मनमानसी भाग क्रमांक ९ *सवयी..*
आपल्याला कळायला लागल्यावर आई अनेक चांगल्या सवयी लावत असते. लहानपणीच्या सवयींवर आपले पुढील भविष्य अवलंबून असते.तुम्ही म्हणाल कसे? आपण खुप लहान वयात बऱ्याच गोष्टी शिकत असतो,आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या चांगल्या स्मरणात राहतात. कारण लहान वयात, अजाणतेपणी जे काही शिकतो ते लक्ष केंद्रित करून, व ऐकुन शिकत असतो.
लहान वयात आपण मुलांचे संगोपन करत असतांना लवकर जेवून,लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे ही अतिशय महत्त्वाची सवय लावली पाहिजे.रात्रीची झोप ही पुर्ण ८ तासांची हवी. नंतर स्वतः च्या पांघरूणाची घडी घालायची सवय लागली कि ती कायम लक्षात राहते. सगळे विधी आटपून झाले कि, सुर्यनमस्कार , कवायती घालण्याची सवय अतिशय आरोग्यदायी अशी आहे.मुलांना रात्री ९ वाजता जेवून झोपवलेले असते.मग ब्रश करुन दूध पिले कि काही वेळाने चांगली भुक लागलेली असते. ९ पर्यंत नाश्ता,त्यात सुकामेवा, दुध व फळे खाणे या सवयी लावल्या तर मुलांना फळे खाण्याची सवय लागते किंवा उपमा,शिरा अशा प्रकारचा पौष्टिक नाश्ता खाण्याच्या सवयी दररोज लावल्यामुळे अंगवळणी पडतात.अशा अनेक जीवन निगडित सवयी त्या त्या टप्प्यात शिकवायला हव्यात.
मोठ्या मंडळींनी पण याच सवयी दररोज आचरणात आणल्या तर लहान वयात मुले मोठ्यांच्या सवयींचे अनुकरण करत असतात.
शाळा सुरू झाली कि मग अजून सवयींची मालिका वाढत जाते.मला आठवते कि थंडीचे दिवस होते, रात्री झोपतांना रोज आई रोज आठवणीने सांगत ,शाळेचा ड्रेस काढून ठेवला का? बॅग रात्रीच भरुन ठेव, म्हणजे सकाळी दुध प्यायला वेळ मिळतो, मी मात्र सकाळी कंटाळून कुडकुडतच उठे,पण हीच सवय मला मुली शाळेत असतांना कामे आली.
तुम्ही स्वतः ला जशी सवय लावाल, तशा सवयींची तुम्हाला सवय लागते. लवकर उठण्याची सवय पुढे कॉलेज जीवनात जास्त उपयोगी पडते. अगदी १०वी ,१२ वी ला व पुढील शिक्षणासाठी पण पहाटे अभ्यासाला उठणे, ही सवय नेहेमीच चांगली म्हणजे शांत वातावरणात केलेला अभ्यास लक्षात राहातो.
आता जरा मोठ्यांच्या सवयींबद्दल..! आपल्या रोजच्या कामाचेच बघा ना ! आपण आदल्या दिवशी जर स्वयंपाकाचे नियोजन करायची सवय लावली तर काम वेळेत होतात. सुट्टी लागली कि मग गावाला जायचे असते, बरोबर काय न्यायचे आहे, त्याची यादी करायची सवय खुप महत्वाची आहे. हे बघून मुलांना पण लहान वयातच चांगल्या सवयी लागतात, त्यासाठी आपणच सवयी आमलात आणणे महत्त्वाचे आहे !!
अनेकांच्या वेगवेगळ्या सवयीं..पण तरीही कंटाळा किंवा आळस असला कि लावलेल्या सवयी टिकून राहत नाही. आणि मग नियोजित कार्यक्रम माहीत असूनही वेळेवर धावाधाव करायची..अशा सवयीमुळे पुढे काय घडते ते विचारुच नका ! तेच याउलट आपल्याला कुठल्याही गोष्टी नियोजनबद्ध, नीटनेटक्या ठेवायची सवय असली कि घरातील इतरांना पण ती सवय लागते. त्यामुळे ती सवय आपल्याला पुढील आयुष्यात म्हणजे शिक्षणासाठी कुठे बाहेर जावे लागले किंवा नोकरीच्या ठिकाणी, लग्नानंतर अशा प्रत्येक टप्प्यावर या चांगल्या सवयी आपल्या सोबत असतात, आणि आपण निश्चितपणे आनंदी राहू शकतो.
आयुष्यात आपल्याला अनेक सवयी लागतात..! कुणाला झोपतांना वाचायची सवय तर कुणाला झोपेत बडबडायची सवय ! कुणाला गाणे ऐकल्या शिवाय झोप लागत नाही. तर कुणाला दररोज सकाळी गाण्याचा रियाज करायची सवय असते.
हल्ली तर सर्व वयोगटातील मोठ्या व लहानांना रात्री झोपतांना उशीरापर्यंत मोबाईल बघणे, व सकाळी उठल्यावर मोबाईल बघितल्या शिवाय दिवस सुरूच होत नाही..! मेसेज आला म्हणून सारखा, सारखा उघडून पाहायची सवय अनेकांना असते.
लहान मुलांना पण मोबाईलवर खेळायची एवढी सवय लागली आहे की, जेवतांना, झोपतांना, फक्त मोबाईलच लागतो. बाकी खेळ मूले विसरली आहेत.
सारखे हात धुवायची सवय आणि बरोबर ४ वाजता चहा प्यायची सवय अनेकांना असते. काहींना ठराविक ठिकाणीच झोप लागते, तर टेन्शन आले कि आणखी सपाटून भूक लागते..! कुणाला जोऱ्याने बोलायची सवय असते तर, कुणाला अगदी शांत व मृदू आवाजात बोलण्याची सवय असते, तर कुणाला पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलायची सवय असते.
हल्ली गोड खाण्याच्या सवयीने डायबेटिसचे प्रमाण वाढत आहे.कमी वेळा व प्रमाणात गोड खाण्याची सवय कधीही चांगलीच.
जसे सगळ्यांशी नाते टिकून ठेवायची सवय,आणि सगळ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायची सवय पण उत्तमच..!
अशा अनेक प्रकारच्या चांगल्या आणि वाईट सवयी सोबत घेऊन आपण आपले आयुष्य जगत असलो तरीही आपण त्या सवयींचे गुलाम व्हायला नको..! सवयीला आपले गुलाम करु या.
कुणाला वाचण्याची सवय असते, आमच्याकडे तर सकाळचे वर्तमानपत्र वाचायची खुप सवय आहे .पण ही वाचण्याची सवय त्या व्हाट्सअप, किंवा टि. व्ही.पेक्षा लाख पटीने चांगली आहे. सगळी कामे आवरली कि, मस्त आवडीचे पुस्तक वाचावे आणि सोबत गरमागरम कॉफी अहाहा..!असे वाचण्याचा आनंद काही औरच ..! त्यामुळे नको ते विचार डोक्यात येत नाही. वेळ कारणी लागतो, ज्ञानही मिळते. काय बरोबर आहे ना ?
सौ. मानसी जोशी
पनवेल.







Be First to Comment