🌹आई असती तर….🌹
कुशीत शिरूनी आईच्या मी
बसलो असतो निवांत होऊनी
रमलो असतो खोड्या ऐकत
बालपणीच्या खट्याळ माझ्या
हसलो असतो आईसंगे
पुन्हा एकदा लहान होऊनी
आई असती तर..
बसलो असतो गाणी ऐकवित
भावगीते अन भक्तीगीतांची
तल्लीन झाली असती आई
कृतार्थ पाहून झालो असतो
पुन्हा एकदा..
आई असती तर..
बसलो असतो वाचीत पुस्तकं
कथा पुलच्या कथा वपुच्या
वाच म्हणाली असती मजला
श्लोक मनाचे अर्थ जाणूनी
सांज भक्तीची झाली असती
आईसह मी अनुभवलेली
आई असती तर..
सैर करूनी गाडीमधून
फिरूनी आली असती आई
फिरता फिरता स्फूरले असते
काव्य तिला मग उत्साहाने
फुलल्या असत्या अजून कविता
झाला असता अजूनी संग्रह
आई असती तर..
लहानपण ते होते माझे
हरवून बसलो जाता आई
साठीच्या या प्रौढ वयाची
जाणीव मज ती झाली नसती
आई असती तर
आई असती तर..
अनंत खोत, विलेपार्ले, मुंबई







Be First to Comment