच्चा समाजसेवक कसा असावा असा जेव्हा जेव्हा मला प्रश्न विचारला जातो तेव्हा आपसूकच माझ्यासमोर संतोष पाटील यांची छबी उभी राहते. विचारधारेशी प्रामाणिक राहण्यासाठी अगोदर विचारधारा नीट कळले पाहिजे या स्पष्ट आणि परखड मताच्या संतोष पाटलांचा मला पहिल्या भेटीपासूनच आदर वाटतो. व्यवसायानिमित्त माझ्या कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांचे रोज सकाळी येणं होत असे.आजरोजी त्याच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक आहेत. त्यांच्या विभागातील एखादी बातमी करायची असेल तर ते जातीने कार्यालयात येत, समोर बसून चर्चा करत, बातमी पाठीमागचे दुवे, लपलेली माहिती, गरजेच्या असणाऱ्या माहितीसाठी संबंधित व्यक्तींचे फोन नंबर्स असं सगळं मटेरियल दिल्यानंतर जाताना लोभस पणे हसत, “बघा साहेब! जरा जमलं तर माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या प्रसिद्धी!” असं म्हणत हसत हसत निघून जायचे. दुसऱ्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आवर्जून फोन करून धन्यवाद द्यायचे ही सुद्धा त्यांची कार्यपद्धती.
       कार्यकर्त्यांनी आपले सामाजिक भान जपले पाहिजे याचे जणू काही त्यांना बाळकडूच मिळाले आहे. शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही कायम तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत जोडली गेलेली असते. पक्षीय राजकारणाच्या भाषेत सांगायचे झाले तर तळागळातील हाच घटक शेतकरी कामगार पक्षाचा गाभा समजला जातो. संतोष पाटील यांच्यासारख्या सजग कार्यकर्त्याला हे परिपूर्ण रित्या अवगत आहे. स्वतःच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्याला नेतेमंडळींना गावात पाचारण करताना त्यांना हे उमगलं की गावात येणारा रस्ता ओबड धोबड आहे, तेव्हा या पठ्ठ्याने चंग बांधला की आधी रस्ता बांधून घेईन आणि मगच वाढदिवस साजरा करेन… अशा विजिगीषू वृत्ती चे कार्यकर्ते हल्ली पाहायला सुद्धा मिळत नाही.
राजकारणाची उत्तम जाण, कार्यकर्त्यांचं जाळे बांधण्यात अव्वल, स्वतःची भूमिका मांडताना रोख ठोक पणाने मांडणे, प्रशासकीय पातळीवर उत्तम पकड ही संतोष पाटील यांची बलस्थाने आहेत. उत्कृष्ट वक्तृत्व शैली असल्यामुळे अर्थातच चार चौघात त्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. आणि त्यामुळेच त्यांनी केलेले सूत्रसंचालन नेहमी खुमासदार शैली चे असते.
कर्नाळा बँक प्रकरणामुळे शेतकरी कामगार पक्षाला थोडेसे बॅकफूटवर यावे लागले. या घटनेचे पडसाद उमटले त्यामुळे राजकीय नुकसान देखील सहन करावे लागले. पक्षाचे होत असलेले अनन्यसाधारण नुकसान पाहिल्यानंतर संतोष पाटील यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला अक्षरशः भडभडून व्यथित झालेला मी जवळून पाहिला आहे. पक्षा प्रति असणारी कळकळ तळमळ या व्यक्तीच्या डोळ्यात साफ दिसत होती.         
       सगळेच दिवस सारखे नसतात. सुखाचे दिवस झटकन निघून जातात परंतु कष्टी दुःखी दिवस मात्र सरता सरत नाहीत. परंतु विचारधारेवरती ठाम विश्वास असणाऱ्या आणि समाजसेवेचे प्रती वाहून घेतलेल्या संतोष पाटील यांनी मात्र सुखाची किंवा दुःखाची कशाचीच पर्वा न करता आपले काम प्रामाणिकपणे आणि चोख बजावले आहे.
      सर्व संकटांना झेलुन घेईल अशी पहाडी छाती संतोष पाटील यांना लाभली आहे, त्यामुळे अशी अनेक वादळे आली आणि गेली तरी संतोष पाटील मात्र ठामपणे पाय रोवून यापूर्वीही उभे राहिले आणि यापुढेही उभे राहतील याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा दुमत नाही.
विचारधारेवरती विश्वास ठेवणारा, लढवय्या आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या माझ्या दिलदार मित्राला जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा..
Happy Birthday Santosh Patil.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.