शब्द संगीत क्रमांक ४
समाधान (प्रसंग १)
महिला दिनाचं निमित्त होतं .
अॉफिस कडून योग विषयक माहिती साठी कर्जतच्या एका पाड्यावरती जाण्यासाठी सांगितलेलं.
मी वेळेवर पोहोचले पण कार्यक्रम किंवा काहीच तयारी दिसत नव्हती वाटले आपण योग्य ठिकाणी आलो की नाही ..?
म्हणून चौकशी केली तेव्हा तिथे एक चुणचुणीत मुलगी आली . म्हणाली चला मॕडम घरी .
जवळजवळ असणारी छोटी छोटी छप्पर असलेली घरं , त्यात एखादं कौलारू घरं. घरासमोर छोटं अंगण पण शेणाने सारवून स्वच्छ असलेलं . अंगणात आळू , कारली घोसाळींचे वेल छान डौलत होते.
आत गेल्यावर चुलीसमोर बसून एक माऊली तांदूळ निवडत होती .
जवळच भरपूर गुळ ठेवलेला होता .
मला बसायला घोंगडी अगोदरच टाकून ठेवलेली .
घराच्या भिंती मातीने सारवलेल्या आणि जमीन शेणाने सारवलेली स्वच्छ असं घर
घरात गरजेपुरतीच भांडी पण घासून लख्ख आपआपल्या जागी विसावलेली.
घरातली माऊली म्हणाली मी चहा करतो.
म्हणून तिने गुळाचा चहा ठेवला .
एका भांड्यात ओतून मला चहा दिला .
तोवर सगळ्या आजूबाजूच्या बऱ्याच जणी जमा झालेल्या . बाहेरून च डोकावून मला बघत होत्या . मी म्हटलं आत या. तेव्हा लाजल्या आणि एक दोघीच आत आल्या . त्यानंतर हळूहळू सगळ्याजणी जमा झाल्या .
मी सुरूवात करणार तेवढयात एक नव्वद वर्षाच्या आजी माझ्या जवळ आल्या . आजींचा उत्साह एखाद्या फुलाला आणि मुलाला लाजवेल असा होता .आजींनी मला हळदी – कुंकू लावलं आणि त्यांच्या नातीने आळूच्या पानावर सुंदर रंगानी काढलेली अतिशय सुबक अशी सरस्वती मला भेट म्हणून दिली .
मी बोलायला सुरूवात केली . मला ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद , कुतूहल किंवा समजून घेण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता.
थोडक्यात योग विषयक सांगून झाल्यानंतर त्यांना किती समजलं , किती लक्षात आलं याहून आपल्यापेक्षा किती तरी पटीने निसर्गाच्या वातावरणात निरोगी आयुष्य त्या जगतायत याचं मला खूप सारं समाधान वाटलं…!
त्यानंतर तिथे गुळ आणि खोबरं घातलेला गोड भात सगळ्यांनाच खायला दिला .
तोपर्यंत मुलींनी अंगणात असलेल्या भाज्या तोडून एका पिशवीत भरून ठेवल्या होत्या , त्या आणून माझ्या कडे दिल्या .
आणि पुन्हा लवकर येईन सांगून मी सर्वांचा निरोप घेतला.
( प्रसंग २ )
खारघरला महिला मंडळासाठी योग आणि मेडिटेशन बद्दल माहिती पर कार्यक्रम होता .
सुंदर आणि भव्य असा बंगला . सुबत्ता आणि जागोजाग आधुनिक सजावट .
चहापाणी झालं . कार्यक्रम झाला . आणि एकेक तक्रारी आल्या . कुणाला शारीरिक दुखणी , कुणाला मानसिक .
महिला अध्यक्ष असणाऱ्या मॕडम म्हणाल्या , मी गेली २० वर्ष झोपेच्या गोळ्या घेते पण झोपच येत नाही .
तोपर्यंत दुसऱ्या एक जण म्हणाल्या , मी नातवंड सांभाळतेय म्हणून माझी झोप पूर्ण होत नाही तर कुणाला एकत्र कुटुंब पद्धतीमुळं आराम मिळाला नाही याचं खूप सारं दुःख .
सर्व कार्यक्रम आटोपला. नाष्ट्यासाठी वेगवेगळे सहा / सात पदार्थ बाहेरून मागवलेले. अध्यक्ष मॕडमच्या मुलाने परदेशातून आणलेले परफ्युम आणि महागडी साडी मला भेट म्हणून दिली…!
तिथून निरोप घेतला पण डोळ्यांसमोर आळूच्या पानावरची सरस्वती सारखी दिसत होती ….!!!
काहीच जवळ नसलं तरी समाधान असणं खूप महत्त्वाचं !
अर्थात काही मिळवण्याचा प्रयत्न नक्की असावा परंतु सर्व काही आपल्या जवळ असून त्याचा मनभरून आनंद घेता येणंही तितकंच मोलाचं महत्त्वाचं नाही का….?
संगीता थोरात, नवीन पनवेल







वाह खूपच सुंदर लेख कवीकुमारी…अगदीच निसर्गरम्य वातावरण मनाला नेहमीच तल्लीन आणि शांतचित्त बहाल करतं.. त्या विपरीत कृत्रिम जीवन…👌👍