॥श्री गुरवे नमः॥
विचारधारा-११ *माया*
मायेच्या अधीन सर्व;
मनुष्यजीवन हे पर्व;
संपता प्रलयकाळ, उभारी पुन्हा;
नवसृजनशील सारी ही माया… जन्माची उत्पत्ती ही मायेतून होते. याच मायेत लोभ, मद, मत्सर, मोह, भय, क्रोध हे षड्विकार दडलेले असतात. प्रेम, वात्सल्य यातही मायाच असते.
या ईश्वरशक्तीकडूनच प्रकृती व पुरुष असे दोन भाग निर्माण झाले. याच प्रकृतीचे कार्य म्हणून तिने सर्वत्र माया सृष्टीची रचना केली. पण या मायेचा भार जेव्हा मर्यादेबाहेर झाला, तेव्हा मात्र प्रलयकाळ तयार होऊन मृत्युदेवता यमदेव याची नेमणूक झाली.
थोडक्यात सांगायचे तर भूतलावरील मनुष्यजीवन हे त्या ईश्वरी शक्तीचे मनोरंजन आहे. अशा वेळी या जन्म-मृत्यूच्या तडाख्यातून बाहेर काढण्यासाठी याच शक्तीने सगुण गुरूचे रूप घेऊन सत्कर्मी, पुण्यवान भक्तांना तारण्यास व पापी जीवांस सन्मार्ग दाखविण्यास सुरुवात केली.
म्हणून आपल्या या मर्त्यलोकावर सगुण गुरूला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.
तेव्हा या मायेत गुंतून किती जन्म घेत राहायचे का मायाविरहित जीवन जगून सगुण गुरूच्या आधाराने स्वतःचा उत्कर्ष साधत मोक्षपद गाठायचे? यावर विचार करावा व नक्की त्यानुसार आचरण करावे.
येणारा क्षण हा जसा जाण्यासाठी असतो, अगदी तसेच प्रत्येक जन्माला आलेला जीव याचा मृत्यू हा ठरलेला असतो. मग त्यात न गुंतता जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत थोर संत रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, ‘सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे,’ असे जगावे.
✍️लेखिका✍️
श्वेता जोशी,
नवीन पनवेल.







Be First to Comment