Press "Enter" to skip to content

मनमानसी भाग क्र. ४

मनमानसी भाग क्र. ४ *संयम पाळू या..*

रात्रीचे 12 वाजले तरीही ambulance च्या आवाजाने येणारी झोप पण उडाली. त्यामुळे सकाळी डोकं जड पडलं होतं..त्यात रोजच्या कामाची गडबड..त्यात बेल वाजली..कोण उघडणार आता..म्हणजे नाकावर मास्क लावा..! पुन्हा हात धुवा..! ह्यांना सांगावे तर ह्यांची अॉफिसला निघायची घाई,आणि मी माझ्या स्वयंपाकात..मुलींना सांगावे तर त्यांच्या कानात कॉड ! अहो अॉनलाईन कॉलेज म्हणजे त्या एकदम mute..!
सध्याच्या घडीला टेलिव्हिजन वर त्याच त्या बातम्या बघून डोकं नुसतं सुन्न झालयं, खुप कंटाळा आलाय..बरं पेपर वाचायला घेतला तर तिथे पण त्याच त्या बातम्या बघून सारखे हेच चित्र डोळ्यासमोर येते, आणि मग रात्रभर डोक्यात विचारचक्र सुरू होते, झोप काही केल्या लागतचं नाही..मला काही झाले तर, मग आपल्या कुटूंबाचे कसे होणार !
अरे पुन्हा मी त्याच ट्रॅक वर आले..! पुन्हा एकदा विचारांना घट्ट धरून ठेवले..कि मुलांच्या भविष्याची चिंता केली कि मनात भीतीचे काहूर उठते आणि या दोन्हींचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतोय..! हं ठरलंय तर मग..सकारात्मक विचार करायचा आणि घरात हसत खेळत वातावरण ठेवायचं..! पण कसे ??
कारण त्याच त्या गोष्टींचा विचार न करता,आज कामे आवरली कि, २,३ गाणी म्हणायची, राहीलेले पुस्तक पुर्ण करायचे..! अजून काय काय करावे बरं, नको जास्त ताण घ्यायला..वेगवेगळ्या कल्पना सुचतील तसे ठरवू या..निश्चय पक्का बरं, असे मनाला सांगितले आणि आनंदाने गिरकी घेतली..!आणि दुसऱ्या दिवशी लगेच सुरुवातही केली..!
सुरुवातीला सकाळी लवकर उठून मुलांना सूर्य नमस्कार घालायला शिकवायचे नियोजन केले., दिवसभरात कामे आवरली कि, छोट्या छोट्या कामात मन रमवायचे, नंतर मुलांना पण थोडा बदल म्हणून स्वयंपाक घराची, डाळींचे, कडधान्ये प्रकार, त्यांना दाखवायचे माहीत असावेत म्हणून..कुठलेही काम , काम न समजता एन्जॉय करत केले तर ते काम , काम वाटतंच नाही..खुप मजा येते..! हे सुद्धा आवर्जून सांगितले.
मुलांबरोबर संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती, रामरक्षा,आणि मनाचे श्लोक एवढे जरी रोज नियमितपणे म्हंटले तरी मनातील भीती निघून जाईल, मन प्रसन्न राहील, घरात सकारात्मक वातावरण तयार होईल.
दिवसभरात वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा, कॅरम, लुडो ,चेस किंवा सगळे मिळून आपल्या आईबाबांशी लहानपणीच्या गप्पा मारत त्या गोड आठवणीत रमायला काय हरकत आहे ? म्हणून तेही केले..त्यांना पण खुप छान वाटले. लहानपणीचे खेळत असलेले खेळ आठवून मस्त चंफुलपाणी, सागरगोटे, हे खेळ मुलांना शिकवले. त्यांना स्मार्ट फोन वरील गेम खेळायची सवय ना..पण त्यांनाही खेळायला खुप मज्जा आली. हळूहळू लहानपणीच्या गोष्टी आठवत गेल्या ,त्याप्रमाणे वेळ खुप छान जायला लागला…! याशिवाय दररोजच्या धावपळीत बऱ्याच आवडणाऱ्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या होत्या. वाचन , नृत्य, चित्रकला, पेंटिंग, शक्य असल्यास झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात किती छान वेळ जावू शकतो ,आणि ते काम चालू असतांनाच एकिकडे जुने गाणे ऐकण्याचा आनंद म्हणजे सोने पे सुहागा..!!
बरेच वर्षापासून नाटक आणि
जुने सिनेमे बघायचे राहून गेलेले होते अहो, मग अख्खे जग तुमच्या हातात सामावले आहे, बघा कि सगळे मिळून हवे ते.! शिवाय घरातील आवराआवर करण्यात तर कितीतरी चांगला वेळ तुम्ही घालवू शकता, जी वास्तु आपल्याला सुरक्षित ठेवते,आपल्याला सामावून घेते, तिच्याविषयी आपलेपणाची सुरक्षित भावना मनात निर्माण होईल !! हे संकट काही कायमचे थोडीच असणार आपल्या बरोबर छे.. छे.. मुळीच नाही, उलट तुम्हाला शांत आयुष्य कसं जगावं, म्हणून break मिळाला असे समजा हवं तर..!परिस्थिती व वेळेचे भान ठेवून सद्यस्थितीला स्विकारु या !
सध्या तर unlimited talk time आणि वेळच वेळ आहे तुमच्याकडे..मग आपल्या जुन्या मित्र मैत्रिणीं नातेवाईक यांच्याशी फोनवर संवाद साधा..गप्पा मारा, वास्तव स्विकारुन वरील सर्व गोष्टीं आचरणात आणल्या म्हणजे मन स्थिर व आनंदी राहील. मनातील भीती व विचार कुठल्या कुठे जातील..थोडक्यात काय तर प्रत्येकाच्या जीवनात काही चढ उतार, अडचणी,सुख-दु:ख, काही संकटं येतच राहतात. गेल्या वर्षापासून आपण सगळेजण काळजी घेवून परिस्थितीला खंबीरपणे तोंड देतच आहोत. हे दिवस पण जातील, त्यासाठी संयम ठेवणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच संयम पाळा, चिंता टाळा.. आणि मस्त होवून जावू द्या हे गीत..!!
जीवन गाणे गातच रहावे, असे म्हणतचं या करोना लढाई जिंकण्याचा मानस ठेवून..पुढील भविष्यासाठी सकारात्मक राहू..करून तर बघा !

सौ. मानसी जोशी,
खांदा कॉलनी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.