Press "Enter" to skip to content

मनमानसी भाग क्रमांक-५

मनमानसी भाग क्रमांक-५ *साद - प्रतिसाद*

या जीवसृष्टीवर सर्व प्रकारच्या सजीवांना निसर्गाने विशिष्ट प्रकारचे आवाज दिले आहेत. मी अनेक वेळा ऐकले आहे कि, पक्षांनी किलबिलाट केला म्हणजे ते आकाशात विहार करतच,आनंद व्यक्त करतात आणि,पंख फडफडले कि, मदतीसाठी साद घालतात, त्या पक्षाचा आवाज ऐकून सगळे पक्षी त्याच्या मदतीला धावून येतात. हे झाले पक्षांविषयी..!
जसे जंगलातील हत्ती विशिष्ट प्रकारच्या 25 आवाजाने साद घालतो. जेव्हा हत्ती चित्कारतो तेव्हा तो भयंकर अस्वस्थ होतो, तो काही अडचणीत सापडला,तर त्याची साद काहीशी हळवी व काळजी वाटणारी असते ते ऐकून त्याचे साथी मोठ्या आवाजाने प्रतिसाद देत लगेच धावून येतात.निसर्गाने प्रत्येकाला स्वसंरक्षणासाठी साद घालण्याची, भाव व्यक्त करण्याची देणगीच दिली आहे. जसे मांजर ,कुत्रा , या पाळीव प्राण्यांची पण एक भाषा असते.
तसेच या पृथ्वीवर सगळ्या प्राण्यांमध्ये माणुस हा एकमेव असा प्राणी आहे की, त्याला निसर्गाने “वाचा बहाल केली आहे.तो त्याचे म्हणणे बोलण्यातून व्यक्त करतो.
पण काही वर्षापुर्वी माणूस घरातील कुरबुरी असोत किंवा काही मदतीची हाक असो, तो मोकळेपणाने आपले म्हणणे सांगत असे. कामावर जातांना,बाहेरगावी निघतांना, किंवा अडचणीत असतांना मोठ्या आवाजात सांगून जात, त्यामुळे सगळ्या गल्लीला कळतं होते, कि घरात कोण कुठे चालले आहे.! काय मदत हवी म्हणून लगेचच शेजारी मदतीला धावून येत. बाहेरगावी जायचे असेल तरीही मोठ्याने बोलायची,व बोलवायची पद्धत होती, म्हणजेच कुणी साद दिली कि प्रतिसाद मिळत असे.
पण जसजसे दिवस बदलतात तशी माणसेही बदलू लागली..त्यामुळे कुणाला सांगणेही धोक्याचे झाले, माणूस अबोल होवू लागला, व नात्याने दूरही जावू लागला..मग कालांतराने हे स्मार्ट फोन आले आणि प्रत्येकाला एकटे राहणे आवडू लागले. खरं म्हणजे माणसाच्या अडचणी सांगायची सवय नसल्याने अवस्था खुप दयनीय झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या कुठल्याही गोष्टीची कमी नसते,म्हणूनच आपल्या माणसांची गरज नाही वाटत, इच्छा असून देखील केवळ अहंकारामुळे बोलत नसल्याने अनेकजण मोठ्या तणावाचे जीवन जगत आहे. त्यांच्यात कधीतरी मतभेद ,भांडणे झालेली असतात ! ह्याच गोष्टी अनेकवर्ष मनाच्या आतल्या कप्प्यांमध्ये शेवटपर्यंत जपून ठेवतात. शेवटी आयुष्याची संध्याकाळ होते. शरीर थकते , स्मरणशक्ती पण कमी व्हायला लागते.मग मात्र आपल्या माणसांची आठवण होते. त्यांच्याशी बोलावेसे वाटते, पण थकल्यामुळे बोलू शकत नाही.म्हणजेच काय तर शेवटच्या क्षणापर्यंत बोलायचे राहूनच जाते.
आपल्या दुरावलेल्या नात्यांना जवळ करण्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो, कमीपणा वाटतो.
पण लहानपणी खाऊवरुन, कपड्यांवरून भांडत क्षणार्धात विसरून एका ताटात जेवत होतो हे काही वर्षे मागे जावून जरा आठवावे. वयाचा, मानाचा विचार न करता आपलीच भावंडे आहेत, म्हणून एकाने पुढाकार घेऊन वेळीच साद घातली तर भावनांना व अश्रूंना मोकळी वाट मिळेल व समोरुन सकारात्मक प्रतिसाद मिळेल. माणसांच्या मनात कुठल्याही प्रकारची सल राहणार नाही. सगळ्यांसोबत दिलखुलासपणे जगत, एकमेकांचे सुख दु:ख वाटून घेत, राहीलेले आयुष्य तो समाधानाने व आनंदाने व्यतीत करेल …!

सौ. मानसी मंगेश जोशी.
खांदा कॉलनी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.