शब्द संगीत क्र- १*आनंदाचा घनु*
जीवन म्हणजे पदोपदीचा संघर्ष !
आपल्या संत – महंतांनी याला एक संग्राम असं म्हंटलं आहे .
असं हे सुख आणि दुःखाने नटलेलं जीवन !
सुख पाहता जवापडे | दुःख पर्वताएवढे ||
हे जीवन प्रत्येकाला आपआपल्या दृष्टिकोनातून वेगवेगळं दिसतं !
आपल्या शाळा – महाविद्यालयात आपल्याला अनेक विषयांचं शिक्षण शिकवतात पण जीवनात आपल्या आयुष्यात आनंद कसा मिळवायचा हे मात्र शिकवत नाहीत .
परंतु आपल्या आयुष्यात शिकण्यापेक्षा माहीत असण्यापेक्षा समजून घेणं सोपं आणि चांगलं असतं
आपल्याला ओळखणारी माणसं शेकडो , हजारो असली तरी समजून घेणारी माणसं फार कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी कमी असतात .
अगदी याच आपल्या माणसां सोबत थेंबागत जगताना आभाळभर आनंद आपण कवेत घेत असतो.
काही वर्ष अगोदर थोडसं डोकावलं तर लक्षात येत कोणतीही दळणवळण , मनोरंजन किंवा संवादाची माध्यम खूप कमी होती पण माणूस सुखी , आनदी होता.
आज बटनाच्या एका क्लिक वर सारं सुख हात जोडून उभा आहे. पण आपण खरंच सुखी म्हणण्यापेक्षा आनंदी आहोत का..?
हा विचार करण्याजोगा विचार आहे .
कारण इमारतीच्या उंची वाढल्या पण व्यक्तीमत्वाच्या उंची खूपच खुज्या झाल्यायत .
असं म्हटलं जातं की हसणाऱ्याला हसू मिळतं आणि रडणाऱ्याला रडण्यासाठी अजून कारण मिळतं .
कारण सजगपणे जगताना जो आनंद आहे तो अनुभवता येतो .
आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांच्या सुख दुःखात सहभागी होऊन त्यांना काही अंशी का होईना आनंदी राहण्यासाठी मदत करता येते .
मग आपल्या माणसां सोबत आनंदानं जगताना मनातल्या वेदनेवर आपण एक आनंदाचं रोपटं रूजवुया का..?
मायेनं , जिव्हाळ्यानं त्याचं जतन आणि जोपासना करूया.
किती छान उत्कृष्ट रूजेल आणि बहरेल ते !
कारण मनातल्या वेदना म्हणजे तावून सुलाखून निघालेली कसदार माती !
जेव्हा या निरोगी रोपट्याला आनंदाची फुलं येतील ना तेव्हा ती आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांच्या ओठांवर स्मितहास्याचे सडे नक्कीच घेऊन येतील .
हो ना..?
म्हणूनच आपले गझलकार म्हणतात ना –
मी खळखळून हसलो दुःखावरी असा की
माझीच वेदना बघ कसली निराश झाली……!!
संगीता थोरात, नवीन पनवेल .







Be First to Comment