कथाविविधा
पसंत आहे सासू!! अहं आजेसासू!!!
गेले दोनतीन दिवस क्षमाची खूप गडबड सुरू होती. तिची होणारी सून गुरप्रित त्यांच्या घरी पहिल्यांदाच येणार होती. तिने घरातले पडदे बदलले सोफा पॉलिश केला , फुलदाणीत सुगंधी फुलांचे गुच्छ सजवले. मुख्य काम होते ते जेवायचा मेनू काय करावा. तिने ताजे पनीर, खवा आणून ठेवला. पंजाबी स्टाईलचे जेवण बनवायचे असा तिचा आणि जेवण बनवणाऱ्या ताईंचा बेत होता.
छोले, पुरी, पनीर बटर मसाला, रबडी आणि मग आईस्क्रीम असा साधारण तिचा बेत होता.
सुनेत्रा ताई म्हणजे क्षमाच्या सासूबाई आणि गुरुप्रीतच्या होणाऱ्या आजेसासूबाई सगळी गडबड पहात होत्या. गेले काही वर्षे त्यांनी या रोजच्या घबडग्यातून अंग काढून घेतले होते. त्या सगळ्यात असून नसल्यासारखा असायच्या.
तशा त्या धडाडीच्या होत्या. त्यांच्या तरुणपणात बाबांच्या म्हणजे क्षमाच्या सासऱ्यांच्या बरोबरीने किंवा काकणभर जास्तच श्रम करून त्यांचा व्यवसाय नावारूपाला आणला होता.
सुरूवातीला ज्या मशीनचे स्पेअरपार्टस ते बनवायचे ते अख्खे मशीनच आता त्यांची कंपनी बनवत होती. शुभम् म्हणजे क्षमाचा नवरा, क्षमा आणि आता वेदही आपापल्या परीने उद्योगव्यवसाय विस्तारत होते..
घरात फारसं लक्ष घालत नसल्या तरी सुनेत्रा ताईंच्या नजरेतून काहीही सुटत नसे. त्यात वेद आणि त्यांचे अगदी गुळपीठ जमले होते. त्या त्याची आजी कमी आणि मैत्रीण जास्त होत्या. त्यांना वेदशिवाय आणि वेदला त्यांच्याशिवाय अजिबात करमायचे नाही. वेदची कितीतरी गुपीते आईबाबांना माहीत नसली तरी त्याच्या आजीला बरोबर माहिती होती.
गुरप्रित आणि वेदची ओळख वेदच्या जीम मध्ये झाली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात व्हायला फार वेळ लागला नाही.
सुरुवातीला अळम् टळम् करणारा वेद न चुकता रोज जीमला जाऊ लागला.
रात्री उशिरापर्यंत तो घरातल्या बागेत फिरत फोनवर बोलताना दिसू लागला. स्वतःच्या दिसण्याबद्दल नेहमीच बेफिकीर असणारा वेद येताजाता आरशासमोर रेंगाळायला लागला तेव्हाच सुनेत्राबाईंनी ओळखले होते की काहीतरी स्पेशल दिसतय. त्यांनी जरा खोलात जाऊन चौकशी केल्यावर वेदने त्यांना गुरप्रीतबद्दल सांगितले. त्यांनीच मग शुभम् आणि क्षमाला वेदबरोबर गुरप्रीतच्या घरी पाठवले.
गुरप्रीतच्या घरच्यांच्या आदरसत्काराने आणि त्यांच्या आदबशीर वागण्याने हे तिघेही खुश झाले.
गुरप्रीत त्यांच्या भल्या मोठ्या एकत्र कुटुंबातील एकुलती एक लाडाची लेक होती. तिच्या तीन काका आणि दोन आत्या, कोणालाच मुलगी नव्हती. अकरा भावांची एकुलती एक बहीण!
आता तीच गुरप्रीत यांच्या घरी येणार म्हणून तिच्या स्वागताची जंगी तयारी सुरू होती. क्षमाने जरी स्वतःशी मेनू ठरवला असला तरी सुनेत्राबाईंना विचारल्याशिवाय मेनू फायनल करायचा नाही अशी तिची सवय होती. तशाही त्या तिला, “कर ग तुला हवय ते. आता मला कसली विचारतेस?” असच म्हणायच्या. क्वचित कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांची काही वेगळी आवड आठवली तर तेवढे त्या सांगायच्या.
पण यावेळी मात्र त्यांनी सगळाच्या सगळा मेनू बाद केला!
“हे बघ क्षमा, आता ती आपल्या घरात येणार आहे ना? मग तिला आपले पदार्थ, आपल्या रितीभाती समजायला हव्यात. ते पंजाबी पदार्थ नकोतच काही. तू सरळ पुरणपोळ्या, कटाची आमटी, मटकीची उसळ, काकडीची पचडी, अळूवड्या नाहीतर भजी, मसालेभात आणि मठ्ठा असा मेनू कर. आणि हो उकडीचे मोदकही कर. छान केळीच्या पानावर जेवण वाढ. आता आपल्याला कोणाला पाटावर बसून जेवता येणार नाही त्यामुळे डायनिंग टेबलवर बसू जेवायला.
आईंना वेद पंजाबी मुलीशी लग्न करतोय हे आवडले नाही की काय? तिला आपल्या पद्धती कळायला हव्यातच पण एकदमच सगळ्याची कशी सवय होणार? आणि तिला तर पंजाबी पद्धतीच्या जेवणाची सवय असणार. आपण तिच्यासाठी थोडे बदललो तर नाही का चालणार?आणि पुरणपोळी व मोदक हे कुठले कॉंबिनेशन आहे?
क्षमाच्या मनात हे विचार येत होते पण आईंशी वाद घालायची तिला सवयही नव्हती आणि इच्छाही.
तिने मग जेवण करणाऱ्या ताईच्या मदतीने छान साग्रसंगीत पुरणावरणाचा स्वैपाक केला.अगदी उकडीचे मोदकही बनवले. पण हे जेवण गुरप्रीतला आवडले नाही तर? असा विचार करून छोले भिजवून, उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते. पनीरची तयारी होतीच. थोडी कणीकही तिने मळून ठेवली होती.
बाराच्या सुमारास वेद गुरप्रीतला घेऊन घरी आला. वेदच्या गाडीचा आवाज ऐकल्यावर क्षमा स्वैपाकघरातून बाहेर आली. वेदबरोबर येणाऱ्या गुरप्रीतला बघून क्षमाला आश्चर्याचा धक्काच बसला. गुरप्रीत चक्क खणाची साडी नेसली होती! कपाळावर चंद्रकोर, केसातला गजरा आणि गळ्यातली ठुशी हे पाहून तर क्षमा खूपच खुश झाली. दाराशी आलेल्या सुनेत्राताईंची आणि वेदची नेत्रपल्लवी झालेली इतर कोणाच्या नाही पण गुरप्रीतच्या बरोबर लक्षात आली.
बड्या चाचीने आपल्याला साडी नेसायचे सुचवले हे छान झाले. तिने मनातल्या मनात चाचीला थॅंक्यू म्हटले.
घरात आल्यावर तिला ओवाळून क्षमाने तिचे स्वागत केले. सारे घर फिरवून दाखवले. स्वैपाकघर दाखवताना क्षमाने तिला काय खायला आवडते असे विचारताच गुरप्रीतनेही शहाण्या मुलीसारखे “मम्मीजी कुछ भी चलेगा” असे सांगितल्यावर क्षमाचा अर्धा जीव भांड्यात पडला. डायनिंग रुममध्ये केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ बघून वेद आणि शुभम् चा चेहरा बघण्यालायक झाला होता. त्या दोघांना वाटले होते की क्षमा काहीतरी पंजाबी स्टाईलचे पदार्थ बनवेल. वेदच्या चेहऱ्यावर आलेले टेंशन आणि पुसटशी नाराजी क्षमाला जाणवलीच. पण गुरप्रीत मात्र कमालीची आनंदली.
“मम्मीजी, आपको किसने बताया के मुझे पुरणाची पोळी और मोदक पसंद है और वॉऽव, ये अळूवडी है न? ये भी मुझे बेहद पसंद है. मेरी स्कूलफ्रेंड ले आया करती थी. मेरी मम्मी, चाची, दादी सबने कितनी बार ट्राय किया लेकीन उन्हे पुरणपोळी बनाने नही आती.थॅंक्यू मम्मीजी!”
अग मी नाही, दादीजींनी मेनू ठरवलाय. मी आपली छोले पुरी आणि पनीर मसाला आणि रबडी करणार होते.
” ओ दादीजी, आपको कहांसे समझा मुझे क्या खाना पसंद है? ये सब तो वेदको भी पता नही. एखाद चीज होती तो मै कोइन्सिडन्स है ऐसे सोचती थी लेकीन हर एक चीज मेरे पसंदकी बनाई है. ये नही हो सकता. बताओ नं दादीजी!!”
“हो आई, तुम्ही सांगाच. मलाही उत्सुकता वाटतेय.” क्षमा म्हणाली आणि आम्हालाही घरातले पुरूषही एका सुरात म्हणाले.
सुनेत्राबाई गालातल्या गालात हसत होत्या. ” काही नाही ग. मी म्हटले पोर पहिल्यांदाच घरी येतेय. आपल्याला तिच्या आवडीनिवडी माहिती नाहीत.
तेव्हा तिच्या घरच्या कोणालातरी विचारावे.अग मी जेव्हा लग्न करून सासरी आले तेव्हा पहिल्यांदा जेवायला बसले आणि मला ब्रम्हांड आठवले. माझ्या माहेरी पदार्थ बेताने तिखट असायचे आणि भाजी आमटीत गुळ असायचा. सासरी मात्र तिखटजाळ जेवण! काय करणार मग, पाण्याच्या घोटाबरोबर एकेक घास खात होते. माझ्या आत्येसासुबाईंच्या माझी अडचण लक्षात आली. त्या मग मला जेवताना रोज दुधसाखर द्यायच्या आणि माझ्यासाठी थोडी फिकी भाजी बनवायच्या. असे वाटले की माझ्यासारखी हिची अडचण नको व्हायला. मग काय, वेदच्या मित्राकडून हिच्या घरचा नंबर मिळवला. तिच्या मोठ्या काकूने फोन उचलला. त्यांनाच हिच्या आवडीनिवडी विचारल्या. आणि हो त्यांना आमच्यातले बोलणे सिक्रेट ठेवायला सांगितले.
वैसे हमारे जासूस चारो तरफ फैले हुए है! हे लक्षात ठेव हं.. हाहाहा!!
काय मग, तुला आवडले ना हे तुझे नवीन घर? “
” हां हां घर तो पसंद है ही. लेकीन दादी…. नही नही आजी, खूप खूप पसंद आहे. ” गुरप्रीत सुनेत्राताईंजवळ जात म्हणाली.
डॉ समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment