Press "Enter" to skip to content

गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडपांमध्ये मोठी गर्दी असते. अशा गर्दीत एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर अशावेळी रुग्णालयातील मदत पोहोचेपर्यंतचे सुरुवातीची काही मिनिटे त्या व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.अशा प्रसंगी आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने प्राथमिक मदत केली, तर रुग्णाला या परिस्थितीतून बाहरे काढण्यास नक्कीच मदत होऊ शकते. याच उद्देशाने जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे खारघर सेक्टर १० चा राजा, गणेश मित्र मंडळ- कोपरा येथील गणेश मंडपांमध्ये नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले.

हृदयाची ठोके अचानक बंद पडल्यास त्या व्यक्तीच्या मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्तपुरवठा सुरू ठेवण्यासाठी छातीवर दाब देण्याची प्रक्रिया म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर). आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सीपीआर सुरू केल्यास वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा सुरू ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रसंगी उपस्थित व्यक्तींना सीपीआरची प्राथमिक माहिती असणे अत्यंत गरजेचे ठरते.

गणेश मंडपांसारख्या नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी सीपीआरचे प्रशिक्षण घेऊन हे जीवनरक्षक कौशल्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मेडिकव्हर हॉस्पिटलचा प्रयत्न आहे. आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता ही परिस्थिती ओळखणे, त्वरित सीपीआर सुरू करणे आणि वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधणे याबाबत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले, हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनीट महत्त्वाचा असतो. घटनास्थळी उपस्थित असलेले लोकच अशावेळी सर्वप्रथम मदत करू शकतात. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत रक्ताभिसरण सुरू ठेवण्यासाठी सीपीआर हे अत्यंत उपयुक्त आणि एखाद्याचा जीव वाचविणारे कौशल्य आहे. गणेश मंडपांमध्ये आयोजित या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती ओळखणे, वेळ न दवडता सीपीआर सुरू करणे आणि तातडीने वैद्यकीय मदत घेणे याबाबत आत्मविश्वास मिळावा, हा आमचा उद्देश आहे. सीपीआर प्रशिक्षण ही केवळ एक प्रक्रिया शिकणे नाही, तर एखाद्याचा जीव धोक्यात असताना योग्य वेळी पुढे येऊन मदत करण्यासाठी स्वतःला तयार करणे याचे उत्तम उदाहरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.