Press "Enter" to skip to content

शब्द संगीत क्रमांक ५

शब्द संगीत क्रमांक ५

योगशास्र आणि सामवेद !

योग म्हणजे युज हा संस्कृत मधला शब्द !
युज म्हणजे जोडणे. कशाची जोडणी..? तर योगशास्रात शरीर आणि मन जोडलं जातं तो योग !
शरीर आणि आत्मा यांना जोडणारा दुवा म्हणजे आपलं मन !
Flow of athoughts means mind !
विचारांची धारा म्हणजे आपलं मन !
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –
हे मन कैसे केवढे |
ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे ||
एरव्ही रहातावयास थोडे |
त्रैलोक्य तया ||
मनाला त्रैलोक्यातील अतिप्रचंड जागाही अपुरी पडते ते मन मात्र मुळी सापडतच नाही .
प्राणायाम , योगासने एकमेकांना पूरक श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण होऊन या दोन योगतत्वाचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाला उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्मनियमन प्राप्त होते .
प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची जणू तयारीच असते.
या दोन्ही सोबत balance करणं , शरीर आणि मनाचा तोल सावरण्याचं काम आपल्याही नकळत योग करतो.
जागतिक योग दिनाला जगभरात मान्यता मिळणं म्हणजे हा आपल्या हजारो वर्ष प्राचीन भारतीय योगशास्राचा १४८ देशांनी केलेला खरंतर  खूप मोठा सन्मान आहे .
काळानुसार योग एक आचरणाच्या रूपात प्रसिद्ध होत गेले . भागवत गीतेसह महाभारतातील शांतीपर्वा मध्ये योगशास्राचा खुलासेवार उल्लेख आहे त्याअगोदर फार पूर्वी वीस उपनिषदां मध्ये ” सर्वोच्च चेतने सोबत मीलन होणे म्हणजे योग ” सांगितलं आहे
तसेच अतिप्राचीन उपनिषद, बृहद अरण्यक, छांदोग्य उपनिषद, कठोपनिषदाने योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी , तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या रूपात जाणले होते .
अथर्ववेदा नुसार संन्याशी आणि प्राचीन काळी मुनी महात्मा , विविध संत, नवनाथ सांप्रदायी कठोर शारीरिक आचरण , ध्यान आणि तप करीत असत.
खरंतर मनासारखा शरीराला सुद्धा अहं असतो ते लवकर वाकायला  ( नम्र  व्हायला ) ताठपणा सोडायला तयार होत नाही . पण साधनेने , नियमित सरावाने हे शक्य होते .
दिवसभराच्या चोवीस तासातील फक्त काही वेळ सकाळी किंवा संध्याकाळी द्यायला हवा.
सूर्यनमस्कार , प्राणायाम , आसनं , ऋतुमाना नुसार आणि वयोमाना नुसार आहार घ्यायचा.
योगसाधने मुळं मनस्वास्थ ,  शांत , प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचं सामर्थ्य योग देतो.
योगामुळं दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिकता येतं .
आणि अंतःकरणातला हा आनंद एकदा का दरवळायला लागला की साऱ्या चिंता , दुःख , क्लेश , स्पर्धा , इर्षा,  मोह स्वाहा होतात…!

योगशास्रा मुळं शारीरिक सोबत मानसिक , सामाजिक , आणि अध्यात्मिक प्रगती  होते .
आपल्यातल्या विवेकी क्षमता कैक पटीनं वाढवता येतात. आत्मविश्वास बळकट होतो . आपण सद्सद्विवेकी , विचारी होतो ते या योग साधनेमुळंच ! श्वास नियंत्रित होतात . आपण आपल्या अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत योग करू शकतो.
जगभरातील  लोकं भारतात येऊन  योगशास्र शिकतात , उपयोग करतायत ,  त्याचं modification करून लाखो रूपये कमवतायत पण आपण  मात्र आपलंच हजारो वर्षाचं शास्र त्याचा म्हणावा तितका उपयोग  करत नाही . मग त्याचा प्रचार आणि प्रसार तर फारच दूरची गोष्ट !
मात्र योग करताना किंवा शिकताना टी. व्ही मध्ये बघून कधीही करू नये .तो जाणकारां कडून माहिती करून , शिकूनच करावा .

सूर्य , चंद्र , तारे आपले नियोजित कार्य करतात . त्यांचा सातत्य योग आपण डोळ्यासमोर आदर्श पाठ म्हणून ठेवला तर हे जीवन सुयोग्य नक्कीच होईल आणि
नियमित योगशास्राच्या सान्निध्यात राहिल्यास हे जग आहे त्याहून अधिक सुंदर वाटायला लागेल हे नक्की

संगीत

संगीत एक अपूर्व कला !
सामवेद हा संगीताचा वेद !
संगीताने जणू मनाची साम्यावस्था होते .
खरंतर सर्व सृष्टीत एक प्रकारचं संगीत भरलेलं आणि भारलेलं आहे .
संगीत साधना करताना आपल्याला आनंद होतो आपण फक्त आपल्या साठी गाणं गुणगुणतो. आणि हा आनंद , हा छंद आपल्याला जगायला शिकवतो. हाताला धरून  खऱ्या आनदाकडं आपल्याला घेऊन जातो.
संगीत आयुष्यातील विसंगती दूर करतं.
हजारो लोकांची मनस्थिती जिथे एकरूप होते .
श्रोते जणू एका समान भूमिकेवर येतात .
संगीताला कोणतीही भाषा नसते. एकेक स्वरमंडळ जुळायला लागतं तसं सच्चा रसिक तन्मानतेनं एकरूपता होतो जणू सूरमय अत्तराचा मंद सुगंध अगदी अलगदपणे असा काही भिनत जावा की काही वेळानं फक्त सुगंधच जाणवावा..!
आपल्याला न समजणाऱ्या  भाषेतलं गाणं म्हणजे   शब्द कळणार नाहीत पण सूर , ताल , लय आपल्याला डोलायला लावते. संगीत आपलं सुरांसोबत नातं घट्ट करतं. म्हणून संगीताची भाषा शब्दांच्या पलीकडची असते.
आपल्याला त्या  एका सुरावटीं सोबत प्रवासाला घेऊन जाते. जिथ आपण आपलं काहीही सोबत घ्यायचं नाही  फक्त  त्या सूरांसोबात रहायचं आणि मग ही      ताला – सुरांची गट्टी जमली की आपण त्यांचा सोबत  नसलो तरी सूर मात्र आपली साथ देतात.   आणि आपल्याला  फक्त आणि फक्त आनंदाची , अद्भूतरसाची अनुभूती देतात .
संगीताची आराधना , उपासना, साधना केली जाते
संगीतात राग गायले आळवले जातात पण त्यामुळं आपल्यातला राग ( क्रोध ) कमी होतो . मन शांत होत
सकाळच्या वेळी एखादं भक्तीगीत , अभंग ऐकून देखील  मन प्रसन्न होतं आणि ही प्रसन्नता ,
त्या गीतातील शांतता हृद्यात कधी झिरपत जाते ते  आपल्यालाच कळत देखील नाही .
आणि ती सांगितिक ऊर्जा आपल्याला दिवसभर पुरणारी असते.
प्रत्येक जण गाणं शिकतोच असं नाही परंतु आपल्याला आवडणारे संगीत प्रत्येकजण ऐकत असतो, गुणगुणतच  असतो.
भारतीय संगीताची जगभराला अनोखी अशी  देण आहे . यामध्ये  अनेक भारतातील उत्कृष्ट गीतकार, संगीतकार , गायक , वादक यांच अतिशय  मोलाचं आणि महत्वाचं  योगदान राहिलेलं आहे .
म्हणूनच जगभरात आपल्या भारतीय संगीताची ख्याती आहे .
संगीत शक्ती इश्वर की
हर सूर में बसे है राम..
रागी जो सुनायें रागिनी
तो रोगी को भी मिले आराम..!
सध्या आजच्या या ताणतणावाच्या  परिस्थितीत music therapy  अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे आणि यावर जगभरात नवनवीन  संशोधन देखील सुरू आहे.
जगभरात किंवा पाश्चात्य संस्कृतीतलं जे संगीत आहे ते माणसाला नाचवतं पण भारतीय संगीत हे प्रत्येक माणसाच्या मनामनाला नाचवतं..!
जेव्हा एखाद्या  कलेमुळं आपल्यात प्रगल्भता येते . माणूस म्हणून आपण समृद्ध होतो .
सुखाच्या पलीकडच्या दुःखाची जाणीव आणि दुःखाच्या पलीकडचा आनंद पहायला ही कला किंवा शास्त्र आपल्याला शिकवतं .
तत्त्वज्ञानी  कार्लाइल म्हणतो की या जगात फक्त  दोनच माणसं आहेत  एक म्हणजे शेतकरी ( farmer is d gratest artist )
जो आपल्या कष्टानं , घाम गाळून माळरानावर नंदनवन फुलवतो.  आपल्याला भाकरी देऊन तो पोसत असतो. जगवत असतो . आणि दुसरी म्हणजे कला जी मनाला जी  बुद्धीला खुराक देते. मनन , चिंतन करायला आहार , खाद्य पुरवते.

आणि आपण सर्वांना  कोणत्या प्रकारची भाकरी  ( पोषण ) देतोय किंवा दयायची  ते आपणच ठरवायचं . नाही का..?

सर्वेपि सुखी नःसन्तु |
सर्वे सनूतु निरामयाः ||
सर्वे भद्राणि पश्चन्तु |
माःकश्चित दुःख माप्नुयात ||

संगीता थोरात.
नवीन पनवेल .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.