मनमानसी- भाग क्रमांक ८
स्वयंशिस्त…
(पूर्वीची व आत्ताची…) लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य संपत्ती लाभे..! हे धर्म शास्त्रातील वाक्य तुम्हाला माहीतच आहे.
आपल्या आई – वडिलांच्या काळातली ते दिवस, त्या काळातील दिनचर्येचा आज विचार केला तर सध्याची जीवनशैली, ही फार भयंकर आहे ,असे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही..! जरा मागचा विचार केला तर त्यावेळची जीवनशैली जरा आठवा..संध्याकाळी ७ ते ७:३० पर्यंत घरातील कर्ता पुरुष म्हणजे बाबा बाहेरील कामे आटपून दिवे लावायच्या वेळेपर्यंत घरात असत. देवाजवळ दिवा लावून, शुभंकरोती ,रामरक्षा नित्यनेमाने म्हंटले जात, मग मुलांकडून परवचा म्हणजे पाढे नित्यनेमाने म्हणून नंतर मग जेवणं करून रात्री ८ ते ८:३० ला घरातील लहान, मोठे लवकर झोपी जात होते. अलार्म लावायची पण गरज नव्हती, कोंबड्याने बांग दिली कि जाग येत ..व पहाटे ४ ला दिवसाची व कामाची सुरूवात होत …! पुर्वी मुलांना चांगल्या सवयी व शिस्त लागावी म्हणून लहान वयात म्हणजे ५ वर्षानंतर काकांकडे, आत्याकडे शिकायला ठेवत असत. या विश्वासाने कि, मुलं घरी जास्त लाडावतात..आई बाबांचे ऐकत नाही. मग बाहेर ठेवले म्हणजे सगळ्याच गोष्टी शिकतील. असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उन्हाळ्याच्या सुट्टीत पण काका, मामा, यांच्याकडे राहायला पाठवत.
पण हल्ली असे घडतचं नाही. मुलांना थोडे रागावलेले सुद्धा चालत नाही. याला अंधळ प्रेम म्हणतात.
सांगायचे तात्पर्य हेच कि, हा लेख सध्याच्या पिढीतील नवदांपत्य..नवीन पिढीतील पालकांसाठी आहे. कारण मुलांना वय वर्षे ३ ते ८ वर्षापर्यंत स्वयंशिस्त लावली तर त्यांना शिकविलेल्या गोष्टी जास्त स्मरणात राहतात. तुम्ही म्हणाल वय वर्ष ८ का ? कारण स्मरणशक्ती व ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता या वयातच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच तर आपल्याकडे ८ व्या वर्षापर्यंत मुंज करतात.
पण आजच्या स्मार्ट युगात तर मुलांना मोबाईलमुळे सर्व प्रकारचा समज लवकर येतो, व जास्त कळायला लागते. पण योग्य वेळी चांगला दृष्टिकोन ठेवून मुलांना शिकविले तर मुलांचा सर्वांगीण विकास होतो.
पण या विज्ञान युगात सगळेच बदलत गेले…!! सध्या शिक्षण , अॉफिस व इतर कामे सुध्दा अॉनलाईन झाले आहे..! या सुखसोयींमुळे आरामाचे दिवस हवेहवेसे वाटू लागले..कम्फर्ट आयुष्य जगायची सवय अंगवळणी पडू लागली. सध्याच्या डिजिटल युगात आपण फक्त बटणांच्या खेळाचे खिलाडी झालोय …! कमी वेळेत होणारी कामे व वाटणारा कम्फर्टचा आनंद घेत असलो तरीही, यामुळेच मुलांच्या आरोग्यावर व लावलेल्या सवयी,शिस्तींचा बोजवारा उडाला आहे, पण पुढच्या काळात आपल्या मुलांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे.
सध्याचे नवीन पिढीतील सुजाण पालक म्हणून आपण स्वतःहा शिस्तीचे पालन करणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आपण जर स्वयंशिस्त पाळली नाही तर लहान / मोठी मुले आपले अनुकरण करत असतात…! म्हणूनच लावलेल्या सवयी, मूल्यशिक्षण व लहानपणी भोगलेली शिक्षा मुलांच्या मनावर कोरली जाते व त्यांच्या मनात मोठ्यांविषयी आदरयुक्त भावना , जाणीव आई वडिलांनीच निर्माण करणे योग्य आहे.
मान्य आहे कि,
जगाप्रमाणे चालावे लागते..! पण मोठ्या वयातील मुलांना वेळेचे व कामाचे नियोजन, व सतर्कता या सवयी पण असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मुले बाहेरील जगाचे अनुकरण करतात. योग्य दिशा मिळाली नाही तर अर्धवट मूल्यशिक्षण व संस्कारहिन असल्याने नको त्या गोष्टींचा विचार करत दिशाहीन होतात, भरकटतात, व वाईट मुलांच्या संगतीत वेळ व आयुष्य वाया घालवतात. दुर्दैवाने आई वडीलांना या गोष्टींचा काहीही पत्ता नसतो. वेळ निघून गेल्यानंतरच त्यांचे डोळे उघडतात. कारण नको तेवढे स्वातंत्र्य देवून आम्ही तर नवीन फॉरवर्ड विचारांचे बरं का ! असल्या अहंकारी स्वभावामुळे मुलांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते व मुलांच्या झालेल्या चुकांवर केवळ कोण काय म्हणेल? म्हणून पांघरूण घातले जाते..! पण असे केल्याने त्या अजाणत्या मुलांचे आयुष्यभर नुकसान होते.
सध्या बाहेरचे जग खुप भयंकर आहे, त्या कोवळ्या जीवांचा आत्मविश्वास वाढवू या..! पुढील भविष्यात अडचणींना तोंड देण्यासाठी त्यांना मनाने व शरीराने मजबूत करा..सध्याच्या घडीला हेच महत्त्वाचे आहे…!
स्वयंशिस्तीमुळे मनावरचा धाक कायम राहील..व वाईट सवयींपासुन ते नक्कीच दूर राहतील.
तुम्हाला लहानपणी लावलेले संस्कार व स्वयंशिस्त आठवा…विचार व दृष्टीकोन बदलुन, त्यांचे भविष्य उज्ज्वल करु या..! सौ. मानसी मंगेश जोशी. खांदा कॉलनी.







Be First to Comment