Press "Enter" to skip to content

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये १३९ वी कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सौ. शकुंतला ठाकूर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोयर, रयत शिक्षण संस्था, रायगड विभागाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे, गव्हाण जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर व धीरज ओवळेकर, कामोठेचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, तसेच एल.आर.टी.ई.एम.एस. व ज्युनिअर कॉलेज, कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे तर प्रमुख वक्ते म्हणून सागर रंधवे उपस्थित होते. 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारी भाषणे सादर केली. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले कार्य, त्यांचे शैक्षणिक विचार, समाजसेवा तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी दिलेले योगदान याविषयी माहिती दिली.  यावेळी मराठी माध्यमातील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कर्मवीर जयंतीनिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध गटांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रमुख वक्ते सागर रंधवे तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक परिश्रम यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा व कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देतानाच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे १३९ वी कर्मवीर जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.