|| श्रीगुरवे नमः ||
साधारण मनुष्यजीवन
कागदाची होडी
वल्हवत सरते बालपण;
बालपण संपताच
दुधात केशरावानी येते तरुणपण…
बालपणीच्या होडीची
बनते मग मोठी नाव;
तरुणपण मिरवूनी
राजा-राणीचा रंगतो डाव…
तरुणपणीच्या नावेत
प्रवास करूनी;
येते हळूहळू वार्धक्य
मन, काया झुकुनी…
वार्धक्य म्हणजे
पुन्हा ते बालपण;
जगू पाहे नीटसे
तर आड येते शहाणपण…
वार्धक्याच्या दारात
असतो नावाडी उभा;
घेऊन जातो पैलतीरी
जिथे असते यमाची सभा…
कागदाची छोटीशी होडी ही अगदी निश्चिंतपणे डोलत-तरंगत असते; त्याप्रमाणे हे बालपण निरागस कोवळ्या मनाचे की ज्यावर संस्कारयुक्त विचार ठसवलेले कायमस्वरूपी राहतात. म्हणून बालपण हे भरभरून जगावं असे म्हटले जाते.
याच तरंगणाऱ्या होडीचे रूपांतर मोठ्या नावेत होते. तेव्हा मात्र शिंग फुटल्यागत तरुणपण डोकावत असते. यात स्वतःला खूप सावरणं-जपणं आवश्यक असते. हे यासाठी की बालपणात केलेल्या चुका या अजाणतेपणाने किंवा नकळतपणे घडू शकतात; ज्याच्यासाठी कठोर शिक्षा अशी नसते. पण तरुणपणात केलेल्या चुका या बऱ्याचशा मदांधामुळे होऊ शकतात; ज्याला पाप नाव दिले जाते.
तारुण्यात सळसळतं रक्त असते; ज्याचा उपयोग वेळीच सत्कर्मांकडे वळविला तर पुढील सर्व आनंदमय जीवन होते.
आता हीच नाव जेव्हा थांबते तेव्हा वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. तरीही बरेचदा मनुष्य अतिशहाणपणा करणे सोडत नाही.
वास्तविक हा वार्धक्याचा काळ अनुभवांची शिदोरी बांधत-शिकत परिपक्व झालेला असतो. अशा वेळी विविध छंदांबरोबर नामस्मरण, देवधर्माकडे जास्त कल ठेवून शांततेत उर्वरित आयुष्य घालवण्याचा असतो. यालाच आध्यात्मात वानप्रस्थाश्रम म्हणजे मनानेही संसारातून विरक्त होणे असे म्हणतात.
यानंतर आपली ही जीवनप्रवासाची नाव वल्हवणारा नावाडी त्याच्याकडे आपल्याला बोलावण्याची तयारी करत कधीही कोणाचा हा प्रवास संपवतो.
—लेखिका—
✍️ श्वेता जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment