कथाविविधा *सद् रक्षणाय*
करोना आला आणि सगळ्या पोलिसांचे काम वाढले. लोकांनी त्यांच्याच हितासाठी घरी रहावे म्हणून पोलिस स्वतःचा आणि कुटुंबातील इतरांचा जीव धोक्यात घालत होते.
पोलिस हवालदार देसाई पण याला अपवाद नव्हते. सकाळी कधीतरी लवकर बाहेर पडायचे आणि रात्री कधीतरी घरी पोहोचायचे असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
घरी आल्यावर सुद्धा त्यांना घरातल्यांबरोबर जास्त रहाता येत नसे. ते बाहेर गॅलरीत वळकटी घालून झोपत. सकाळी लवकर सगळ्यांच्या आधी उठून बाथरुममध्ये आंघोळ करत आणि स्वतःचे डेटॉल मध्ये बुडवलेले कपडे स्वतः धुवून वाळत टाकत. बाथरुमसंडास स्वच्छ धुवून चहाचपाती खाऊन जे बाहेर पडत ते एकदम रात्रीच घरी परतत. मुले त्यांच्याकडे दुरूनच टकामका बघत पण जवळ जायचा हट्ट करत नसत. बायकोच्या, आईच्या डोळ्यातली तगमग त्यांना दिसायची पण आपले काम किती महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या मुलांमध्ये त्यांना आपलीच मुले दिसायची. त्यांना शक्यतोवर समजावून सांगण्याकडेच यांचा कल असायचा.वारंवार बाहेर पडणाऱ्यांना मात्र ते आपला पोलिसी दणका दाखवायचे. त्यानंतर त्यांनाच वाईट वाटायचे.
आपली मुले चुकली, समजावून सांगितले तरी ऐकेनाशी झाली की कधीतरी त्यांना एखादा फटका द्यावा लागतो ना तशीच ही मुले, अशी ते मनाची समजूत घालून घ्यायचे.
गेले काही दिवस त्याच्या गस्तीच्या एरिआतल्या पॉझिटिव्ह पेशंटचा नंबर वाढतच होता. रोज एखादी तरी सोसायटी सील डाऊन करायला लागायची.
यांच्या चहा जेवणाची सोय एका NGo मार्फत केली गेली होती त्यामुळे खायची आबाळ होत नव्हती पण दिवसभर उन्हातान्हात फिरायचे, सतत ओरडाआरडा करायचा याने ते सगळेच दमून गेले होते. लोकांनी साधे नियम पाळले तर आपले काम किती कमी होईल यावर यांची आपल्या इतर हवालदार मित्रांबरोबर भाकड चर्चा चालायची.
असाच एप्रिल चा अर्धा महिना निघून गेला. एक दिवस गस्त घालत असताना एक सोसायटीतल्या एका आजीने या साऱ्यांची दृष्ट काढली, आलाबला उतरवली. त्या चारी पाची जणांना पाण्याच्या, सरबताच्या बाटल्या दिल्या. “चांगल काम करताय लेकरांनो, देव तुमचं रक्षण करो” म्हणाल्या.अनेकांबरोबर यांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या. अधिक जोमाने ते कामाला लागले.
दोन दिवसांनी यांचा एक सहकारी कामावर आला नाही. काय झाले अशी विचारपूस करायला देसायांनी फोन हातात घेतला तेवढ्यात त्यांच्या साहेबांचा फोन आला. त्यांचा काळजीचा स्वर ऐकून देसाईंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ही सारी जण ज्या तुकडी बरोबर गस्तीवर जात त्यातला एकजण पॉझिटिव्ह आल्याने या पाची जणांची करोना टेस्ट करायची आहे आणि त्यासाठी त्यांना लगेचच्या लगेच सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. रिपोर्ट येईपर्यंत तिथेच राहायचे होते. साहेब म्हणाले, “घरी काही जास्त कळवू नका. रिपोर्ट आल्यावर पाहू. आजचा दिवस घरी यायला जमणार नाही म्हणून कळवून टाका.”
देसाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. जवळच्या बाटलीतले पाणी ते घटाघटा प्यायले. तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन यायला लागले. सगळ्यांची तीच अवस्था होती.
कसेबसे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे त्यांची टेस्ट केली व त्यांची रवानगी क्वारंटाईन रुम मध्ये झाली. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची मुले येत होती. आपण पॉझिटिव्ह आलो आणि जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्यांचे काय होईल याची चिंता त्यांना भेडसावत होती. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तसे त्यांचे झाले होते. अख्ख्या रात्रीत त्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. दुपारपर्यंत त्यांचे रिपोर्ट आले. सर्वचजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण सावधानता बाळगायची म्हणून यांना पुढचे काही दिवस घरीच क्वारंटाईन मध्ये रहायला सांगितले होते. त्यावेळी काय काय काळजी घ्यायची हे ही तिथल्या डॉक्टरांनी नीट समजावून सांगितले.
देसाईच्या नजरेसमोर त्यांचे चाळीतले दोन खोल्यांचे घर आले. आता या दोन रुम मध्ये कसे काय क्वारंटाईन मध्ये राहायचे? त्यांच्या समोर यक्षप्रश्न उभा राहिला.
घरी जायच्या आधी त्यांनी बायकोला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली. ती बिचारी गडबडून गेली. घातल्या घरात यांना वेगळे कसे ठेवणार तिला काही सुधरेना. देसायांचा फोन आला तेव्हा त्यांच्या शेजारच्या वहिनी त्यांच्याकडे विरजण मागायला आलेल्या होत्या.
त्यांनाही बातमी कळलीच.विरजण तिथेच ठेवून त्या लगबगीने आपल्या घरी निघून गेल्या. देसाई वहिनीं आपल्याच विवंचनेत होत्या तरीही त्यांना शेजारच्या तशाच निघून गेल्याचे जाणवलेच. अनेक वर्षे या दोघी शेजारणी अगदी घरोब्याने राहात होत्या. आता सगळे असेच वागणार याची वहिनींनी खूणगाठ बांधली.
देसाईंना घरी यायला एखाद तास लागणार होता. स्वैपाकाचा गॅस आणि जुजबी भांडी बाहेरच्या खोलीत आणायची आणि देसायांना स्वैपाक खोलीत ठेवायचे असे त्यांनी ठरवले. प्रश्न फक्त संडास बाथरुमचा होता. त्यासाठी तरी आतल्या खोलीत जावेच लागले असते.
दोन मुलांना आणि सासूला त्यांनी परिस्थिती समजावून सांगितली. आणि पदर खोचून त्या कामाला लागणार तेवढ्यात शेजारचे कुटुंब त्यांच्या कडे आले. देसाईवहिनींना आश्चर्यच वाटले. आता आपल्यासमोर आणखी काय वाढून ठेवलय असा विचार त्या करत होत्या.
शेजारच्या भाऊंनी विचारले, “वहिनी आता कसं काय करणार? देसाई भाऊंना तर एका रुममध्ये ठेवायला लागेल. आपल्या दोन रुमच्या घरात कशी काय व्यवस्था करणार? “
” मी पण त्याच काळजीत आहे हो भाऊ! “वहिनी म्हणाल्या.
” आम्ही असताना तुम्ही कशाला काळजी करताय देसाई वहिनी? तुम्हाला चालणार असेल तर काही सुचवू का? “शेजारीण म्हणाली.
” अहो गेल्या वर्षी आमच्या राजूच्या बारावीसाठी आम्ही मागची गॅलरी बंद करून घेतली होती. त्याला रात्री त्रास नको म्हणून बाथरूमला गॅलरीत उघडणारा दरवाजा पण केला होता. राजूला मी त्याची वह्यापुस्तके तिथून बाहेरच्या रुममध्ये आणायला सांगितली आहेत. देसाई भाऊ त्या गॅलरीत राहातील. आम्ही तुमच्या घरातले बाथरुम वापरू. सध्या काही दिवस स्वैपाक पण एकत्र करू म्हणजे आमच्या स्वैपाकघरात राजू अभ्यास करेल.आपल्या एकेकट्याच्या दोनच खोल्या आहेत पण एकत्र मिळून चार होतात . “
काय बोलावे देसाई वहिनींना सुचेचना. आपण काय विचार करत होतो आणि सत्य काय आहे. त्या मनातल्या मनात खजीलही झाल्या. त्यांचे डोळे सतत भरून येत होते.
” तुमचे उपकार.. “त्यांनी पायच धरले शेजारच्या भाऊंचे.
” हे काय करताय वहिनी! अहो देसाई भाऊ देशासाठी एवढे मोठे काम करतायत त्यात आमचा खारीचा वाटा. आणि हो आभाराची भाषा पुन्हा करायची नाही.काय आई, मला पिठल भाकरी करून घालाल ना तुमच्या हातची?”
“तू काय म्हणशील ते तुला करून घालीन रे लेकरा.”इतका वेळ या साऱ्यांचे बोलणे ऐकत बसलेली देसाईंची आई म्हणाली.
देसाईंचा छोटा अतुल शेजारच्या काकांसमोर उभा राहिला आणि देसायांनी कधीतरी गमतीत त्याला सॅल्युट करायला शिकवले होते तसे खाडकन पाय जुळवून त्यांना सॅल्युट करून म्हणाला जयहिंद
डॉ. समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment