Press "Enter" to skip to content

जाणून घ्या पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आणि श्राद्ध करण्याची पद्धत

Screenshot

प्रतिवर्षी पितृपक्ष काळात श्राद्धविधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून पितृपक्षात श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे.

पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व

‘श्राद्ध’ म्हणजे ‘पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे’, एवढेच नाही, तर तो एक विधी आहे.’ पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते.

१. ‘देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते.

२. ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, `देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.

३. ब्रह्मपुराण सांगते, `जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्त करते. श्राद्ध करणार्‍याच्या कुळात कोणी दुःखी रहात नाही.’

४. एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो, उदा. आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला, तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे.

५. श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात. तसेच मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासांचे निवारण होते.

श्राद्ध करण्याची पद्धत

१. ‘भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रयी – पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा); मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

२. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.

३. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.

४. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.’

पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व

दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा किमान एक तास करावा.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.