मनमानसी भाग – ३
मुलांना आत्मनिर्भर करु या
उद्याचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या आपल्या मुलांसाठी आपण आयुष्यभर काबाडकष्ट करतच, खर्चाची तजबीज करतो. युवा पिढीला या कोरोना संकटाचा सामना गेल्या वर्षभरापेक्षा जास्त दिवसापासून करावा लागत आहे. घराघरात लाईट गेले, नेटवर्क नाही, शिक्षकांचा आवाज ऐकू येत नाही.अशा तक्रारी व अनेक अडचणींत सर्व वयोगटातील मुले सापडले आहेत. एकुणच शैक्षणिक वर्ष अनेक महिने पुढे गेल्याने, प्रगतीच्या दृष्टीने सगळे काही विस्कळीत झाले आहे. मागील वर्षीचे विलंबाने लागलेले निकाल यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलांना धीर देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांच्या गोंधळलेल्या मनाला दिलासा दिला पाहिजे. वर्षभरापासून चालू असलेल्या अॉनलाईन शाळा,कॉलेजला पर्याय नसला तरी सध्याच्या परिस्थितीत वर्ष वाया जाणार नाही ,म्हणून रद्द केलेल्या परिक्षा व पुढील ( नेटवर्कच्या ) अडचणी झेलत समाधान मानावे लागेल !
पण आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थी इंटरनेट व स्मार्ट फोन नसल्याने शिक्षणापासून वंचित आहेत, आणि शहरांमध्ये तर याच्या उलट परिस्थिती आहे. मुलांकडे सगळे काही उपलब्ध असुनही त्यांच्याशी संवाद साधायला कुणाला वेळ नाही. हीच गोष्ट मनाला पटत नाही.मला वाटते आपण या स्मार्ट फोनला जरा जास्तच महत्व द्यायला लागलोय, बरोबर ना ? त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होवू लागले आहे.योग्य वेळी संवाद होत नाही म्हणून आजकालची मुले शालेय जीवनापासूनच मित्र मैत्रीणी,व सोशल मीडियावर नको त्या गोष्टी शिकतात, व त्यातच रमतात. काही प्रमाणात आपल्यापासून दुरावले जातात. म्हणूनच आई, वडील या नात्याने आपण आपल्या स्वभावात बदल करणे आवश्यक आहे.
त्यासाठीच आपण आई, बाबांच्या नात्यातून Good friends या नात्यात shift झालो तर..तसे बऱ्याच कुटूंबात हे बदल दिसतात. पण असा बदल करणे अवघड आहे, पण करणे जास्त महत्त्वाचे आहे. दररोज थोड्या वेळ त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या, त्यांच्या आवडी निवडी काय हे मैत्रीच्या भुमिकेत जावून आधी जाणून घेतले तर..काही चुकीचे वागणे लक्षात आले तर. .विश्वासात घेवून समजावले तर..मैत्रीच्या नात्याने त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य दिले तर ..ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील, आतून मोकळे होतील, वाईट सवयींपासून दूर राहातील.आता तुम्हीच त्यांचे जवळचे मित्र, मार्गदर्शक असाल. प्रगती बरोबरच आपला आहार व आरोग्यही महत्त्वाचे आहे हे त्यांना पटवून द्या. सध्याच्या परिस्थितीत मुले व मुली यांच्या मतांना समजून व समजावून सांगणे गरजेचे आहे. आपण त्यांना किती दिवस पंखाखाली ठेवणार आहोत , चांगले वाईट काय असते याचाही अनुभव त्यांना घेवू द्या..! आपल्या मोठ्या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय किंवा इतर क्षेत्रात पदार्पण करायचे असेल तर आपण त्यांचा आत्मविश्वास दृढ केला पाहिजे तर ते आनंदाने उंच भरारी घेतील, आत्मनिर्भर होतील. हे बघून आपलाही उर अभिमानाने व समाधानाने नक्कीच भरून येईल.
सौ. मानसी मंगेश जोशी
खांदा कॉलनी.







Be First to Comment