मनमानसी-क्रमांक – ६
निरागस बाळांना जपा..
मुले म्हणजे देवाघरची फुले..पण ही फुलं..खुप कोमेजली आहेत,आई गं मला खुप कंटाळा आला गं.. बाहेर खेळायला जावू दे ना ! गेल्या वर्षभरापासून प्रत्येक घराघरात एकुण वातावरण खुप भयंकर व अशी संभाषण ऐकली कि,खुप गहिवरून येतं..! अनेक घरांमध्ये त्या कोवळ्या जीवाला आई बाबा हॉस्पिटलमध्ये जातांना सांगून गेले होते, कि बाळा आम्ही लवकरच घरी येवू..तु चांगला रहा..कुणाला त्रास देवू नको, रात्री आजीजवळ झोप ती तुला गोष्ट सांगेल..पण आता १५ दिवस झालेत, आई बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत, व्याकूळ झाले आहेत, पण अखेर आईबाबा वापस आलेच नाहीत..! शेवटी ते येतील,गावी गेलेत असे त्या निरागस बाळांना किती दिवस खोटेच सांगणार आहोत..!
सर्व वयोगटातील मुलांचे करोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर जाणे तर बंद आहेच पण कुठे मैदानी खेळ नाही तर शारीरिक श्रम नाही, उलट करमत नाही म्हणून त्यांना मोबाईलवर तर कधी टि.व्ही.समोर बसून सतत खात रहाण्याची सवय लागलीये, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, वजन वाढते आहे , याची कमी म्हणून कि काय,आता या निरागस बाळांवर पण कोरोनाने हल्ला करायला सुरुवात केली आहे.संसर्गाचा धोका जास्त असेल तर रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, पण ते ५,१० वर्षाचे चिमुकले रुग्णालयात आई बाबांना सोडून एकटे कसे राहतील.पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची संख्या जास्त आहे, ही मुले आईबाबांवर अवलंबून होते,अशा मुलांचा सांभाळ संरक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली बालसंगोपन केंद्रात केले जात आहे.अनेक निराधार बालक रस्त्यावर उपाशीपोटी फिरत आहेत. या बालकांची वेदना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे.
करोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच लहान मुलांना करोनाने घेरले आहे, पण हॉस्पिटलमध्ये ही मुले आईशिवाय एकटे कसे रहाणार..! कसे जेवणार, आईविना कसे झोपणार ..या प्रश्नाने अस्वस्थ झाले, पण परवा पेपरला बातमी वाचून बरं वाटलं कि मुलांसोबत राहण्यासाठी आईला परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या बाबांना,आईला कामावर जावेच लागते..कितीही काळजी घेतली तरीही मग त्यांच्यासोबत कुठूनतरी कोरोना विषाणू घरात प्रवेश करतोच ,आणि एक एक करून सगळ्यांना
संसर्गाची लागण होते. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागतेय, पण अशावेळी या मुलांकडे कोण बघणार ! या मुलांची आई जर कोरोना पॉझिटिव्ह आली तर ही चिमुकली मुलं आईला सोडून कशी राहणार..! ती काहीही न खाता आई आई करत, रडून तशीच झोपी जातायं..! आणि आई पुन्हा घरी आलीच नाही तर मग..अशा मानसिक तणावाखाली ,या कोवळ्या वयात मुलांच्या मनावर मानसिक परिणाम होतोय.असा विचार करून माझ्या मनाचा ठोका चुकला आणि विचार करून जीव कासावीस झाला.
पण ही परिस्थिती अनेक घराघरातील आहे.
अनेक कुटूंबातील कर्ते पुरुष,आणि कमी वयाच्या महिला या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होवून जगाचा निरोप घेत आहेत. इतकी भयंकर वेळ याआधी कधीही आली नव्हती. अनेकजण प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला, बेड मिळाला नाही, व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध झाले नाही म्हणून घरी न येता,ना भेटता..जगाचा निरोप घेवून घराला पोरके करून जात आहेत.मग घरात राहतात फक्त थकलेले आजी आजोबा आणि लहान मुले..ते या वयात कसे सांभाळतील मुलांना..! काळजीने मन सुन्न होत. १५ वर्षे वयोगटातील मुलांनी आपले दोन्हीही पालक गमावले आहेत. अशा मुलांसाठी १२ वी पर्यंत मोफत शिक्षण योजना तयार केली आहे.
१ ते १० वर्षे वयोगटातील अनेक छोटी मुले निराधार झाली आहेत,या कोवळ्या जीवांचा विचार करून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की, आर्थिक स्थिती चांगली आहे,पण पदरी मुलं नाहीत..म्हणजे असलेल्या व नसलेल्या पालकांनी या निराधार मुलांना दत्तक घेतले तर..या निराधार चिमुकल्यांना आधार मिळेल..आईवडीलांचे प्रेम मिळेल.तशी आपल्या देशात अनेक संवेदनशील पालक या गोष्टींसाठी पुढे सरसावले आहेत.दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली पण काही अडचणी येत आहेत. म्हणूनच कळकळीने सांगावेसे वाटते की,आता करोना संसर्गाची तिसरी लाटेचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगा.
या बालकांना
जपा..निसर्गाच्या विरुद्ध न जाता निरामय आयुष्य जगू या..
या संकटातून आपण निश्चित बाहेर पडू..निदान आपले कुटुंब व चिमुकल्यांच्या काळजीपोटी तरी स्वत:ची काळजी घ्या.आवश्यक तेव्हा बाहेर पडा, घरीच कुटुंबासोबत सुरक्षित रहा..!
सौ. मानसी जोशी.
खांदा कॉलनी.







Be First to Comment