शब्द संगीत – क्र . ३
आशीर्वाद
साधारण २/३ वर्षापूर्वी कल्याणला डिसेंबर मधे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणं झालं होतं .
हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम होता .
कार्यक्रम सुरू झाला .
गायक कलाकार आपल्या गायकीचा कस लावून छान सादरीकरण करत होते . कार्यक्रम छान खुलत होता .
खरं तर शासन नियमाप्रमाणे रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम संपवणं बंधनकारक आहे . परंतु मधल्या अनियोजित कार्यक्रमामुळे आमची बरीच गाणी झाली नाहीत आणि दहा वाजले..!
त्यामुळे गायक कलाकार जरा नाराज झाले पण कार्यक्रम आवरावा लागणार होता जवळच एक हॉस्पिटल पण होते . त्यामुळं आयोजक म्हणाले कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाही .
शेवटचे गीत संपल्यानंतर कार्यक्रम संपल्याचे मी जाहीर केले आणि सर्वांचे आभार व्यक्त केले..!
सर्व कलाकार आपआपल्या सामानाची आवरा आवर करत होते .
मला कल्याण हून ठाणे आणि नंतर पनवेल असा लोकल ट्रेनचा प्रवास असल्यामुळे मी सर्वांचा निरोप घेऊन तिथून गडबडीने मंचावरून खाली उतरणार इतक्यात एक ५/६ वर्षाचा मुलगा हातात काही तरी घेऊन धडपडत माझ्याच दिशेने आला . मी त्याला काही विचारणार त्या आधीच तो म्हणाला
” रेखा आजीनं दिलं..” मला काहीच समजेना मी त्याला विचारलं ” बाळा तु कुणाला शोधतोयस का..? “
तो काहीच बोलला नाही फक्त “रेखा आजीनं दिलं..” एवढंच…!
त्याच्या हातामधे बऱ्यापैकी एक नवीन शाल होती आणि ती शाल तो मला देत होता . आणि “रेखा आजीनं दिलं..” हे सारखं बोलत होता .
शेवटी मी त्याला म्हणाले बाळा ही शाल माझी नाहीये आणि कुठेय तुझी आजी ? तेव्हा त्याने मंचाच्या मागच्या बाजूला अंधाराकडे कडे बोट दाखवलं . एक आजीबाई उभ्या होत्या तिकडे .
मी त्या मुलाचा हात पकडून आजींकडे गेले…!
मी काही बोलण्या अगोदरच त्या आजी म्हणाल्या ” अग माझ्या कडं पैसे किंवा काहीच नाही बाळा ” मला काहीच समजेना की आजी असं का बोलतायत…..!
मी आजीना म्हणाले ” आजी काही हवं होतं का तुम्हाला..? “
तेव्हा आजी म्हणाल्या नाही गं मी या नातवाला घेऊन फिरत होते . आवाज येतं होता म्हणून इकडं आले तर कार्यक्रम सुरू होता . म्हणून बसले ऐकायला…..तु किती चांगलं बोलत होतीस गं…..पण माझ्या कडं तुला बक्षीस म्हणून द्यायला काहीच नाही…अनं माझ्या कडं पैसं पण नाहीत म्हणून म्या ही माझी शाल तुला देतीय बाळा नाही म्हणू नकोस गं…..
खरं तर दाद घेण्यासाठी सुद्धा कौशल असावं लागतं असं म्हणतात……..पण…….?
क्षणभर काय बोलावं तेच कळेना अक्षरशः डोळे भरून आले माझे मी पायऱ्या उतरून खाली आले आणि आजीना म्हणाले अहो आजी अता थंडी आहे खूप , शाल राहू द्यात तुम्ही फक्त डोक्यावर हात ठेवा तोच आशीर्वाद माझ्या साठी आभाळा एवढा आहे… आणि मी नमस्कार करायला खाली वाकले….. तसं आजी म्हणाल्या अगं वाकु नकोस बाळा…. पाया फक्त तिकडं पडायचं तिकडं वाकायचं. मी वळून मागं पाहिलं तर मंचावर छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब , महात्मा फुले यांच्या तसबिरी होत्या..!
मी म्हणाले अहो आजी त्यांचा आशीर्वाद आणि आदर्श आहेच पण तुमचाही आशीर्वाद पाहिजेच की…..तसं डोळ्यांत पाणी आणून आजी म्हणाल्या अगं बाळा आम्ही फकस्त जल्म द्यायला कारणीभूत हाय बग….बाकीचं तुमी यांच्या आशीर्वादानं तुमच्या मेहनतीनं करतुतवानं मिळवताय असंच पुढं जा…!
एवढं बोलून आजीने ती शाल आपल्या हाताने माझ्या अंगावर पाघरली माझ्या डोक्यावरून , गालावरून हात फिरवला… आणि आजी भरल्या डोळ्यांनी आपल्या नातवाचा हात पकडून निघून गेल्या……!
आणि……..मी………..आयुष्यभरासाठी आशीर्वादरूपी मायेची उब पांघरूण त्या माऊलीच्या पाठमोऱ्या मुर्तीला मनोमन वंदन करून पहात राहिले…..!
संगीता थोरात.,
नवीन पनवेल .







खूपच सुंदर लेख
अशा अकस्मातपणे घडलेली घटना आयुष्यभर आठवणीचे ठरतात… अगदीच आजीच्या शाल सारखीच ! कायमच उबदार 👌👌