Press "Enter" to skip to content

कथाविविधा

कथाविविधा *शेतकरी*

विष्णू:-
काय बी झालं तरी मोर्चाला जायचंच. म्या आधीच ठरिवलं होत. घरी थोडी किटकिट चालू व्हती. “सौताच्या तभी जीवाला बर न्हाई तर कशाला उगीच वणवण करताय. तिकडं मम्हईला लांब जाऊन काय बी व्हणार नाही. पन माझ येडीचं ऐकतय कोन. आता परत येऊन आजारी पडला तर कस काय करायचं म्हणते मी. इकडं दातावर मारायला बी पैसा न्हाई.”
म्या काय तिचं ऐकत बसलो न्हाई. गावात पन आणि मुंबईस जाऊन बी तरास होणारच हाय जीवाला मंग का जाऊ नये म्हंतो मी?
दुसऱ्या दिवशी सा सात कडक भाकरी न कोरड्यास बांधून घ्येतल नी शेवटचीच शंबराची नोट व्हती ती बी घ्येतली मुंडाशात आवळून.
माझी बाईल जरा फुरगटलीच व्हती. तिला माझ्या पोटदुखीची भारी काळजी. “नीट ऱ्हावा, उगा जीवाला घोर लावू नगा माझ्या नि वेळेवारी भाकरी खावा. खायला उशीर क्येलात की पोटात कळ मारते तुमच्या. ध्यानात असू द्या. हितली काळजी करू नका. आमचं आमी सांबाळू.” सारजाच बोलणं काई संपत न्हवतं
“आगं म्या काय ल्हान पोर हाय काय या शिरप्यासारकं? म्या ठेविन ध्येनात . काय बी काळजी करू नगस.”
त्यांचा निरोप घेऊन म्या निघालो. आमला समद्यांनाच चालत जायला कायबी तरास वाटत नव्हता. तरणा व्हतो तवा बैल म्येला ऐन नांगरणीच्या टायमाला तवा म्याच जुपलो होतो नांगराला आमच्या ढवळ्या संगटीने. माझ्या बरूबरच्या समद्यांनाच चालायचं काय आपरुप न्हवतं. धा ईस मैल तर रोजचीच चाल व्हायची. त्यामुळं चारच दिसात आमी मुंबईस पोचलो. ही गरदी व्हती. समदीकड माणसच माणस दिसत व्हती. मला तर काय बी सुदरत न्हवतं. सुभान्या आमच्या गावचा म्होरक्या. आमी समदीजण त्याच्याच मागमाग जात व्हतो. आमी चालत चालत एका लई मोठ्या मैदानात पोचलो. तिकडं आमच्यासारखं कैक शेतकरी आलेलं व्हत. समद्यांची एकच रड. दुष्काळ, कर्जमाफी, वेळेवारी औषधपाणी आणि आत्महत्या. दिवसभर धरणं धरल्यावर नी मागण्यासाठी घसा सुकवल्यावर मुख्यमंत्री आलं नी मागण्या मान्य करून ग्येलं बी भुरदिशी गाडीत बसून. म्या पण जरा उठलो. पोटात थोडा मुरडा पडल्यागत वाटत व्हतं. इरागतीला जायला कुठं भ्येटेल ते आजूबाजूला धुंडाया लागलो. आमच्या गावात बरं होत कुठ बी झाडामागं जाऊन मोकळं व्हता यायचं. म्या सुबान्याला म्हटलो बी माझ्या संगत यायला. पण त्याला मोठ्या नेत्यांस्नी भ्येटायचं व्हतं. बाकीचं बी यायला काचकूच करीत व्हतं. त्ये समदेजण या गर्दीला बघून गांगरले व्हते. म्या म्हटलं त्यांस्नी. म्या संडास शोधून जाऊन येतो. तवापरीस थांबा. नायतर चुकामुक व्हायची. त्यानी बी माना डोलावल्या.
मी जरा त्या गर्दीतनं बाहेर पडलो नि शिपाईदादास ईचारलं त्यानं दाखवलेल्या बाजूस चालाया लागलो. तिथं आणखी कोणाला रस्ता ईचारला. इकडं पोटातला मुरडा वाढतच व्हता. काय सुधरना मला. इकडं तिकडं लई फिरलो. शेवटी एका ठिकाणी सुलभ शौचालय अशी पाटी दिसली. चौथी पातूर शिकल्याचा असावी फायदा व्हतो बघा!
पोट रिकामं करून भायेर आलो तर पोटात जास्तीच कळ माराया लागली. कसाबसा तिथेच बसलो. तेवढ्यात जोराची कळ आली नि माझा श्वास अटकला. अरे अरे याला चक्कर आली असा कायसा गोंगाट ऐकाया येत व्हता. माझ्यासमोर मला बायजा नि माझी दोन प्वार दिसत व्हती आणि अचानक डोळ्यासमोर काळोख आला.

डॉक्टर सुजय
आज माझी इमर्जन्सी ड्यूटी होती. मला जेजे मधली इमर्जन्सी करताना नेहमी बाजीप्रभू देशपांडे आठवायचा. एकावेळी अनेक शत्रूशी तितक्याच तडफेने लढणारा! माझी आणि सरांची पण तीच गत झाली होती.नुकताच एका पेशंटला स्युचर घालून मी दुसऱ्या पेशंटला अॅबसेस ड्रेन करायला घेतले होते इतक्यात पाच सहा जणांचा घोळका एका मध्यम वयाच्या पुरुषाला स्ट्रेचरवर घेऊन आला . एक इंटर्न त्याला चेक करत होती. तिने विचारलेले प्रश्न आणि त्यावर तिथल्या लोकांनी दिलेली उत्तरे माझ्या कानावर पडत होती. तो शेतकरी मोर्चाला आलेला शेतकरी होता. तो कोणत्या गावचा आहे. त्याच्याबरोबर कोण आलेले आहेत. याचा काहीही पत्ता नव्हता. तो मैेदानाजवळच्या शौचालयाबाहेर चक्कर येऊन पडला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याला टॅक्सीत झोपवून इथे आणले होते. माझे काम एव्हाना झाले होते. अॅबसेसवाल्या पेशंटला औषधे समजावून सांगण्यासाठी आणि इतर इंस्ट्रक्शनसाठी एका इंटर्न कडे सोपवून मी त्या नवीन पेशंट जवळ गेलो. इंटर्न मला हिस्टरी सांगत होती तो पर्यंत मी जनरल एक्झामिनेशन करून घेतले. डाव्या बाजूला पोटावर हात ठेवला तरी तो अर्धवट बेशुद्धीत असलेला पेशंट कळवळत होता. अक्यूट अॅबडॉमेन. माझा मेंदू मिळालेल्या माहितीनुसार आपोआप डायग्नोसिस पर्यंत पोचत होता. इमर्जन्सी सोनोग्राफी साठी कॉल पाठवून मी आय् व्ही सूरु केले. पेशंटच्या ओळखीचे किंवा गावचे कोणी आहे का? याची चौकशी सुरु केली. पण कोणीच त्याला ओळखत नव्हते. पेशंटला बहुतेक गॅस्ट्रिक अल्सर असावा आणि तो बर्स्ट झाला असावा अशी मला शंका येत होती. या केस मध्ये अर्जंट सर्जरीची गरज होती. पेशंट पूर्ण शुद्धीत नव्हता आणि हॉस्पिटलच्या व सरकारी नियमानुसार नातेवाईकांच्या संमतीशिवाय आॉपरेशन करणे शक्यच नव्हते. तेवढ्यात सोनोग्राफी करणाऱ्या मैत्रिणीने फ्लुईड दिसतय रे. बहुतेक गॅस्ट्रिक अल्सर असावा असे सांगितले..
मी चटकन सरांना फोन केला. सगळी परिस्थिती सांगितली. सर म्हणाले की डीन मॅडमशी बोलतो मग ठरवूया तोपर्यंत कन्झरवेटिव्ह ट्रिटमेंट दे.
मी एकीकडे सिस्टरना अॉपरेशनची तयारी करायला सांगितली. अनस्थेटिस्टला कॉल पाठवला. माझ्याबरोबर असलेल्या मेडिसिनच्या रजिस्ट्रारला त्या पेशंटचे बाकी चेकअप करून केस माझ्या बाजूने रेडी केली. मॅडम ने नो अॉबजेक्शन दिले की लगेच अॉपरेट करता आले असते.
दहा मिनिटात मी दोन वेळा सरांना कॉल केला. सरांचा फोन एंगेज लागत होता. इथे एकेक मिनिट महत्वाचे होते. शेवटी धाडस करून मी मॅडमच्या चेंबरपाशी गेलो. आतून सरांचाच आवाज येत होता. मी पण नॉक करून आत गेलो. काय करावे याची सगळ्यांनाच चिंता होती. असेच अॉपरेशन केले आणि काही झाले तर आमच्यावर अनेक दोषारोप झाले असते. काही केले नसते तर आमच्या सद्सद्विवेकबुद्धीने आम्हाला कधीच माफ केले नसते. डीन म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी मॅडमची होती. मी भीत भीतच पेशंट सिरियस आहे त्यामुळे लवकर डिसिजन घ्यायची विनंती केली. एका ज्युनियर डॉक्टरने असे धाडस करणे म्हणजे अशक्यप्राय बाब. पण त्या एकाकी, असहाय्य पेशंट मध्ये मला माझे गावाकडचे नातेवाईक दिसत होते.
मॅडमनी क्षणभर विचार केला आणि म्हणाल्या, चला मी करते रिलेटिव्ह म्हणून सही. सरही उत्स्फूर्तपणे म्हणाले मी पण करतो सही. “काही झालेच तर आपण कलेक्टिव्हली जबाबदारी घेऊ. स्वतः अर्धपोटी राहून सगळ्या देशाचे पोट भरणारा हा शेतकरी आपला रक्ताचा नसला तरी धर्माचा नातेवाईकच आहे. त्याला काही झाले तर मी स्वतःला माफ करणार नाही ” मॅडम आणि सरांचे ते शब्द ऐकून माझेही डोळे पाणावले.
अर्ध्या तासात पेशंटला रिकव्हरी रुममध्ये हलवले.
तो पर्यत पोलिसांनी त्याच्या गावच्या इतर माणसांचा शोध लावला होता.
विष्णू
म्या जागा झालो. इकडतिकड पाहायला लागलो. मला काई सुदरनाच. म्या कुठ हाई? ही सफेद कापडातली मानसं कोन हाईत काईच कळना. तेवड्यात एक पोरगेलासा मुलगा ईचारायला लागला. “कसं वाटतय? तुमचं छोटस अॉपरेशन झालय.” पोटात जळजळ व्हायची का? पोटात दुखायचे का?
आता मला आटवाया लागलं. अरतिच्या मी त्या पायरीवर पडलो त्या लोकांनी इकड आणलं व्हय मला. पन मग सुभान्या कुठय?
येतील तुमच्या गावाकडची माणसं आत्ता. आठ दिवसानी तुम्हाला घरी जाता येईल. तो डॉक्टर सांगत व्हता.
म्या ईचार करत व्हतो. त्या द्येवानच मला मुंबईत यायाची बुद्धी दिली. त्येच्यामुळ आणि या समद्या भल्या मानसांच्या उपकारामुळं म्या वाचलो.
फकस्त एकच वाटत हुतं. द्येवानं या पावसाला बी अशीच जर चांगली बुद्धी दिली तर मग बाकी कोणाच्याच उपकाराची गरज गरीब शेतकऱ्याईला पडणार न्हाई.
डॉ. समिधा गांधी, पनवेल

(वरील कथा सत्य घटनेवर आधारित आहे)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.