वटपौर्णिमा
सावित्री अश्वपती पित्याची
उपवर कन्या सुंदर गुणी
सत्यवानास घालूनी माळ
नांदू लागली सासरी वनी
अल्पायुषी घरधन्यास
वाचविले यमापासुनी
समस्त ललना पुजिती
वटवृक्षास तेव्हापासूनी
देहाच्या पोकळीत वसे
अविनाशी निर्लेप आत्मा
देह चालविण्या फुंकितो
प्राणांचा वायु सर्वात्मा
समस्त पशूपक्ष्यांसाठी
प्राणवायुचे दान हवे
वनदेवता पुरविते वायु
परि मानवाला भान हवे
वृक्षतोड अनिर्बंध करता
प्राणांचा वायु देतो ओढ
सजीवांचा संपुनी श्वास
सृष्टी सौष्ठव बनते रोड
आधुनिक युगाच्या सावित्री
वटपौर्णिमेचे करती व्रत
वृक्षसंवर्धन हीच पूजा
सौभाग्याचे सौख्य सांप्रत
स्वाती लेले, नवीन पनवेल
Be First to Comment