Press "Enter" to skip to content

कथाविविधा

कथाविविधा

मम्माज् बॉय ×मम्माज् गर्ल

आम्ही दोघे कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होतो. “ही मुलगी छान आहे” अशी मनातल्या मनात तिची दखल घेण्यापासून ते तिच्याशी मैत्री करून तिच्याबरोबर लग्नाच्या आणाभाका घेण्यापर्यंतचा प्रवास पुढील एकदोन वर्षात पार पडला.
कॉलेज संपल्यावर मी बिझनेस मॅनेजमेंट केले तर तिने कॉम्प्युटर मध्ये मास्टर्स केले. तरीही आमची मैत्री अबाधित राहिली.
लवकरच मला बंगलोरला नोकरी मिळाली. मी बंगलोरला शिफ्ट झालो. एव्हाना आमच्या घरातही आमची लव्हस्टोरी सगळ्यांना कळली होती. घरुन आम्हाला लग्न करायची घाई करणे सुरू झाले.
साग्रसंगीतपणे आमचा विवाह संपन्न झाला. प्रथेप्रमाणे मालदीवला हनिमूनही पार पडला. मी लवकरच बंगलोरला गेलो. काही दिवस माझ्या घरी, काही दिवस तिच्या घरी राहून सोबतीला हे भले मोठे सामान घेऊन ती पण बंगलोरला आली.
तिलाही नोकरी मिळाली होती. फक्त तिला एका महिन्यानंतर जॉईन व्हायचे होते.
सुरुवातीचे चार दिवस मी सुट्टी घेतली. दोघांनी मिळून घर लावू असा विचार मी केला होता. गेले वर्षभर मी एकटाच रहात असल्याने मला इंडिपेंडंट आयुष्याची सवय झाली होती. पण ती इथे नवीन होती. त्यामुळे ती रुळेपर्यंत चार दिवस आपण घरीच थांबावे असा मी विचार केला होता.
मी सुट्टी घेतल्याचे तिला सांगितले नव्हते. सकाळी उठून मी बाहेर आलो तर ही आधीच उठून सामानाचे खोके उघडून बसली होती. मोबाईलवर व्हिडिओ कॉल सुरू होता. तिची आई तिला कशात काय आहे आणि ते कुठे ठेवायचे याच्या सूचनावजा आदेश देत होती.
मी उठल्याचे बघून तिने माझ्यासाठी चहाचे आधण ठेवले.”अजय, उठलास तू? तुला कंपनीत जायचे असेल नं. मी किचनमधल्या वस्तू आवरेन नंतर तुझ्यासाठी काहीतरी बनवते.” बोलता बोलता तिने फ्रीज उघडला आणि अंडी बाहेर काढली.
“अग, तू घर लावते आहेस नं. मी करतो चहा.” मी म्हणालो.
“अरे अजय, तुला चहा करता येतो.”
इतका वेळ आमचा संवाद आई ऐकत होत्या. मला एकदम अवघडल्यासारखे वाटले.
” आई, मी चहाच काय, जेवणही फर्स्टक्लास बनवतो. फक्त पोळ्या अजून जमत नाहीत.”
आईंचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
” अय्या खरच? तुला एवढे सगळे येते. मग एक सांगू का? तिला ना चहात साखर कमी लागते आणि सोने, मी तुला चहाचा मसाला दिलाय बरोबर. त्या निळ्या खोक्यात छोटी बाटली आहे. त्यावर मी चहामसाला असं लिहिलेले पण आहे.तो मसाला दे त्याला. मसाला चहा छान लागतो. आज गुरूवार आहे. गुरुवारी नॉनवेज खाऊ नये म्हणाव सोनीला. आज अंड खाऊ नका. ब्रेकफास्टला ब्रेड किंवा इतर काहीतरी खा. कळलं का? ” तिची आई फोनवरून असंख्य सूचना देऊ लागली. बॅकग्राऊंडला बाबा काहीतरी बोलत होते तर त्याकडे त्या चक्क दुर्लक्ष करत होत्या. मला संधी मिळताच मी त्यांना म्हणालो,” आई बाबांना काहीतरी विचारायचंय बहुतेक तुम्हाला. तुम्ही त्यांच्याशी बोला. किचन काय आम्ही दोघे मिळून लावू चहा पिऊन झाल्यावर . अच्छा बाय”
आणि यावर त्यांना फारसे बोलायची संधी न देताच मी फोन कट केला.
“काय हे, आई कुठे गेली? मी चहा मसाला आणायला गेले होते तितक्यात तिने फोन बंद का केला? आता मी किचन कसं लावणार? “आईंची सोनी आणि माझी सोनाली फणफणली.
” अग, चिल. मी आहे ना? आपण आधी चहा पिऊया.किचनमध्ये बऱ्याच वस्तू आहेत. मी अधूनमधून पोळ्या सोडून बाकीचा स्वैपाक करायचो. त्यामुळे आपल्याला फारसे सामान लागणारच नाही. आणि हो सुरूवातीचे काही दिवस मी जेवणाचा डबा मागवतोय. मग एकदा घर लावून, आवरून झाले की आपण घरी स्वैपाक करायला सुरुवात करू.
चल, आता सोनीला मसाला चाय प्यायचाय नं? चहा तयार आहे हं सोने. कळलं का? “
” चेष्टा करतोस ना माझी. आई म्हणालीच होती. की सगळेच पुरुष बायकांच्या माहेरच्यांची आणि विशेषतः सासूची भारी टिंगल
करतात.स्वैपाकघरात काय आणि किती सामान लागते याची पुरुषांना काय कल्पना असणार? आपल्यालाच राब राब राबायला लागतं. संसार करायचा म्हणजे खायचे काम नाही. आईचं बरोबरच होतं”
” अशी काय चिडतेस ग? खरं सांगू का तू रागवावीस म्हणून तर मी असं म्हणालो. रागावल्यावर काय मारू दिसतेस. हाऽय मार डाला. आणखी एक गंमत सांगू? पुढचे चार दिवस मी सुट्टी घेतलेली आहे. आपण मिळून घर सजवायचे म्हणून..
” काय सांगतोस! सो नाईस आॉफ यू!” सोना एकदम खूश झाली. मी आईंचा फोन कट केला हे बरेच केले म्हणायचे. नाहीतर त्यांना शॉकिंग दृश्य बघायला मिळाले असते. आत्ता जरा कुठे मस्त माहौल जमत होता.वातावरणात गुलाबी रंग भरले जात होते. माझे सुट्टी घेणे कारणी लागणार होते. आणि…. पुन्हा तिचा फोन चिवचिवला.
” काय ग झाला का चहा पिऊन? मी पण यांचा चहा नाष्टा आवरला. आता आपण तुझं किचन लावायला घेऊ. “
मी कितीही म्हणालो की आई मी आहेना. तुम्हाला त्रास नको तरी त्यांनी काही ऐकलं नाही.
” पुरुषांना यातलं काय कळतं? तू लक्ष नको देऊस कळलं का? ” असा सल्ला त्यांनी लेकीला दिला आणि त्यांची लेक आणि मोबाईलमधल्या त्या किचनमध्ये गेल्या.
मी मग हॉल आणि बेडरूममधली आवराआवरी केली.तिचेही किचन बर्‍यापैकी आवरून झाले होते.तिच्या आईनेही बहुतेक घरकामासाठी आणि स्वैपाकासाठी टाइमप्लीज घेतली असावी. थोड्याच वेळात आमचा डबा आला. आमचे जेवण झाले. दुपारी दोघांनीही मस्त ताणून दिली. संध्याकाळी पाचच्या सुमारास सोनालीचा फोन वाजला. सकाळभर सतत फोन चालू असल्याने डिस्चार्ज झालेला फोन तिने चार्जिंगला ठेवलेला होता. बेडवरून उठून फोन कोणी उचलायचा यावरून आमची थोडी शाब्दिक चकमक झाली. तेवढ्यात फोन वाजायचा बंद झाला. पुन्हा झोपायचा प्रयत्न करणार इतक्यात पुन्हा फोन वाजला. “अग तूच उठ. कन्फर्म तुझ्या आईचाच फोन असणार.” मी म्हणालो. सोनाली तणतणत उठली. फोन खरच तिच्या आईचाच होता. तो ही व्हिडीओ कॉल
“हे काय सोने अजून झोपलीच का आहेस? उठ, आवर. आणि हो अजयला पण उठव. संध्याकाळच्या वेळी असं झोपून राहू नाही. थोड्यावेळाने देवाजवळ दिवा लावायला विसरू नकोस… अगबाई देव्हाऱ्यावरून आठवलं. तुझ्या घरात देव्हारा कुठे ठेवलाय? मी सकाळी विचारायलाच विसरले.अजयला विचार देव्हाऱ्याची जागा भटजींना विचारूनच ठरवलीय ना? “
” आई, देव्हारा योग्य तिथेच ठेवलाय. त्याने इथल्या भटजींना विचारले होते. अजयने इथे आल्यावर मागच्या वर्षी या घराचे फोटो पाठवले होते नं. तेव्हाच तो म्हणाला होता. मला आठवतय.”
सोनाली फोनवर बोलत बोलत रुमच्या बाहेर गेली म्हणून मला पुढचे बोलणे ऐकू आले नाही.
मी बेडवर पडल्या पडल्या आमच्या लग्नाआधीची सोनाली आठवत होतो. तेव्हा तिचा तिच्या आईशी बोलतानाचा टोन, आईशी होणारे वाद वगैरे बघून मला तिच्या आईशी तिचे फारसे पटत नसावे असे वाटायचे.
देव, देव्हारा या सगळ्याचा तिच्याशी काही संबंध असेल असे तर मला स्वप्नातही वाटले नव्हते. तसा माझाही या सगळ्यावर खूप विश्वास आहे असे नाही पण मला छान सजवलेला देव्हारा बघायला आवडते आणि सकाळी घराबाहेर पडताना त्या देव्हाऱ्याचे आणि देवाचे दर्शन घेऊन बाहेर पडले की छान पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळतात म्हणून देव्हारा आणि गणपतीची सुबक मुर्ती मी घेऊन आलो. पण सोनाली आणि देवपुजा हे कॉम्बिनेशन काही केल्या मला पचत नव्हते. लग्नाआधी मला वाटायचे की प्रेमविवाहात आपण होणाऱ्या बायकोला पूर्णपणे ओळखत असतो. तिचा स्वभाव आपल्याला माहीत असतो. आता कळतय की असं काही नसतच. हे काही बरोबर नाही राव..
आमचे लग्न झाल्यापासून मी पहात होतो. सोनाली एकदम वेगळीच वागत होती. जणू ही कोणी दुसरीच मुलगी आहे जिच्याशी मी लग्न केलय. ती म्हणजे एकदम आज्ञाधारक अशी लेडी श्रावणबाळ झालेली होती. आईं वाक्यं प्रमाणम् अशी तिची वर्तणूक होती. हे म्हणजे सिलॅबसच्या बाहेरची प्रश्नपत्रिका आपल्यासारखेच होते..
माझ्या सुट्टीच्या पुढच्या तीन दिवसात रोज किमान तीन ते चार तास सोनाली तिच्या आईशी बोलत असे. चुकून तिच्या बाबांनी फोन उचलला तर परिक्षेतल्या एका वाक्यात उत्तरे द्या सारखी ती एखाद दोन प्रश्न झाल्यावर, बाबा आई कुठे आहे असा प्रश्न ती लग्गेचच विचारत असे. आईने फोन घेतल्यावर मात्र प्रश्नांचे स्वरुप बदलून दीर्घोत्तरी प्रश्न सुरू होत. तिची आई तिला फोनवरून विविध सांसारिक आणि व्यवहारिक सल्ले देत असावी बहुतेक. अगदी आम्ही नवीन मोलकरीण ठेवली तर त्यांना तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. हळूहळू मला तर सोनालीच्या आई आमच्याकडे रहायला आल्या असल्याचा फील येत होता. “
मला एक कळत नाही. या आयांना जे काही आपल्या मुलामुलींना शिकवायचे असते ते लग्ना आधीच का शिकवत नाहीत? लग्नाआधीच जर शिकवले तर लग्नानंतर आयांची आणि मुलांचीही त्रेधातिरपीट उडणार नाही.
तसा माझ्या आईबाबांचा पण फोन येत असे रोजच. आई बाबा दोघेही आम्हा दोघांशी व्यवस्थित गप्पा मारायचे. माझी आई देखील मला किंवा सोनालीला काही बाही सांगायची. तेव्हाचे सोनालीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिच्या आईचे सल्ले ऐकतानाचे भाव सारखेच नसतात एवढे मला नक्की जाणवले.
अर्थात सासू आणि आई यांना सारख्या तराजूत तोलणे मलासुद्धा कुठे शक्य झाले होते म्हणा. अचानक एक दिवस कोण्या अनोळखी बाईला आपण आईची जागा कशी देऊ शकू?
कोणालाच हे शक्य नाही हे कळण्याइतका मी सुज्ञ आहेच.

उद्यापासून मी माझे रुटीन सुरू करणार होतो. आजची संध्याकाळ आम्ही दोघे फिरायला आणि मग जेवायला बाहेर जाणार होतो. सोनालीने अर्थातच ही बातमी आईंना सांगितली. “वाऽ. एंजॉय करा पण नवीन अनोळखी शहरात रात्री उशिरा पर्यंत बाहेर राहू नका. वेळेत घरी या.” असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
मी काही बोललो नाही तरी मला त्यांचे सततचे सल्ले देणे आणि आमच्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माहीत करून घेण्याचा आटापिटा करणे अजिबात आवडत नव्हते. आम्हाला आमचे आमचे जगू द्या. चुकलो, धडपडलो तरच त्यातून आम्ही काही शिकू नं. पण त्यांना कोण आणि कसे सांगणार. सोनालीला सांगणे अशक्य होते कारण ती एकदम मम्माज् गर्ल झाली होती.
न रहावून दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर मी आईला फोन केला.
आईला गेल्या चार दिवसात झालेल्या घडामोडी सांगितल्या.
” जाम वैताग आलाय ग. इथे आल्यापासून बघतोय, सारखे मम्मा, मम्मा आणि मम्मा. अग छोटे छोटे निर्णय घेताना पण मम्मा? याला काय अर्थ आहे? आणि तिच्या आईला पण जणू दुसरा काही उद्योग नसल्यासारखे सोनूबेटा असे कर,सोने मी सांगते तसे कर. कळलं का?? हेच सारखे सुरू असते. मी सोनालीला काहीच बोललो नाही पण मला समजत नाही मी काय करू. म्हणून मग मी तुला फोन केला.”
इतका वेळ माझे बोलणे शांतपणे ऐकणारी माझी आई, माझे शेवटचे वाक्य ऐकून हसायलाच लागली.
” हसते काय ग… मी एवढा सिरियस प्रॉब्लेम सांगतोय आणि तुला गंमत वाटतेय.. “माझ्या नकळत माझा आवाज जरा चढलाच. माझ्या बाजूच्या क्यूबिकल मधल्या सुंदरराजनने भुवई उंचावून वर पाहिले.
मी त्याच्याकडे पाहून थम्सअप केला.
“अरे, हसू नाही तर काय करू?आपली बायको संसारातले छोटेमोठे प्रश्न सोडविण्यासाठी तिच्या आईची मदत घेते यावर उपाय शोधण्यासाठी तू काय करतोस? तर तुझ्या आईची मदत घेतोस!!आता मला हसू येणार नाहीतर काय?”
“तूच मला सगळ्यात जवळची आहेस. तसा एखाद्या मित्राशी बोलू शकलो असतो. पण तू म्हणतेस ना की आपल्या घरातल्या काहीही गोष्टी, विशेषतः आपल्या माणसांच्या तक्रारी बाहेरच्याला सांगू नयेत म्हणून मग मी तुलाच फोन केला. “
” हो रे राजा. तू बरोबरच केलेस. अरे जसा एखादा प्रॉब्लेम तुझ्याच्याने सुटला नाही तर तू मला किंवा बाबाला विचारतोस ना? तसेच ती तिच्या आईला विचारते. तुला मी जवळची वाटते. तिला तिची आई जवळची वाटते. तसेही तुम्हाला संसाराचा काडीचाही अनुभव नाही. मग तुम्हाला सुरुवातीला काही ना काही अडचणी येणारच. तिच्या आईला तशा अडचणी तुम्हाला येऊ नयेत असे वाटणे स्वाभाविक आहे. त्या कदाचित सोनालीच्या बाबतीत जास्त प्रोटेक्टिव्ह असतील. इतकी वर्षे त्यांचे जग सोनालीभोवतीच फिरत असेल. आता अचानक त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढायचा त्यांचा हा मार्ग असेल. त्यांना दोघींनाही नव्या आयुष्यात रुळायला थोडा वेळ दे रे. “
” म्हणजे आता हे असेच चालणार? मी याची सवय करून घ्यायची का? “
मी आवंढा गिळत विचारले.
” नाही रे. असच काही नाही. आणि हे जर आणखी काही दिवस असंच सुरू राहिले आणि तुला त्याचा त्रास वाटत असेल तर तू ते सोनालीपाशी आणि तिच्या आईपाशी मोकळेपणाने बोल. त्यांचे म्हणणे पण नीट ऐकून घे आणि सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न कर. आता जसे सोनालीने माझ्याशी वागावे असे तुला वाटते तसे तू तिच्या आईशी वागावेस हेच उत्तम. काय, काही कळलं का? “

” येस आई. नीट कळले आणि पटले पण. “
” मग ठेऊ फोन. आत्ता कंपनीत असशील नं. चल कामाकडे लक्ष दे. बाय “
कामाची फाईल उघडता उघडता माझ्या अचानक लक्षात आले की सोनाली जशी मम्माज् गर्ल आहे तसा मी पण मम्माज् बॉय आहे.

डॉ. समिधा ययाती गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.