दानाच्या समाधानातील अक्षय्य आनंद
आपल्या संस्कारांनी समाज प्रवृत्त व्हावा आणि व्यक्ती , कुटुंब , समाज यां सर्वांचे हित जपणारा किंबहुना मानवतेची मूल्य वृद्धिंगत करणारा असावा या उद्देशाने भारतीय संस्कृतीच्या रितीरिवाजाची रचना झाली .
या संस्कृतीनं व्यक्तीला सतत कार्य प्रवृत्त ठेवण्यासाठी काही संकल्पना संवर्धित केल्या .
यामध्ये कालगणनेला विशेष महत्त्व !
या कालगणने मध्ये मुहूर्त नावाची विशेष पावित्र्य असलेली व्यवस्था उभी केली . साडे तीन मुहूर्त हा त्यातला एक भाग . या मुहूर्ता पैकी अक्षय्य तृतीया या नावातच ‘ क्षय ‘ न पावणाऱ्या म्हणजेच ‘नाश’ न होणाऱ्या सदिच्छांचा प्रभाव दिसून येतो.
भारतीयांना कोणत्याही युगाचा, वर्षाचा , संवत्सराचा पहिला दिवस नेहमी पवित्र वाटतो .
चांगल्या गोष्टींसाठी त्याचा पाठपुरावा करावा लागतो . त्याचे सतत स्मरण करावे लागते. किंवा काही चांगले घडण्यासाठी व्यक्ती आणि समाज संधीची वाट पहात असतो त्यासाठी योग्य त्या काळ आणि वेळेची सुद्धा आवश्यकता असते .
गुढीपाडव्या नंतर येणाऱ्या अक्षय्य तृतीयेला पुन्हा नवे संकल्प आकारात आणण्याची संधी मिळते म्हणजे मनाला पुन्हा सत्प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या व्यापक अर्थानं साडे तीन मुहूर्तांचे खूप मोठे योगदान आहे .
वैशाख महिना वातावरणात तापमान वाढलेलं परंतु मनाच्या अवस्थांचा विचार करून त्याला स्वस्थता प्राप्त होईल अशी ही संकल्पना .
कायम स्वरूपी सुख किंवा आनंद हा प्रत्येक जीवाला हवा असतो परंतु तो मिळेलच याची शाश्वती देता येत नाही .
आपण फक्त स्वतःचाच विचार करत राहिलो तर आपल्याला ते कधीच मिळत नाही .
परंतु मनाचं समाधान हे अक्षय्य म्हणजेच कधीही ‘क्षय’ न पावणारे असू शकते.
त्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता जी गोष्ट केली जाते ती मदत किंवा दान स्वरूपात असते.
मुळात निसर्गाचाच हा नियम आहे .
मूठभर पेरलेल्या धान्यातूंन पसाभर धान्य मिळतं. या पद्धतीनं निसर्ग या सृष्टीचं भरण पोषण करतो .
निसर्गाचा हा संस्कार आणि दातृत्वाचा भाव माणसाच्या मनावर संस्काराचा खूप मोठा प्रभाव पाडणारा आहे .
निसर्ग हाच अक्षय्य असेल तर त्याने घालून दिलेली
दातृत्वाची संकल्पना माणसाने कृतीत आणली तर त्यातून अक्षय्य समाधानाचा आनंद घेता येईल .
पुराण कथा मध्ये सांगितलं ते खरं की खोटं याची चिकित्सा न करता ज्यांचं मन समाधानी आहे तो राजा असतो हा आशय जरी लक्षात घेतला तरी एकमेकांच्या सहाय्यानं समाज जीवन समृद्ध करण्याची ही संकल्पना उदात्त स्वरूपाची आहे हे लक्षात येतं
या काळात जलदान, पाण्यानं भरलेला माठ किंवा कुंभ दान केलं जातं
ठिकठिकाणी पाणपोई सुरू केल्या जातात .
त्यामागे पुण्य वाढवणं ही पुस्ती जोडली गेलीय परंतु या छोट्या छोटया कृतीतूंनही समाजाला चांगल्या कामासाठी पुरस्कृत केलं जातं.
अनेक समस्या , अडचणी किंवा सुखदुःखाला सामोरं जाताना आयुष्यातील आनंद टिकवायचा असेल तर
दान किंवा मदत म्हणजे देण्याच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा केवळ त्या व्यक्तीच्या मनापुरताच मर्यादित रहात नाही तर तो पुढच्या पिढीत संक्रमित होऊन अक्षय्य आनंदाचा ठेवा बनतो.
आपल्या समाजाला मिळालेलं हे संस्कृतीचं अक्षय्य दान आणि अक्षय्य संस्काराची देणगी यासाठीच महत्त्वाची आहे .
संगीता थोरात, नवीन पनवेल.







Be First to Comment