शाळा
लहानपण देगा देवा असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणासारखे सुख नाही. आनंदी, समाधानी आणि स्वैर असलेले आपले मन, गगनभरारी घेते ते बालपणातच. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळे अनुभव येतच असतात. कधी कडू कधी गोड, पण कडूगोड आठवणींच्या पुस्तकात बालपणाचा धडा नेहमीच, मन प्रफुल्लित करून टाकणारा असतो. बालपणातील स्वच्छंद मनाला कुठलेही नियम आणि जबाबदारी वेसण घालू शकत नाही. एक नक्की, आपल्या बालपणाच्या निरागस आठवणी आजही डोळ्यासमोर आल्या की मन टवटवीत होऊन जाते. बालपणाचे मित्र, शाळा, केलेली दंगामस्ती हे भूतकाळात जमा झालेले असले, तरीही त्या आठवणी, आजच्या वर्तमानात जगण्याची नवी उमेद मिळवून देतात आणि आपला भविष्यकाळ सुखकर करतात. निवांत क्षणी भूतकाळाचा कानोसा घेतला की लहानपणी घडलेल्या सर्व घटना एखाद्या चित्राप्रमाणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. विविध गोष्टींचे अनुकरण करणारे बालसुलभ मन तर्कशक्तीच्या पलीकडचे असते. म्हणून बालपण म्हटले की डोळ्यासमोर येते ती फक्त शाळा. शाळेचे मित्र भेटले की जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो आणि मग पुन्हा धावत जाऊन शाळेच्या रोजच्या बाकावर बसावेसे वाटते. एक वेगळीच अनुभूती प्रत्येकानेच आपल्या शालेय जीवनात अनुभवलेली असते. आजही जून महिना सुरू झाला की पहिल्या पावसात येणाऱ्या मातीच्या सुगंधासोबत नव्या वह्या पुस्तकांचा वासदेखील आपल्या अवतीभवती दरवळतोय असा भास होतो आणि नव्या वहीच्या पहिल्या पानावर स्वतःचे नाव छान अक्षरात लिहावेसे वाटते. ही अनुभूतीच नव्या वह्या, नवी पुस्तके, नवा गणवेश ह्यांच्या खरेदीची आस मनामध्ये आणते आणि शाळेमध्ये जाऊन सगळ्या मित्रांसोबत खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणण्याचे वेध लावून जाते. भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारखं दुसरं काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र, काही जुनेच, काही मागून आलेले, काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा, चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे असे वाटते. यासारखा विरंगुळाही नसावा.
शाळेचं स्नेहसंमेलन, शाळेत करून मागितलेले तक्ते, शाळेत वर्ग सजवताना पताकांसोबत घातलेला धिंगाणा, सर्वांच्यासोबत खाल्लेला मार, शाळेची सहल, टिंगल टवाळी, अखंड बडबड, मॉनिटरने वहीत नावं लिहून घेणे मग ती सरांपर्यंत पोचू नये म्हणून धडपडलेलो आपण, सगळेच अविश्वसनीय असते.
जीवावर आलेल्या त्या घटक चाचण्या, सहामाही परीक्षा आणि त्याहून मनाला टोचणारे ते वर्गात पेपर देऊन सरांचे मार्क सांगण्याचे प्रसंग. सहामाही परीक्षेचा अभ्यास हा बऱ्याच वेळा दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच झालेला. दिवाळीची सुट्टी म्हणजे केवळ धिंगाणा. रेडिमेड झालेल्या आजच्या युगात सगळेच सण – उत्सव, दिवाळीचा फराळ, दिवाळीचा किल्ला सुद्धा आपण बाहेरून आणायला लागलोय. रेडिमेड किल्ल्यातून दिवाळीची शोभा नक्कीच वाढली पण दिवसभर मातीत लोळून, किल्ले बनवून, हात न धुता फराळाच्या ताटावर बसण्याची गम्मत रेडिमेड आणू शकणार नाही. आर्थिक सुबत्तेमुळे पाहिजे ते फटाके आपण विकत घेऊ पण आदल्या रात्री न फुटलेले फटाके शोधताना होणार आनंद कुठल्याच पैशात विकत घेता येणार नाही. कधी शाळेत आलेले जादूचे प्रयोग, कागदाची ओरिगामी शिकवणारे कलाकार, त्याची पुस्तके घेऊन शिकण्याचा प्रयत्न करताना, फसल्याची जाणीव होणारे आपण, नळावर पाणी प्यायला जणू गोठ्यातून सोडून दिलेली तहानलेली वासरं, गायांची कासं लुचायला धावतात तसे धावणारे आपण, काय सुंदर दिसतं हे आता आठवणींतून. धावत्या चित्रांचा पटच जणू कुणी समोर धरून दाखवीत आहे असे वाटते. म्हणूनच कधीतरी असे वाटते की जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचे ओझे पाठीवर घेऊया. वातानुकूलित ऑफिसमध्ये एकटे बसण्यापेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडकी उघडून बसूया. नोकरी धंद्यात आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाशी स्पर्धा करणारे आपण, वर्गमित्रांसोबत अगदी बरोबरीचे होऊन जातो. त्यांच्यात कधीच कोणी मोठा आणि लहान नसतो. हे मित्र कधी भेटले की सख्खे नातलग भेटल्याचा आनंद होतो. कधी एकमेकांची प्रशंसा करताना शब्द कमी पडू लागतात त्याचवेळी एकमेकांची गमतीने उणीदुणी काढताना कसली भीडही ठेवली जात नाही. हे फक्त शाळेतल्या मित्रांसोबतच सहजशक्य असतं. शाळेतल्या मित्रांसोबत अनेक सोमवार ते शनिवार काही खास रविवारसुद्धा खर्च केलेले असतात, तेव्हा कळतच नाही की, हे क्षण किती खास आहेत आणि आठवणी होऊन पुढे आयुष्यभर आनंद देणार आहेत. घड्याळाच्या अन कॅलेंडराच्या मदतीने नियती भराभर आपले वय वाढवीत असते आणि आपण जणू प्रवाहाच्या मधल्या धारेत जखडून एका ठराविक गतीत वाहत असतो. म्हणूनच आज सांगावेसे वाटते की, “लहानपण देगा देवा” ह्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ आता थोडाफार कळायला लागलाय, तो बरोबर आहे का? हे अनुभवायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय….
©समीर खरे, पनवेल
8879737388






Be First to Comment