Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिस स्टेशनच्या गणरायाला पोलिसांचा भावपूर्ण निरोप ; ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण अन् जयघोषाने दुमदुमला परिसर;अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह उत्स्फूर्त सहभाग

रसायनी (आनंद पवार) गणेशोत्सवाच्या काळात सलग दहा ते अकरा दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या रसायनी पोलिसांनी अखेर आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

अनंत चतुर्दशीला रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन उत्साहात पार पडल्यानंतर,शनिवार (दि.२६) रोजी रसायनी पोलीस ठाण्यातील गणरायाची विसर्जन मिरवणूक भक्तीमय व जल्लोषपूर्ण वातावरणात काढण्यात आली. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तात तैनात होते. सण-उत्सव,आंदोलने तसेच विविध कायदा-सुव्यवस्था विषयक जबाबदाऱ्यांमुळे पोलिसांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ देता येत नाही.मात्र, पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव हा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकत्र येण्याचा आणि कुटुंबीयांसह आनंद साजरा करण्याचा विशेष क्षण ठरला.

शनिवार (दि. २६) रोजी सायंकाळी सहा वाजता रसायनी पोलीस ठाण्यात गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनुसया ढोणे,पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली.त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली.ढोल-ताशांचा गजर,फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत मिरवणूक मार्गस्थ झाली.‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या..‘एक,दोन, तीन,चार..गणपतीचा जयजयकार,‘गणपती बाप्पा चालले गावाला..चैन पडेना आम्हाला..अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. गाण्यांच्या ठेक्यावर अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी ताल धरत गणरायाच्या निरोपाचा आनंद द्विगुणित केला.परिसरातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकारांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदविला.रसायनी पोलीस ठाण्यातून निघालेली गणेश विसर्जन मिरवणूक पाताळगंगा नदीकिनारी पोहोचल्यानंतर भक्तीमय वातावरणात गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

शांततेत उत्सव पार पाडल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन
रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने दीड दिवसांचे गणपती, त्यानंतर पाच दिवसांचे गौरी-गणपती,दहा दिवसांचे घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांचे विसर्जन अत्यंत उत्साही,जल्लोषपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडले.याबद्दल रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी रसायनी परिसरातील सर्व गणेश मंडळे,भाविक भक्त,पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.नागरिकांनी उत्सव काळात पोलिसांना दिलेल्या सहकार्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पाडणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.