कशासाठी! … पोटासाठी?
गावात दुष्काळ पडल्याचं हे सलग तिसरे वर्ष. यावर्षी तर कशाला कशाला पैसे नव्हते. घरातलं होत नव्हतं ते सगळं सावकाराच्या घशात गेलं. आता खायचे वांदे झाले. गावातली बरीचशी कुटुंब! जगायला म्हणून दुसऱ्या शहरात गेली होती.
आपण पण जावं की काय असा विचार नारायण आणि सरस्वती करत होते. पण मुख्य अडचण अशी होती की घरात म्हातारा म्हातारी होते. त्यांना दोघांनाच सोडून अनेक दिवस बाहेर राहाणे शक्य नव्हते. त्यात त्यांची धाकटी लेक फक्त दीड वर्षाची होती. या दुष्काळाने त्या तिघांचीही अगदीच रया गेली होती.
तशी मोठी दोघं जरा बऱ्या वयाची होती. मोठा गणेश बारा वर्षाचा तर धाकटा शंकर आठ वर्षाचा होता. दोन दिवस सारखा हाच विषय चालू होता. मुलांना नेले तर त्यांची शाळा बुडेल हा देखील प्रश्न होताच. शेवटी हो ना करता. नारायणाने मोठ्या गणेशला घेऊन मुंबईला सरस्वतीच्या बहिणीकडे जावे, काम मिळवावे. जम बसला की वर्ष सहा महिन्यांनी बाकीच्यांनी पण गावावरून मुंबईला जावे असे ठरले. गणेशची शाळा बुडेल, एखादे वर्ष मागे पडेल पण पुढच्या वर्षी त्याला परत शाळेत दाखल करता येईल असा विचार विनिमय झाला.
मुंबईला जायचे म्हणून गणेश खूपच आनंदात होता. घरी सरस्वती त्याला सतत काहीबाही सांगत राहायची.
मुंबई मोठे शहर आहे. तिथे बाबाला सोडून एकटा जाऊ नकोस. मावशीला त्रास देऊ नकोस. शहाण्यासारखा वाग. बाबा काम शोधायच्या गडबडीत असतील. त्यांची काळजी घे. स्वतःबरोबर बाबाची पण कामे कर. जमल्यास गणेशने पण एखादे छोटेमोठे काम शोधावे म्हणजे तेवढीच घराला मदत होईल. गणेश यातले किती ऐकत होता त्यालाच माहीत. आपण काहीतरी चुकीचे वागलो तर आपले मुंबईला जाणे होणार नाही एवढी समज गणेशला होतीच.त्यामुळे तो आईच्या हो ला हो करत होता. तसा तो मुळचाच शांत स्वभावाचा होता. अभ्यासातही त्याला बरी गती होती.
शाळा बुडणार याचे त्याला जरा वाईट वाटत होते पण मुंबईचे आकर्षण जास्त होते.. टिव्हीवर बघताना त्याला मुंबई म्हणजे जणू स्वर्ग असावा असेच वाटत होते.
सरस्वतीने तिच्या डोरल्यातले चार सोन्याचे मणी विकले त्यात आलेले पैसे नवऱ्याच्या स्वधीन केले. तो तयार नव्हताच सारे पैसे न्यायला कारण घरात देखील पैसा नव्हताच पण बरड पाला आणि बियाणाचा अर्धा कणगा यावर काही ही दिवस निघतील असा विचार करुन सरस्वतीने नारायणाला ते सारे पैसे घ्यायला लावले. दोन दिवसात तयारी करुन गावच्या म्हसोबाच्या आणि सरस्वतीच्या भरोशावर घरदार सोडून नारायण आणि गणेश मुंबईच्या मेल मध्ये बसले.
गणेशला तर कधी एकदा मुंबईला जातो असे झाले होते. दर पाच मिनिटांनी आली का मुंबई? आली का मुंबई? असे त्याचे चालू होते.
इथे नारायण त्याच्या विवंचनेत होता. त्याने साडवाला फोन करून सांगितले होते त्याच्यासाठी पण काहीतरी काम बघायला. साडूभाऊने आपले काम केले असेल का, आपण राहायचे कुठे? किती दिवस बायकोच्या बहिणीकडे राहायचे? आपण कामावर जाऊ तेव्हा या गणेशाचे काय? त्याला शाळेत घालता येईल का? आपण या पोराचे नुकसान तर नाही ना करत?असे विचार डोक्यात घुमत होते. नारायणाचे गणेशच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.
गणेशने चारपाच वेळा विचारल्यावर नारायण त्याला रागावला. हिरमुसला होऊन गणेश जरावेळ शांत बसला. हळूहळू गार वाऱ्याने आणि गाडीच्या हेलकाव्याने गणेश आणि नारायण दोघांचेही डोळे मिटायला लागले.
पहाटे नारायणाला जाग आली तेव्हा गाडी मुंबई पासून दोन तासांच्या अंतरावर होती. तो परत पेंगायला लागला. सकाळी आठच्या सुमारास गाडी दादर स्टेशनला लागली. एक हातात कपड्यांची बॅग आणि दुसऱ्या हातात गणेशचा हात घट्ट पखडून तो फलाटावर उतरला. आजुबाजुला माणसांचा कोलाहल आणि गर्दी बघून गणेश तर एकदमच बावरला. आपल्या करवंदी डोळ्यानी पिटी पिटी इकडे तिकडे पहात उभा राहिला. त्याच्या हाताला जोराचा हिसडा बसल्यावर तो भानावर आला.असे मधेच कुठेही उभे राहायचे नाही आणि बाबाचा हात सोडून कुठेही जायचे नाही. त्याला त्याच्या आईने बजावले होतेच. गर्दीत त्याचा हात सुटू नये म्हणून नारायण आटापिटा करत होता.आता गणेशही बाबाच्या मागे चटचट पावले उचलत चालायला लागला. मावशीचं घर वडाळ्याला होतं. घर कसलं, एक दहा बाय दहाची झोपडीच होती पण मुंबईत पोटाच्या पाठीमागे आलेल्यांना अशी झोपडी म्हणजे महालच वाटत होता. पत्ता विचारत विचारत ते दोघे सरस्वतीच्या घरी पोचले. आपल्या फोनमध्ये बॅलन्स कमी आहे याची जाणीव नारायणला होती. त्यामुळे त्याने पोचल्याचा मिसकॉल सरस्वतीला दिला. काही तसच कारण असल्याशिवाय उगाच बॅलन्स वाया घालवायचा नाही हे त्यांचे ठरलेलेच होते.
मेहुणीच्या घरी पोचल्यावर चहा पिऊन हातपाय बाहेरच्या सार्वजनिक नळावर धुवून नारायण लगेच काम शोधायला साडू भाऊ बरोबर बाहेर पडला. त्याच्या साडवाने पण दोन तीन ठिकाणी हमाल, हेल्परच्या कामासाठी सांगून ठेवले होते . आता गणेशला आपण काय करावे ते कळेचना.मावशीची दोन्ही मुले शाळेत गेली होती. मावशीला चार घरी धुणीभांडी करायला जायचे होते. तिने त्याला भाकरी खायला दिली. त्याला कुठे ठेवावे तिलाही कळेना. ती मग त्याला सोबत घेऊनच कामाला गेली. तिथल्या लोकांची चकचकीत घरे पाहून गणेश हरकून गेला. त्याला मावशीला खूप प्रश्न विचारायचे होते. त्याला टिव्ही, फ्रीज माहित होता पण त्या घरांमधली अनेक यंत्रे त्याला माहित नव्हती. आपण कधी अशा घरात राहू का त्याच्या मनात आले. तो जागेपणीच स्वप्न बघायला लागला.
दुपारी तो मावशीबरोबर घरी आला. जेवल्यावर त्याचे परत डोळे मिटायला लागले. संध्याकाळी त्याची भावंड घरी येईपर्यंत तो झोपूनच होता.
मावशीची दोन्ही मुले आली आणि गणेश खुश झाला. तिघे घराबाहेर हुंदडायला गेले. तशी खेळायला फार जागा नव्हतीच पण त्यातही ही मुले बरोबर जागा शोधून कुठे बॉलने व लाकडी फळकुटाने खेळ्त होती. नारायणही संध्याकाळी परतला. एका कंपनीत हमालाचे काम होते. महिन्याला आठेक हजार रुपये मिळाले असते. सरस्वती जोडीला आली तर तीपण चार घरची कामे करेल. आपलाही जम बसेल नारायणला वाटून गेले. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस त्याला थोडे पैसे मिळाले असते तोपर्यंत इथेच रहावे आणि लवकरच स्वतःची सोय बघावी असे त्याने मनाशी ठरवले.
घरच्या टीचभर मोरीत आंघोळ आणि सार्वजनिक शौचालयात इतर विधी उरकताना त्याला गावच्य् ऐसपैस मोकळ्या जागेची आठवण झाली. दुष्काळाचा आणि देवाचा नव्याने राग आला.
रात्री घराजवळच्या फुटपाथवर साडूबरोबर नारायणही झोपायला गेला. मुले मेव्हणीसोबत घरातच झोपायची पण गणेश बाबाला सोडून झोपायला तयार होईना मग त्याला घेऊन नारायण फुटपाथवर झोपायला गेला.
आजूबाजूला सतत चालू असणारी रहदारी आणि दिव्याच्या उजेडात या दोघांना अजिबात झोप येत नव्हती. कधीतरी उशिरा डोळा लागला.
गाडीच्या आवाजाने आणि जोरदार किंकाळीने नारायण जागा झाला. त्याच्या अगदी सहा इंच बाजूला एक भली मोठी गाडी फुटपाथवर चढली होती. काय होतय हे क्षणभर त्याला कळलेच नाही. आजूबाजूला ओरडाआरडा सुरु झाला. साडूभाऊने नारायणाला बाजूला खेचले. नारायणाला गणेश कुठेच दिसेना. गणेशच्या नावाने तो मोठमोठ्याने हाका मारू लागला. दारु पिऊन धुंदीत गाडी चालवणारा तो बड्या बापाचा मुलगा गाडीतून उतरला. पोलिस आले. इतर माणसे आली. नारायण वेड्यासारखा गणेशला शोधत होता.गाडीच्या धक्क्याने गणेश उडून समोरच्या रस्त्यावर उडाला होता आणि दिव्याच्या खांबाला आपटून त्याचा छोटासा देह फुटपाथच्या एका बाजूला निपचित पडला होता. इतरही तिघाचौघांना गाडीने उडवले होते पण गणेश जागच्या जागीच गेला होता. क्षणात होत्याचे नव्हते झाले. नारायण आणि गणेशच्या मावशीचा आक्रोश ऐकवत नव्हता. गणेशला हॉस्पिटल मध्ये नेण्यात काहीच अर्थ नाही हे ही कळत होते.पण मोठ्या आवाजात सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स आली. जखमींना आणि गणेशलाही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली. पुढचे सोपस्कार होऊन प्रेत ताब्यात घेण्यासाठी साडूभाऊ व त्यांच्या शेजारची दोन माणसे अॅम्ब्युलन्स बरोबर गेली.
रात्रभर वेगवेगळ्या चॅनलची माणसे येत होती काहीबाही विचारत होती. नारायणाचे डोके चालायचेच बंद झाले होते. तो काहीही उत्तर न देता सुन्न बसून होता. अचानक मोठ्या गाड्यांचा ताफा तिथे येऊन उभा राहिला. त्यातल्या रात्रीचा पण गॉगल घातलेल्या एकाने गणेशच्या नातेवाईकांची चौकशी करायला सुरूवात केली.
दुसरे दोघे चॅनलवाल्यांना काहीतरी सांगत होते. थोड्य् वेळच्या हुज्जतीनंतर, चॅनलवाल्यांची फोनाफोनी चालू झाली. एकेक करून चॅनलवाले तिथून निघून गेले.
आता झोपडपट्टीतील काही माणसे, नारायण आणि गणेशची मावशी फक्त रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून होते. मगासचा गॉगलवाला इसम नारायणजवळ आला. त्याला बघितल्यावर नारायण आणि त्याची मेहुणी उभे राहिले.
त्या माणसाने झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटल्याचे सांगितले. दोनचार सांत्वनाची वाक्ये बोलल्यानंतर त्याने बोलता बोलता नारायणाची इत्यंभूत माहिती काढली. नारायाणाची आर्थिक नड त्यांच्या ध्यानात आली आणि लगेच त्याच्या डोक्यात काही बेत तयार होऊ लागले. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चुकीची निस्तरानिस्तर त्याला नीट करायची होती. करोडोंचा मालक असणाऱ्या आपल्या मुलाचे भवितव्या तो असे तुरुंगात सडून देणार नव्हता तोही एका झोपडपट्टीतील दीड दमडीच्या मुलासाठी! त्याने धूर्तपणे डाव टाकायला सुरुवात केली.
“झाला प्रकार वाईट झाला. पण आता आपण जे झाले ते बदलू शकणार नाही.नक्की कोण गाडी चालवत होते हे तुम्ही पाहिलेत का? नाही नं. गाडी चालवणाऱ्याची पण काही चूक नाही. त्यांचा गाडी चालवताना गाडीवरचा ताबा गेला त्यामुळे हा अपघात झाला. उद्या कोर्टात केस केली तरी निर्णय मिळायला आणि न्याय मिळायला कितीतरी वर्षे लागतील. प्रत्येकवेळी एवढाला खर्च करून तुम्हाला कोर्टात खेटे घालायला जमणार का? आता गेलेला मुलगा परत तर येणार नाही. त्यापेक्षा आपण मांडवली करू. तुमची आयुष्यभराची ददात मिटेल. आम्हाला फक्त एका कागदावर सही करून द्या.
पैशाचे नाव काढताच नारायणच्या लोभी मेहुणीने मोठ्याने गळा काढला. आमचा मुलगा गेला. कितीपण पैशे दिले तरी तो काय परत येणारे का? तुम्ही काय पण बोलता साहेब. आम्हाला नको तुमचे पैसे. असे म्हणत तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली. तेवढ्यात साडूभाऊ अॅम्ब्युलन्समधून गणेशचे प्रेत घेऊन उतरले.
नारायणाच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वहात होता आता आपण कोणत्या तोंडाने घरी जाणार आणि सरस्वतीला काय उत्तर देणार त्याला कळतच नव्हते. आपल्याला कुठून शहरात यायची दुर्बुद्धी झाली असेच त्याला वाटत होते. साडूभाऊला एका बाजूला घेऊन मगासच्या गॉगलवाल्याने काहीतरी समजावून सांगितले. नारायणाची मेहुणीपण रडे आवरून काहीबाही सांगत होती.
नारायण एकटाच आपल्या लेकाचे प्रेत मांडीवर घेऊन बसला होता.जराशाने तो गॉगलवाला गेला.
साडूभाऊ नारायणाला सांगू लागला. “आपण झाले गेले बदलू शकत नाही. पोलिसात जायचा विचार पण करायला नको. पोलिस उलट आपल्यालाच त्रास देतील. रोज पोलिस स्टेशनात जायला आपल्याला जमणार नाही. गणेश गेला हे वंगाळच झालं पण आता पुढचा विचार करायला हवा. गावात तर दुष्काळ आहे. दातावर मारायला पैसे नाहीत. हा गॉगलवाला आपल्याला दहा लाख द्यायला तयार आहे. तुझी जन्माची ददात मिटेल. तू दुःख बाजूला ठेऊन विचार कर.तुझे, तुझ्या कुटुंबाचे कल्याण होईल. कर्ज फिटेल. जाणारा गेला पण माघारी राहिलेल्या दोघांना नीट वाढवता येईल.” असे काय आणि किती समजावत राहिला.
नारायणालाही क्षणभर वाटू लागले, काय हरकत आहे. आपली साली गरीबीच निघून जाईल. दहा लाख रुपये जन्मभर टाचा घासल्या एवढेच काय स्वतःला गहाण ठेवले तरी मिळणार नाहीत.
त्याच्या अशा विचारांची त्यालाच लाज वाटू लागली. पोराच्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा हैवान असल्यासारखे त्याला वाटले. सतत उलटासुलटा विचार करून आपले डोके फुटेल की काय असे त्याला वाटायला लागले.त्याला एकदा वाटले, सरळ सरस्वतीला फोन करावा आणि तिला सगळे सांगून टाकावे. पण त्याचा तेही करण्याचा धीर होईना.आजूबाजूचे सगळे, सरस्वतीची बहिण साडूभाऊ सगळे सतत त्याला पैसे घ्यायचा आग्रह करत होते. त्याचे एक मनही त्याला व्यवहारी बनण्याचा सल्ला देत होते. शेवटी विचारांवर विकाराने मात केलीच. नारायण पैसे घ्यायला तयार झाला.
साडूभाऊने लगेच त्या गॉगलवाल्याला फोन करून बोलवून घेतले. नारायणचा विचार बदलण्याआधी त्यांने नारायणाचा आंगठा कागदावर उमटवून घेतला..
छोटा गणेश खेळत खेळत दिव्याच्या खांबाला आपटला त्यात त्याचा अपघाती मृत्यू झाला .असे पंचनाम्यात लिहिले गेले. पंचांनी भराभर सह्या केल्या. पोलिसांच्या रिपोर्ट मध्येही वाहन अपघाताची नोंद दिसत नव्हती.
कोणत्याही चॅनलवर कसलीही ब्रेकिंग न्यूज देण्यात आली नाही.
नारायणाला दहा, साडूभाऊला एक आणखी कोणा कोणाला त्यांच्या कामाप्रमाणे खोके, पेट्या पोचत्या झाल्या.गॉगलवाल्याचा प्लॅन सक्सेसफूल झाला म्हणून त्याच्या घरी जोरदार पार्टी झाली.
मेहुणीचा मुलगा शाळेत जाण्या आधी गृहपाठ करताना, “पाणी डोक्यावरून जाऊ लागले की पिलावर पाय देऊन उभे राहून स्वतःचा जीव वाचविणाऱ्या माकडिणीची गोष्ट वाचत होता.
आणि नारायण परतीच्या गाडीने घरी जाताना पैशाचे गाठोडे वारंवार चाचपत होता.
समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment