मन मानसी भाग-२
कोरोनामुळे भान आले..
या यांत्रिकी युगात जो तो प्रगती करण्याच्या नादात स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतच जीवन जगत होता. पण गेल्या वर्षभरापासून हा कोरोना विषाणू आला आणि त्याने जणू सगळ्यांना विचार करायला भाग पाडले.आणि आपण सगळेच खडबडून जागे झालोय ..!
आपला देश हा या आधी अशा प्रकारे कधीही थांबला नव्हता,जगभर थैमान घालणाऱ्या या विषाणूने सगळेच लहान, मोठे उद्योग, बंद करुन सगळ्यांना घरात बसवले आहे. पूर्वी माणसाच्या अन्न वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा होत्या, कमी मिळत असूनही तो आनंदी आयुष्य जगत होत, व कुटुंबाच्या गरजाही पूर्ण करतच होता.
पण माणूस यश व प्रगतीच्या मागे लागला खरा, पण जुने संस्कार, सवयी व जुनी जीवनशैली विसरुन पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून भरकटतं चालला होता..! पण निसर्गाने जणू आपल्या भरकटलेल्या मनाला परिस्थितीचे भान यावे म्हणूनच विषाणूला पाठवले कि काय असे वाटते..!
पण मैत्रीणींनो तुम्ही मागील वर्षीपासून या कठीण काळात ढाल घेऊन पुर्ण कुटुंबाची खरी लढाई तर तुम्ही लढत आहात. यामुळेच कोरोना संकटात घरी बसलेल्या मुलांना, व इतरांना सतत काम करत असलेल्या आईची किंमत कळाली. मोबाईलमध्ये डोक घालून बसलेल्या मुलांनाही घरातील जेवणाचं महत्व समजलं. कोरोनामुळे घरी कामासाठी येणारी बाई बंद झाली, आणि मग मात्र सगळेच घरातील कामे, आणि नव्या डिजिटल तंत्रज्ञान शिकून स्मार्ट झाली आहेत.
मुलांना नव्याने शिस्तीचे धडे मिळाले, नवरे तर कोणत्याही मागणीला बळी न पडता तणावमुक्त जीवन जगत आहेत.
आपण पुरेशा पगारात,काटकसरीने राहून hotels, पार्लर,फास्ट फूडशिवाय, आणि ढीगभर अनावश्यक कपडे जमा न करता आवश्यक तेवढ्या गरजा ठेवून सुखी जीवन जगू शकतो हे सुद्धा नव्याने उमगले..
पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना खरंच जास्त प्रमाणात झळ बसत आहे.
या जगभरात चाललेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेक अडचणी भेडसावत आहेत जसे कि,देशाची अर्थ व्यवस्था,लग्नसराई असल्याने २५ जणांची मर्यादा घालून कमी खर्चात व कमी वेळेत लग्न लावण्याची ही प्रथा खरोखर स्तुत्य अशी आहे, या प्रथेला असेच टिकून ठेवू या..
चला तर मग परिस्थितीचे भान आलेच आहे. मग या संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवून सज्ज होवू या, घरात सुरक्षित राहून, स्वच्छता व सुरक्षित अंतर ठेवून, मास्क लावून नियमांच पालन करु या.
- सौ.मानसी जोशी, खांदा कॉलनी
पनवेल.







Be First to Comment